सोलापूर - आयुर्वेदात शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद व हेमंत या सहा ऋतूंचे वर्णन केलेले आहे. वर्षा ऋतूच्या अगोदर असणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या (उन्हाळा) अति उष्ण व तिष्ण गुणांमुळे शरिरात वात दोषांचा संचय होतो. पावसाळ्यामध्ये वातावरणात गारवा वाढत असल्याने या संचित वात दोषाला जोड मिळाल्याने वात दोष वाढतो. ग्रीष्म ऋतू जाऊन आता वर्षा ऋतूला सुरवात झाली आहे. निसर्गात झालेल्या या बदलाला सामोरे जाण्यासाठी आपणही आपल्या आहारात, विहारात बदल करण्याची आवश्यकता आहे.
सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. श्रुती तारापुरे म्हणाल्या, व्याधी होऊ न देणे हे आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे. यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहार याचे सविस्तर वर्णन आढळते. ऋतुमान बदलल्यानंतर शरीरावर त्याचे चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम होतात. अशा वेळी ऋतुनूसार आहार व दिनचर्येत बदल केल्यास ऋतू बदलाचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही. शरीरबल व व्यक्तिमत्त्व उत्तम राहण्यास मदत होते. या सगळ्याचे वर्णन आयुर्वेदात ऋतुचर्या म्हणून केले आहे.
शीत व रुक्ष वात दोषाला शांत करणारे उष्ण व स्निग्ध तेल असते, म्हणूनच या काळात गरमागरम तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. वाढलेला वात पुढे सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी व वेदनांना बळ देतो. तसेच वात, पित्त दोषांच्या साहाय्याने शितपित्त (अंगावर पित्ताच्या गांधी उठणे), ॲसिडिटी, अजीर्ण यासारख्या व्याधी उत्पन्न करतो. पावसाळ्यात जठराग्नि (पचन शक्ती) मुळातच दुर्बल असते आणि निसर्गतः वात दोषांची वृद्धी होते. या सगळ्यांवर उपाय म्हणून आयुर्वेदात सांगितलेल्या वर्षा ऋतुचर्येचे पालन करणे आवश्यक असल्याचे डॉ. तारापुरे यांनी सांगितले.
वर्षा ऋतूमध्ये पंचकर्माचे उपचार
त्वचा हे वात दोषाचे स्थान आहे. रोज तेलाचे अभ्यंग केल्यास वात दोष कमी होण्यास मदत होते. मनाची चंचलता कमी होते. बस्तीमुळे वात दोषाचे कार्य सुरळीत होते. शरीर धातूचे पोषण व वर्धन होते. तारुण्य टिकविण्यास मदत करते. पचन शक्ती सुधारते. आरोग्य टिकून राहते. या उपचारानंतर संधीवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, आमवात यावर उत्तम आराम मिळतो. अपचन, मलबध्दता, पोटात वात धरणे या तक्रारी दूर होतात. पाळीच्या तक्रारी दूर करून सौंदर्य वर्धनासाठी उपयुक्त मानले जाते. अशा बऱ्याच फायद्यांनी बस्ती आपल्या शरिरासाठी फायद्याची असल्याचे डॉ. तारापुरे यांनी सांगितले.
वर्षा ऋतूतील आहार
सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. श्रुती तारापुरे सांगतात, वर्षा ऋतूमध्ये शक्यतो जुन्या धान्याचा वापर करावा. जुने धान्य पचनासाठी हलके असते. जुना मध हा वर्षा ऋतूत वाढलेल्या वात दोषाला कमी करण्यास मदत करतो. उष्णोदक (गरम पाणी) हे अग्नी संस्कारामुळे पचण्यास हलके होते. अग्निदिपन करते. वात व कफ या दोषाला कमी करते. लसूण हे रसायन आहे. कफवात दोषाला कमी करते.
अग्निदिपक, रुचकर असल्याने सर्दी, खोकला नष्ट करते. वाटाण्याच्या अतिसेवनाने वात दोषाची वृद्धी होते. या काळात, पालक, मोड आलेले धान्य, उडीद हे पचनास जड असल्याने ते अधिक प्रमाणात खाऊ नयेत. झोपण्यासाठी पाण्याचे बाष्प, थंड हवा येणार नाही असे ठिकाण निवडावे. त्यामुळे वात दोषाची वृद्धी होणार नाही. उन्हात वाळलेले सुके कपडे घालावेत. ओल्या कपडे घातल्यास शीत गुणामुळे वात, कफ दोष वाढून सर्दी, खोकला, त्वचारोग यासह आजार उद्भवतात. या ऋतूमध्ये शक्यतो दिवसा झोपू नये. त्यामुळे स्निग्धा वाढून कफाचे आजार उद्भवतात. रात्री जागरण करू नये. त्यामुळे रुक्षता वाढून वाताचे विकार होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.