तडवळेचा शरण कांबळे. त्याने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादून करुन देशात ५४२ वी रँक घेत शेतमजुराच्या मुलाने युपीएससी क्रॅक केली आहे.
सासुरे (सोलापूर) : स्वप्नांना नसते लांबी रूंदी, स्वप्नांना असते फक्त उंची, आणि तिच्या पूर्तीसाठी हवी स्फूर्ती, चिकाटी अन् जिद्द... कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नुसताच पोकळ ध्यास उपयोगाचा नसतोच नसतो. यश मिळवायचेच असेल तर तो प्रत्येक अडथळ्याची शर्यत पार करतो तो कोणत्याही परिस्थितीवर मात करुन त्या परिस्थितीला शरण आणू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तडवळेचा (ता. बार्शी) (जि. सोलापूर) येथील शरण कांबळे. त्याने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादून करुन देशात ५४२ वी रँक घेत शेतमजुराच्या मुलाने युपीएससी क्रॅक केली आहे.
आज पोट भरुन खायला मिळेल का नाही याची खात्री नाही, पण आत्ता जी एक भाकरी आहे ती अर्धी अर्धी खाऊन आजची भूक भागवू म्हणजे पोरांच्या शिक्षणांचं खर्च भागवता येईल. असा विचार करून मुलांना घडवणाऱ्या तडवळेतील शेतमजूर गोपीनाथ आणि सुधामती कांबळे यांचा मुलगा शरण कांबळे याने आपल्या चिकाटीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत देशात ५४२ वा क्रमांक पटकावून फिनीक्स भरारी घेतली आहे. अशिक्षित आई-वडील असलेल्या हलाखीच्या परिस्थितीला शरणने जिद्दीने शरणागती पत्करण्यास भाग पाडले आहे.
गोपीनाथ ज्ञानदेव कांबळे यांनी रात्र शाळेत जाऊन कसबसं दुसरी पर्यंत शिक्षण घेतलं. लहान असतानाच घरातला कर्तबगार पुरुष म्हणून लवकरच जबाबदारी गोपीनाथ यांच्यावर पडली. तीन भाऊ, तीन बहिणी, आई-वडील असा त्यांचा मोठा परिवार होता. त्या परिवाराची जबाबदारी सांभाळत सांभाळत सुदामती यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. अवघ्या दिड एकर जिरायती क्षेत्रावर कसबसं भागत होतं. सोबत मजुरीसाठी शरीर दुसऱ्यांच्या शेतात राबायचं.
गोपीनाथ यांना दादासाहेब आणि शरण ही दोन मुले. अत्यंत हलाखीची परिस्थिती त्यात एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे घराचा कूड लांबच राहिला, परंतु घरावर पत्रे घालणेही कठीण. आपण कसं बसं जगायचं पण मुलांना वाढवायचं, नुसतं वाढवायचं नाही तर शिक्षणांन मोठं करायचं हाच ध्यास धरून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित केलं. त्यासाठी देह पुरता झिजवला. दुसऱ्या शेतात मोलमजुरी करून अंगावर रात्री कडबा काढायची, ज्वारीची सुगी करायची, गटारी साफ करायची कामे अंगावर घेऊन पै-पै जुळवून मुलांना शिकवलं.
काही झालं तरी मुलांच्या शिक्षणाला पैसा कमी पडू द्यायचं नाही एवढाचच त्यांचा निश्चय. खर्चामुळं अनेकदा बाजारला गेलेली पिशवी तशीच रिकामी परत यायची. चटणी भाकरी खाऊन उपाशी राहून त्यांनी दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलं. थोरला दादासाहेब हा देखील बी टेक असून पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये दहा लाखांच पॅकेज घेऊन इंजिनीयर म्हणून कार्यरत आहे. तर लहान भाऊ शरणचे प्राथमिक शिक्षण तडवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाले असून पाचवी ते दहावी शिक्षण यशवंतराव चव्हाण प्रशाला तडवळे ( जि. सोलापूर ) येथे झाले आहे. विशेष म्हणजे 95 टक्के गुण मिळवून शरण हायस्कूलमध्ये ही प्रथम होता. तसाच वैरागच्या विद्यामंदिर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन 91 टक्के मिळवत टॉपरच राहिला. त्यानंतर सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये 9.5 पॉईन्टर घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ही झाला.
बी टेक झाल्यानंतर बेंगलोरच्या भारतीय वैज्ञानिक संस्थेमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी प्राप्त करून स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर एका इंटरनॅशनल कंपनीकडून 20 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर असणारी नोकरी त्याला प्राप्त झाली. मात्र त्याने स्पष्टपणे नकार देत युपीएससीची तयारी सुरु केली. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेंट्रल पोलिस फोर्स परीक्षेमध्ये सी ए पी एफ च्या सहाय्यक कमांडर पदासाठी ऑगस्ट 2019 मध्ये त्याने परीक्षा दिली. या परीक्षेत प्रथम प्रयत्नांमध्ये तो यशस्वी झाला असून देशांमध्ये आठवा क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर केंद्रीय लोक सेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या आयएएस, परीक्षेत ५४२ क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाचं गावकऱ्यांना मोठं कौतुक वाटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.