सोलापूर : नवतारुण्याच्या तिच्या आशा फुललेल्या.....अचानक सारे काही संपते....तेव्हापासून ती स्वतःलाच हरवून बसलेली......तेथून सुरु झाली एक अंधार यात्रा....तब्बल दोन दशकांनी ती आता पुन्हा अंधार संपवून स्वतःच्या जीवनात नव्या उमेदीने दाखल झाली आहे. ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरीखोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश’ मराठी भाषेमधील या अर्थपूर्ण गाण्याच्या शब्दांप्रमाणे सगळे काही घडले आहे. बदलले आहे.
शहरातील एका भागात ती कोणतीही ओळख न सांगता फिरत होती. जे जवळ येतील त्यांना ती शिव्या द्यायची. माणसाबद्दल तिला कमालीची किळस बसली होती. कोणी सहानुभूतीने जेवण दिले तरीदेखील त्यांना ती शिव्या देत होती. या स्थितीत कोणत्याही आजारात ती सापडण्याची भीती होती. निराशा, वेदनेने तिचे मन अंधारडोहात बुडालेले होते.
परिसरातील संवेदनशील नागरिक मात्र तिच्यावर लक्ष ठेवून, तिच्यावर कोणतेही संकट बेतू नये याकडे लक्ष ठेवून होते. एका नागरिकाने संभव फाउंडेशनला या प्रकाराची माहिती दिली. फाउंडेशनचे अतिश व इतर कार्यकर्त्यांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण संवाद सुरु होत नव्हता.
तोपर्यंत परिसरातून तिची माहिती मिळवली. तेव्ही ती एका वस्तीतील एका कुटुंबातील मुलगी असल्याचे समजले. मग तिच्या कुटुंबीयांनी तिला उपचारानंतर घरी परत घेण्याची तयारी दर्शवली. तिच्या उपचारासाठीचे प्रयत्न सुरु झाले. पोलिसांनी देखील पुनर्वसन केंद्रात उपचार सुरु करण्यासाठी एक महिला पोलिस सोबत दिला. तब्बल आठ महिने मानसोपचार सुरु राहिले.
हळूहळू ती सामान्य स्थितीत येऊ लागली. वागणे, बोलण्यातील हालचाली सामान्य होऊ लागल्या. तिचे मन शांत होऊ लागले. विवाह मोडल्याच्या कारणातून निराशेच्या अंधाराने तीला दोन दशके घेरून ठेवल्याचा उलगडा नंतर समोर आला.
मग कार्यकर्त्यांनी पुनर्वसन केंद्रातील उपचारानंतर तिला घरी परत आणण्याचे ठरवले. एक दिवस ती तीच्या स्वतःच्या घरी दाखल झाली तेव्हा तिच्या मनातील आनंद अश्रुंमधून ओघळत होता. तिच्या उपचाराचे काम अजूनही सुरु आहे. पण पहिल्याच टप्प्यात औषधांनी तिला सामान्य स्थितीत जगण्याची ऊर्जा दिली.
त्या ऊर्जेवर तिने आता नव्या जीवनाची सुरवात केली आहे. तब्बल वीस वर्षे घराबाहेर अन् कुंटुंबियाशिवाय राहिलेल्या तरूणीला आता तिचे कुंटुंबातील सदस्य मिळाले,शिवाय त्या कुटूंबामधील सदस्यान आपल्यापैकीच दुरावलेली सदस्या पुन्हा मिळाली हे सगळे आनंद व्दिगुणीत करणारे घडले.
विवाह मोडल्याच्या कारणावरून ती अभागी तरुणी तब्बल दोन दशके अंधारलेल्या काळ्याकुट्ट दिशांनी भरकटत होती. मानसिक स्वास्थ हरविल्यामुळे ती सर्वसामान्य जीवन जगत नव्हती. तिच्यासाठी हे सुंदर जग अन् आयुष्य राहिलेच नव्हते. मात्र सगळेच बदलून गेले आहे. अशातच संभव फाउंडेशनच्या अविरत परिश्रमाला यशाचे घुमारे फुटले. तिचे आयुष्य बदलून गेले. आठ महिन्यांच्या मानसोपचारानंतर ती तरुणी बरी झाली.
सामान्य स्थितीत जगण्याची तिला ऊर्जा मिळाली. कित्येक वर्षानंतर ती आता तिच्या घरी आली. सर्वांसोबत राहू लागली आहे. तिच्या घरी येण्याने आणि सामान्य राहण्याने घरदेखील आनंदले आहे. तिच्यासह सगळेच आनंदी आणि समाधानी झालेत. ‘भले बुरे जे घडून गेले, विसरुन जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर’ मराठी भाषेमधील अत्यंत अर्थपूर्ण आणि सुंदर अशा गाण्याचा या परिवारात आता प्रत्यय येतोय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.