सोलापूर : डिसेंबर संपला की जानेवारीपासून इयत्ता दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी सुरू होते. अभ्यासक्रम आता अंतिम टप्प्यात असून विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू झाल्या आहेत. शिक्षकांकडूनही विषयनिहाय परीक्षेच्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. पण, विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता पहिल्यांदा स्वत:चे शारीरिक व मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याला प्राधान्य द्यायला हवे. पाठांतरापेक्षा नोट्स काढून त्याचा अभ्यास केल्यास निश्चितपणे गुण वाढतील, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दहावी- बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंटच. बोर्डातील गुणांच्या टक्केवारीवरून त्यांच्या भविष्याची वाटचाल निश्चित होते. त्यामुळे पालकांसोबतच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेबद्दल भीती व चिंता राहते. बोर्डाच्या परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण न घेता आत्मविश्वासाने शारीरिक व मानसिक स्थिती तथा आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याला प्राधान्य द्यायला हवे. पालकांनी मुलांच्या परीक्षा सुरू असताना घरात सकारात्मक वातावरण राहील, याकडे अवश्य लक्ष द्यावे. या काळात घरात अजिबात वादविवाद होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना नकारात्मक बोलून त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न न करता त्यांना प्रोत्साहन द्यावे, असेही शिक्षणतज्ज्ञ सांगतात.
दहावी- बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी सात्त्विक आहार, पुरेशी झोप घ्यायला हवी. कुटुंबातील वातावरण सकारात्मक हवे आणि प्रत्येक तासाच्या अभ्यासानंतर काही मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा अभ्यासाला बसावे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवरच यश-अपयश अवलंबून असते.
- डॉ. विणा जावळे, प्राचार्य, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर
इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. १ मार्च ते २६ मार्च या काळात दहावीची परीक्षा संपणार आहे. तत्पूर्वी, फेब्रुवारी महिन्यात त्यांची प्रात्यक्षिक पार पडणार आहे. विशेष बाब म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांचे भाषा विषयांचे पेपर झाल्यानंतर पुढील विषयांच्या प्रत्येक पेपरसाठी एक ते दोन दिवसाचे अंतर ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडायला नको म्हणून बोर्डाने त्यादृष्टीने वेळापत्रक तयार केले आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. २१ फेब्रुवारी ते १९ मार्चपर्यंत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालणार आहे. त्यात कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक शिक्षण अशा शाखांच्या परीक्षांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे बोर्डाच्या वेळापत्रकानुसार २१ फेब्रुवारीला इंग्रजी, २२ फेब्रुवारीला हिंदी, २३ फेब्रुवारीला मराठीचा पेपर होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रत्येक दोन पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात आले आहे.
चांगल्या गुणांसाठी ही पंचतत्त्वे
प्रत्येक तासाच्या अभ्यासानंतर पाच ते दहा मिनिटांची विश्रांती घ्यावी. सलग अभ्यास फारसा लक्षात राहत नाही. परीक्षा काळात मोबाईलचा वापर टाळावा.
बॅलन्स डायट हवे, बाहेरील काही न खाता घरातील पदार्थ खावेत, जेणेकरून आजारी पडणार नाहीत. (सात्त्विक व पौष्टिक आहार हवा), पाणी भरपूर प्यावे.
रात्री साडेदहापर्यंत झोपावे आणि पहाटे साडेपाच वाजता उठून अभ्यास केल्यास स्मरणशक्ती चांगली राहते. दररोज किमान सात ते आठ तासांची झोप हवी.
अपेक्षित संचमधील मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा सराव करावा; सर्व विषयातील महत्त्वाच्या प्रश्नांचे नोट्स काढून त्याचा सराव जरुरीचा.
दररोज सकाळी १५ मिनिटे व सायंकाळी १५ मिनिटे शांतपणे ध्यान करावे. मनावर कोणताही ताण नको, थकवा येईल अशी कामे या काळात टाळावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.