सीना नदीच्या काठावर सीना नदी व कान्होळा नदीच्या संगमावर हे पुरातन आदिनाथ मंदिर आहे.
करमाळा (सोलापूर) : करमाळा (Karmala, Solapur) तालुक्यातील सीना नदीच्या (Seena River) काठावरील आदिनाथ मंदिर (Adinath Temple) हे ठिकाण करमाळा तालुक्यासह उस्मानाबाद (Osmanabad) व नगर (Nagar) जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. करमाळा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. सीना नदीच्या काठावर सीना नदी व कान्होळा नदीच्या (Kanhola River) संगमावर हे पुरातन आदिनाथ मंदिर असून, या ठिकाणाला संगमेश्वर (Sangmeshwar) असे देखील संबोधले जाते. हे देशातील अत्यंत दुर्मिळ असे मंदिर असून येथे महादेवाची पिंड आहे. या मंदिराला महादेव मंदिर न म्हणता आदिनाथ मंदिर असे म्हटले जाते.
"आदिनाथ गुरू सकळ सिद्धीचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य' या संतोक्तीप्रमाणे आदिनाथला नाथ संप्रदायाचे आद्य गुरू मानण्यात येते. साधारणपणे 400 वर्षांपूर्वी आदिनाथ मंदिराच्या भोवती झाडांचा विळखा होता. वासकर संप्रदायाचे मुख्य मल्लाप्पा वासकर यांनी परिसरात भाविकांच्या मदतीने मंदिर स्वच्छ करून त्याचा पहिला जीर्णोद्धार केला. श्रावण महिन्याच्या सोमवारी येथे यात्रेचे स्वरूप येते. अनेक वर्षांपूर्वी या मंदिराचा आणि पिंडीचा जीर्णोद्धार आजचे जे पंढरपूरच्या वारकरी संप्रदायातील वासकर परिवार आहे, त्यांचे वंशज तथा मूळ पुरुष हभप मल्लापा वासकर यांनी केला. आजपर्यंत या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बोरगावमधून दिंडी निघते. महाशिवरात्री निमित्त येथे लाखो भाविकांची गर्दी जमते. येथे महाराष्ट्रातून व बाहेरील राज्यातूनही भक्तगण येतात. या मंदिराची बांधकाम शैली ही दाक्षिणात्य पद्धतीची आहे, जसे की तुळजापूर येथील तुळजाभावनी मंदिर, शेगूडचे खंडोबा मंदिर.
ज्ञानेश्वरांचा ज्ञानोबा झाला, तुकारामांचा तुकोबा झाला, तसाच संगमेश्वराचा संगोबा झाला, असे म्हटले जाते. येथे श्रावणी सोमवारी खूप मोठी गर्दी होत असते. प्रत्येक सोमवारी पंचक्रोशीत भक्तगण दर्शनासाठी येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने दर्शनासाठी मंदिर बंद आहे. यंदाची महाशिवरात्रीची यात्रा भरली नाही. या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; परंतु त्याला यश आले नाही. तालुक्यातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आदिनाथ महाराज नावाने स्थापन झाला; मात्र तीर्थक्षेत्र दर्जा नसल्याने या मंदिर परिसराचा जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही.
आदिनाथ मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी या भागातील अनेक जणांनी प्रयत्न केले. परंतु, त्याला यश येत नाही. या मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा नसल्याने मंदिर परिसराचा जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही. श्रीक्षेत्र आदिनाथ महाराज मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत. या मंदिराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होऊ नये, एवढी अपेक्षा आहे.
- ऍड. शशिकांत नरुटे, बोरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर
जवळची प्रेक्षणीय ठिकाणे...
उजनी धरण : उजनी धरणाचा संपूर्ण बॉकवॉटर हा करमाळा तालुक्यात आहे. या बॅकवॉटरमध्ये अनेक ऐतिहासिक वाडे, मंदिरे आहेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे कुगाव येथील इनामदार वाडा. या बॅकवॉटरकडे पर्यटकांना आकर्षित करून घेणारे फ्लेमिंगो व परदेशी पाहुणे पक्षी दरवर्षी येथे हजेरी लावतात. या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी हजारो पर्यटक तसेच अभ्यासक भेट देत असतात.
कमलाभवानी मंदिर : करमाळा शहराच्या जवळच कमलभवानी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम करताना 96 हा आकडा शुभ मानून मंदिराची उभारणी केली आहे, जसे की 96 खांब, येथील 96 पायऱ्यांची विहीर वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक आहे. नवरात्र उत्सवात येथे मोठा उत्सव भरतो. तसेच वर्षभर येथे भाविकांची गर्दी असते.
शनी मंदिर-पोथरे : करमाळ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले पोथरे येथील शनी मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर पुरातन व ऐतिहासिक आहे. "सैराट' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण याच परिसरात झाले असून, कमलाभवानी मंदिरातील 96 पायऱ्यांची विहीर, उजनी धरण, देवळाली, चिकलठाण, बिटगाव (वांगी) येथील परिसर या चित्रपटात दाखवला आहे. त्यामुळे हा परिसर राज्यभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
चिकलठाणचे कोटलिंग मंदिर : उजनी धरणाच्या काठावर वसलेले चिकलठाणचे कोटलिंग मंदिर भाविक आणि पर्यटकांना पाहण्यासारखे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.