सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावोगावी बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहेत. गुळपोळी (ता.बार्शी) येथे पंधरा दिवसांपूर्वी बोगस डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका मुलीचा मृत्यू झाला असून मुलीचे वडील व सामाजिक कार्यकर्त्यांनी याप्रकरणी आंदोलन केल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पश्चिम बंगाल येथून आलेले डॉक्टर गावागावांत दवाखाने थाटून बसले आहेत. त्याबरोबरच अनेक स्थानिक डॉक्टरदेखील कोणतीही पदवी नसता ॲलोपॅथीचे उपचार करत आहेत. तर अनेक डॉक्टरांकडे बी.ए.एम. एस.ही आयुर्वेदिक क्षेत्रातील पदवी घेऊन ॲलोपॅथीचे उपचार करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा जीव धोक्यात असून दुसरीकडे या बोगस डॉक्टरांकडून झटपट आजार बरा करण्यासाठी रुग्णाचे वय, वजन याचा विचार न करता औषध गोळ्यांचा मारा केला जात आहे. या औषधांचा रुग्णांच्या किडणीसह अनेक अवयवांवर दुष्परिणाम होत आहेत. यामुळे ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
आंदोलनानंतर मृत्यूची दखल
गुळपोळी (ता.बाशी) येथे २ नोव्हेंबर रोजी बोगस डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे स्वामिनी नामदेव तुपसमिद्रे या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तरीदेखील प्रशासकीय यंत्रणेकडून या घटनेची कोणतीही दखल घेतली गेली नाही. याप्रकरणातील बोगस डॉक्टर विकास भादेकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मुलीचे वडील नामदेव रंभाजी तुपसमिद्रे व सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत चिकणे यांनी बाशी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिता बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अनुसार बोगस डॉक्टर विकास भादेकर याच्यावर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पदव्यांबाबत जनजागृती आवश्यक
बॅचलर ऑफ इलेक्ट्रो-होमिओपॅथी मेडिसिन आणि सर्जरी तथा बी.ई.एम.एस. ही पदवी संबंधित डॉक्टरच्या दवाखान्यात आढळून आली आहे. ही पदवी ॲलोपॅथी उपचार करण्यास पात्र नसताना मागील अनेक वर्षांपासून संबंधित डॉक्टरची प्रॅक्टिस जोरात सुरू होती. चारहून अधिक बेड असलेले क्लिनिक गुळपोळी गावात सुरू होते. अनेक गावात सुरू असलेल्या छोट्या मोठ्या डॉक्टरांकडे पदवी आहे का व ती ॲलोपॅथीचे उपचार करण्यासाठी सक्षम आहे का, याची प्रत्येक गावात तपासणी करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.