श्री. भोसले यांच्या या मागणीनंतर पुन्हा एकदा भालके गटाअंतर्गत असलेली खदखद समोर आली आहे.
पंढरपूर (सोलापूर): गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकीत आहे. कारखान्याच्या या परिस्थितीला सध्याचे संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे हे संचालक मंडळ बरखास्त करुन कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले यांनी केली आहे. श्री. भोसले यांच्या या मागणीनंतर पुन्हा एकदा भालके गटाअंतर्गत असलेली खदखद समोर आली आहे.
मागील हंगामात गाळप केलेल्या ऊसाची एफआरपी, कामगारांचे वेतन यासह तोडणी वाहतूक दारांची देणी थकीत आहेत. अशातच यावर्षीचा गाळप हंगाम तोंडावर असतानाच कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांच्या विषयी संचालक, कामगार आणि शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
मागील आठ दिवसापूर्वी कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनाही कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी राजीनामा देवून पुढील मार्गमोकळा करुन द्यावा, अशी मागणी केली होती. श्री. पाटील यांच्या मागणीनंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता माजी संचालक शेखर भोसले यांनी थेट संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. श्री.भोसले यांच्या मागणीमुळे कारखान्याचे अध्यक्ष श्री. भालके यांच्या विषयी असलेली नाराजी उघडपणे व्यक्त केली जावू लागली आहे.
याबाबत श्री. भोसले म्हणाले की, राज्यात एक नंबर असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आजची अवस्था पाहवत नाही. मागील दहा वर्षापासून कारखान्याचा कारभार करणाऱ्या अध्यक्ष आणि संचालकांच्या गैरकारभारामुळेच कारखाना आर्थिक संकटात आला आहे. परिणामी कारखान्याच्या सुमारे 28 हजार सभासदांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कामगारांना पगार नाही. वाहतूक तोडणी ठेकेदारांना अजूनही त्यांच्या घामाचे पैसे मिळाले नाहीत. कारखाना चालवण्यास असमर्थ ठरलेले हे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणीही श्री.भोसले यांनी साखर आय़ुक्तांकडे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.