Solapur City North Assembly Election 2024 :पवन कल्याण, सुशीलकुमार शिंदेंमुळे शहर उत्तरचा प्रचार शिगेला

Solapur North vidhan Sabha Election 2024 : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मविआच्या महेश कोठेंनी भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुखांसमोर कडवे आव्हान उभे करताना जशास तसे उत्तर देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
SushilKumar Shinde
SushilKumar Shindesakal
Updated on

सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मविआच्या महेश कोठेंनी भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुखांसमोर कडवे आव्हान उभे करताना जशास तसे उत्तर देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

भाजपच्या देशमुखांच्या प्रचारासाठी पवन कल्याण यांचा तेलगु भाषिक बहुल भागात रोड शो आयोजित करून तेलगु मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याला सडेतोड उत्तर म्हणून तितकेच अनुभवी असलेल्या कोठेंनी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना देशमुखांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शेळगी भागातील प्रचारसभेसाठी आमंत्रण देत तोडीस तोड उत्तर दिले.

SushilKumar Shinde
Solapur Assembly Election 2024 : महायुती, महाविकास आघाडीतच ‘काँटे की टक्कर’

शेळगी भाग लिंगायत बहुल म्हणून तर जुना विडी घरकुल भाग तेलगु भाषिकांचा म्हणून ओळखला जातो. देशमुखांनी तेलगु मते खेचण्यासाठी पवन कल्याण यांची तर कोठेंनी लिंगायत मते खेचण्यासाठी शिंदेंची खेळलेल्या चालीमुळे शहर उत्तरची लढत यंदा देशमुखांसाठी सोपी नसल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे मनसेकडून उभे असलेल्या परशुराम इंगळे व अपक्ष शोभा बनशेट्टी यांनी मतदारांचा प्रत्यक्ष संपर्कावर भर दिला आहे. याच पद्धतीने बहुजन समाज पक्षाचे व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही प्रत्यक्ष संपर्कावर भर देत आपापल्या ताकदीने प्रचार सुरू ठेवला आहे. शेवटच्या दिवशी कोठे तेलगू सुपरस्टार अभिनेता प्रभास यांना आणण्याची चर्चा रंगली आहे. प्रभास यांचे येणे प्रचारातील मास्टर स्ट्रोक ठरण्याची शक्यता आहे. एकंदर शहर उत्तरच्या विधानसभा मतदारसंघात प्रचारातही तुल्यबळ लढाई मतदारांना अनुभवयाला मिळत आहे. या सर्व लढाईत अपक्ष उमेदवार कितपत मते खेचून कोणाला उपद्रव करतील याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

SushilKumar Shinde
Solapur Assembly Election 2024 : मत विभाजनाच्या फायद्या-तोट्यावरच विजयाचे गणित

दक्षिणमध्ये रंगला सर्वपक्षीयांचा प्रचार

देशमुख, काडादी, पाटील कार्यकर्ते आमने-सामने

सोलापूर : सोलापूर दक्षिण तालुक्यातील उमेदवारांचा जुळे सोलापुरातच सुपर संडे प्रचार रंगला. यावेळी कार्यकर्त्यांच्या मोठ-मोठे रॅली अन् याच परिसरात मंगलकार्यालय अधिक असल्याने लग्नाचा बॅंडबाजा अन् प्रचारातील हलगीच्या निनादाने जुळे सोलापूर दुमदुमून निघाले.

दक्षिण सोलापुरात महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे वातावरण निर्मितीमध्ये पुढे आहेत. धर्मराज काडादी यांनी भव्य पदयात्रा काढली. ओम गर्जना चौक, सैफूल, विजापूर रोड मार्गे आयटीआय भारतीय विद्यापीठ मार्गे गोविंदश्री मंगल कार्यालयात समारोप केला. तर सुभाष देशमुख यांनी जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांच्या बैठकांवर जोर दिला होता.

अमर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जुळे सोलापुरातील नागरिकांच्या घरोघरी प्रचार केला. इतर अपक्ष उमेदारांनी वाजतगाजत जुळे सोलापुरात रॅली काढली. या परिसरात मंगलकार्यालय अधिक असल्याने त्यातच रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने लग्नाचा बॅंडबाजा अन् प्रचारातील हलगीचा नाद कडाडला. गर्दी, फटाके अन् आवाजाने वऱ्हाडी आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. काही वऱ्हाडी प्रचाराच्या ठिकाणी आले तर रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेले कार्यकर्ते मंगलकार्यालय परिसर गाठले. अनेक ठिकाणी विविध पक्षातील उमेदवारांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. सुपर संडेच्या प्रचारामध्ये अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळाल्या.

मध्यमध्ये उमेदवार मतदारांच्या घरोघरी

सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे चेतन नरोटे, एमआयएमचे फारुक शाब्दी, भाजपचे देवेंद्र कोठे व माकपचे नरसय्या आडम यांच्यात चौरंगी लढत होत आहे. याशिवाय अन्य १५ उमेदवारही रिंगणात आहेत. आता मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. उमेदवारांनी रविवारची संधी साधत होम टु होम भेटी व पदयात्रेतून मतदारसंघातील प्रत्येकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले.

शहर मध्य या मतदारसंघातून सध्या २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत काँग्रेस, माकपच्या एकाही वरिष्ठ नेत्यांची सभा सोलापूर शहरात झालेली नाही. दुसरीकडे एमआयएमचे उमेदवार तौफिक शेख यांनी पक्षाचे प्रमुख खासदार असुद्दीन आवैसी यांची सभा घेतली आहे. भाजप उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, हैदराबादच्या माधवी लता यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभा सोलापूर शहर हद्दीत झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतली. याशिवाय शहर मध्यमधील उर्वरित १५ उमेदवार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आज प्रचाराचा शेवटचा दिवस

उमेदवारी माघारीनंतर म्हणजेच ४ नोव्हेंबरपासून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा धडाडल्या. उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक गावात, नगरात, वाड्या-वस्त्यांवर पोचून प्रचार केला. पक्षातील वरिष्ठ न त्यांनाही प्रचारासाठी बोलावून सभा घेतल्या. आता उद्या (सोमवारी) सायंकाळी सहा वाजता प्रचार संपणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी मिनिट टु मिनिट नियोजन करीत त्यांनी मतदारसंघातील प्रमुख स्थानिक नेत्यांच्या साथीने शेवटचे पुन्हा एकदा प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचेही नियोजन केले आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.