उ. सोलापूर : सोलापूर बाजार समितीतील हमालांनी दर वाढवावे, या मागणीसाठी गुरुवारी रात्री अचानक संप पुकारला. यामुळे शेतकरी तसेच वाहन चालकांना अर्धी रात्र वाहनातच बसून काढावी लागली.
हमालांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे शुक्रवारी बाजारातील लिलाव यंत्रणा कोलमडली. त्यात विक्रमी कांदा आवक झाल्याने किती कांदा आला, याचा हिशेब लावणे प्रशासनाला कठीण झाले. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला.
दर वाढवून मिळावे या मागणीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी गुरुवारी सायंकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. गुरुवारी लिलाव बंद ठेवण्यात आल्यामुळे सायंकाळी कांदा घेऊन आलेल्या वाहनांची रांग बाजार समितीच्या आवारात लागली.
मात्र हमालांच्या पवित्र्यामुळे शेतकरी तसेच कांदे वाहणाऱ्या वाहनचालकांची भंबेरी उडाली. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू राहिला. मध्यरात्री दरवाढीचा निर्णय मान्य झाल्यानंतर कांदा उतरवून घेण्यास सुरवात झाली.
मात्र या सर्व गोंधळामुळे शुक्रवार सकाळपर्यंत बाजाराच्या प्रवेशद्वारा बाहेरही कांद्याची वाहने उभी राहिली. या सर्व गोंधळामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव सकाळी दहाऐवजी दुपारी दोननंतर करण्याचा निर्णय घेतला.
बाजारात येणाऱ्या कांद्याचा महापूर ओसरत नसल्यामुळे कांद्याच्या दरातील घसरण सुरूच राहिली. बुधवारच्या तुलनेने आज कांद्याच्या दरात प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपयांची घट झाल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे दर घसरणीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीतील ढिसाळ कारभारामुळे आणखीनच त्रास सहन करावा लागला.
शुक्रवारी बाजार समितीमध्ये ११७७ ट्रक कांद्याची आवक झाली. या कांद्याला १०० रुपये ते ३४०० प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. सरासरी दर मात्र १६०० रुपये इतकाच राहिला. मात्र बाजारात पंधराशे ट्रकपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली आहे, अशी अफवा पसरवून कांद्याचे दर पाडण्याचे षडयंत्र रचले गेले आहे, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या काही वर्षापासून बाजार समितीला पूर्णवेळ सचिव उपलब्ध नसल्यामुळे प्रभारी सचिवाच्या खांद्यावर कारभाराची धुरा आहे. सक्षम अधिकारी नसल्यामुळे बाजार समितीतील व्यवस्था कोलमडत आहे. अशा आणीबाणीच्या स्थितीत कांदा विभाग प्रमुखही रजेवर आहेत. परिस्थिती सुधारण्यासाठी प्रभारी सचिव दत्तात्रय सूर्यवंशी हे प्रयत्न करताना दिसत असले तरी त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत.
शेतकऱ्यांच्या जिवावर बाजार समितीचा गाडा चालतो, असे तावातावाने सांगितले जात असले तरी बाजार समितीच्या आवारात येणारा शेतकरी हा सर्वच घटकांसाठी भक्ष बनला आहे. गुरुवारी रात्री हमालांनी अचानक हमाली वाढवून द्यावी यासाठी संप केला, याचा फटका फक्त शेतकऱ्यांना बसला. हमालांच्या या आंदोलनामुळे त्यांना दरवाढ मिळाली, अडत्यांना त्यांची अडत मिळाली, बाजार समितीला सेस मिळाला, खिसा कापला गेला मात्र शेतकऱ्याचा.
सुरवातीला अवकाळी पावसाने, त्यानंतर केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणाने, यानंतर व्यापाऱ्यांनी आणि आता हमालांनी शेतकऱ्यांच्या कांद्याची माती केली. आमच्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना जगण्यासाठी कांद्याशिवाय दुसरे पीक नाही. मात्र सर्वच घटकांनी आमची लूट सुरू केल्यामुळे आम्ही जगायचे कसे.
- राजूभाई मुलाणी, शेतकरी, अकोलेकाटी, ता. उत्तर सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.