Dance Bar : आम्ही आहोत ‘सकाळ’च्या डान्स बार विरोधी भूमिकेसोबत !

सोलापुरच्या समाजमनाचा हुंकार; चिंता वाढविणाऱ्या डान्स बार बंदीसाठी कायद्याची कठोर पावले उचलायला हवी
Solapur dance bar crime police Bar dancer sakal ban dance bars
Solapur dance bar crime police Bar dancer sakal ban dance bars Esakal
Updated on

सोलापूर : आजवर नेहमीच समाज मनासोबत राहणाऱ्या अन् सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘सकाळ’ ने डान्स बारच्या विरोधात मोहीम उघडली. डान्स बारच्या परिणामांचं जळजळीत सत्य तमाम सोलापुकरांपुढं आणलं.

‘सकाळ’च्या या भूमिकेचे कौतुक करीत संवेदनशील सोलापूरकरांनी डान्स बार विरोधी लढ्यात ‘सकाळ’ सोबत राहण्याचं ठरवलंय. याच्या पार्श्वभूमीवर, काही संवेदनशील मनाच्या सोलापूरकरांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया….अर्थात त्यांच्याच शब्दात..!

संगीत कलेच्या नावाखाली सुरु असलेल्या डान्स बारच्या नादाला लागल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, अनेकजण कंगाल झाले आहेत. भिकेला लागले आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर काही तरुण पहाटे उशिरापर्यंत डान्स बारमध्ये पैशांची उधळण करून मद्यधुंद होऊन गावाकडे परत जाताना रस्ते अपघातात मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलेही डान्स बारच्या मोहपाशात अडकली आहेत. डान्स बारचा मार्ग तरुणाईला उद्ध्वस्तीकरणाकडे नेणारा आहे. परंतु, तरीही तरुणाई यापासून धडा घेत नाही, याबद्दल चिंता वाटते. कायदा राबवण्यात फार कठोर पावले उचलली तरच काहीतरी उपयोग होईल. त्याच प्रमाणे समाजाने अशा नादाला लागलेल्या तरुणांचे प्रबोधन केले तरच काहीतरी मार्ग निघेल. पालकांच्या दृष्टीने सतत चिंतेचा विषय असलेला ज्वलंत प्रश्न समाजासमोर उपस्थित केल्याबद्दल ‘सकाळ’ चे अभिनंदन !

- ॲड. धनंजय माने, ज्येष्ठ विधीज्ञ, सोलापूर

श्री छगन भुजबळ राज्याचे गृहमंत्री असताना मुख्यत्वे सोलापूरसह राज्यात डान्स बार ला परवानगी देऊ नये, असा फॅक्स तत्कालीन वेळी मी केला. त्याचा परिणामदेखील उमटला होता. सध्याचे बरेच माजी नगरसेवक आणि काही पुढारी तसेच काही पोलिस कर्मचारी या बेकायदेशीर व्यवसायामध्ये असल्याचे समजते.

डान्स बारच्या पायी काही दिवसापूर्वी एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. अनेक संसार धुळीस मिळाले आहेत. कित्येकजण देशोधडीला लागले आहेत. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. तरी शासनाने स्वर्गीय आर. आर. पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन डान्स बार बाबत धोरण ठरवावे. डान्स बार कायमचे बंद करावेत.

-दास शेळके, ज्येष्ठ सदस्य, कार्यकारिणी सल्लागार समिती, मराठा महासंघ

Solapur dance bar crime police Bar dancer sakal ban dance bars
Solapur Dance Bar : डान्स बार बहाद्दर भूमिहीन; बारबाला मात्र थ्री- थ्री बीएचके लक्झरी फ्लॅटच्या मालकीण!

सिध्देश्‍वरांची कृपा लाभलेल्या सोलापुरात भाविक, पर्यटक येत असतात. पवित्र हेतुने ते सोलापुरात येतात. येथे मुक्काम करुन ते तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्री जातात. सोलापूरचे पावित्र्य जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. डान्स बार संदर्भात वाचून अक्षरश: घृणा येते.

डान्स बारला स्वर्गीय आर.आर.पाटील यांनी राज्यात बंदी घातली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात डान्स बार चालु राहणं हे त्यांच्या आणि भाजपच्या संस्कृतीला शोभणारं नाही. सोलापुरच्या डान्स बारला ‘सकाळ’ने वाचा फोडली. डान्स बार ताबडतोब बंद झाले पाहिजेत. डान्स बारमुळे सोलापूरची मुळची आदर्श संस्कृती नामशेष होत आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत. अनेकांची घरे- दारे जात आहेत. युवा पिढी भरकटली जात आहेत. डान्स बार बंद नाही झाले तर आम्ही महिला गांधीगिरी मार्गाने आंदोलन करु.

- विद्या लोलगे, राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्षा

सोलापुरात बोकाळलेले अनधिकृत डान्स बार हे केवळ सामाजिक विकृतीचे द्योतक नसून गेल्या ३० ते ४० वर्षात जगप्रसिद्ध कापड गिरण्या बंद पडून व त्यानंतर कोणतेही उद्योग सोलापुरात न आल्यामुळे झालेल्या भकासपणाचे वास्तव आहे.

दररोज लाखो रुपये येथे ओढून घेतले जातात व सोलापूर मधील बकाल जनता अजूनही देशोधडीला लागत आहे. कित्येकांचे संसार उदधवस्त झाले आहेत. मग असा पैसा कोठून येतो आणि कोठे जातो? तसेच बांगलादेशमधील अनधिकृत लोक सोलापुरात वास्तव्य कसे करू शकतात? हा सोलापूरच्या सुरक्षेच्या बाबतीतील अतिशय चिंतेचा विषय बनला आहे.

त्यावर सोलापुरातील जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व गृह मंत्रालयाने तत्काळ बंदी घालणे गरजेचे आहे. सोलापुरातील होटगी रोड विमानतळ तत्काळ सुरु झाल्यास येथे अनेक उद्योगधंदे येतील व अशा भरकटलेल्या तरुणांना काम मिळेल व सोलापूरची प्रगती होईल असा केवळ विश्‍वास नाही तर खात्री वाटते.

- डॉ. संदीप आडके,अस्थिरोग तज्ज्ञ, तथा समाजसेवक सोलापूर

Solapur dance bar crime police Bar dancer sakal ban dance bars
Solapur Dance Bar : डान्स बार बहाद्दर भूमिहीन; बारबाला मात्र थ्री- थ्री बीएचके लक्झरी फ्लॅटच्या मालकीण!

सोलापूर शहर परिसर व जिल्ह्यातील अनधिकृत,बेकायदेशीर डान्स बारबद्दल ‘सकाळ’ने जी लेखमाला चालू करुन एका सामाजिक विषयाला वाचा फोडली याबद्दल सकाळच्या संपूर्ण टीमने अभिनंदन व कौतुक. गेली काही वर्षे बंद असलेले डान्स बार पुन्हा सुरु झाले याबद्दल संवेदनशील लोक हे पोलिस खात्याला दोष देतात.

पण याचे दुष्परिणाम हे सामाजिक आहेत व यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न सुद्धा निर्माण होतात, म्हणून हा प्रश्न जितका पोलिस खात्याचा आहे, तितकाच तो समाजाचासुद्धा आहे. सोलापूर जिल्ह्यात फारसे उद्योग-व्यवसाय नसताना केंद्र सरकारच्या विविध योजनेसाठी भूमी अधिग्रहण मोठ्या प्रमाणात केले जात आहे व त्यातून अचानक आलेला मोठा पैसा हा डान्स बार चालण्यामागचे मुख्य कारण आहे.

शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देताना, त्यांना आर्थिक साक्षर करणे गरजेचे आहे व हा पैसा सरकारने टप्प्याटप्प्याने दिला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही आणि अचानक अनुत्पादक पद्धतीने आलेला पैसा हा गैर मार्गाने खर्च होताना दिसतो.

यातून एक संपूर्ण पिढी बरबाद होत आहे. याच करिता या प्रश्नाकडे राजकीय नेत्यांनी लक्ष घालून समाज धुरिणांना हाताशी धरून युवा पिढीला प्रबोधन करण्यावरती भर दिला पाहिजे. पोलिस त्यांचं काम करतीलच. पण एक समाज म्हणून आपली सुद्धा जबाबदारी नाकारता येत नाही.

- योगिन गुर्जर,समाजसेवक, पुणेरी सोलापूरकर

सोलापूरच्या तरुणांना देशोधडीला लावणारा उद्योग म्हणजे ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालत असलेले बेकायदेशीर डान्स बार. यामध्ये मुली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्‍लील डान्स करतात व तरुण मद्य धुंद अवस्थेमध्ये पैशाची उधळण करायला सुरवात करतो, जोपर्यंत ग्राहकाच्या खिशातील पैसा संपत नाही, तोपर्यंत हा नंगानाच असा चालू असतो.

ऑर्केस्ट्रा बार मालक पहाटे चार वाजेपर्यंत बेकायदेशीर डान्स बार चालू ठेवतात. पोलिसांना ‘लक्ष्मी’ दर्शन झाल्यामुळे पोलिस ही गप्प असतात. कुठलीही कारवाई होत नाही, अशा बेकायदेशीर प्रकारे चालवणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार चालकांवरती कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.

- रणजित चौगुले, युवा व्यावसायिक तथा समाजसेवक

Solapur dance bar crime police Bar dancer sakal ban dance bars
Solapur News : मंगळवेढा चोरीच्या तपासात 12 घरफोड्या उघड, 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत; दोन पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची’ असे बंगाली ललना म्हणू लागल्या व येथील भूमिपुत्र त्यांच्या नादी लागून पोटासाठी वणवण भटकू लागले ही भयावह शोकांतिका थांबवायची असेल डान्सबार बंद झाले पाहिजेत. आज काही नर्तिकांचा लावणीच्या नावाखाली जो नंगानाच चाललाय तो थांबला जावा.

सामाजिक जे‌ ध्रुवीकरण चालले आहे, त्यास पायबंद असायला हवा. तरच तरुणाई या गोष्टी पासून अलिप्त राहील. आदर्श व दिशादर्शक जीवन जगेल. डान्स बार संस्कृतीमुळे सोलापूरची मुळची संस्कृती धोक्यात आली आहे. येथील संस्कृती तसेच तरुण पिढी वाचली पाहिजे.

- डॉ. बबनराव कांबळे, पशुसेवक तथा संचालक सुमेध पेट क्लिनिक, जुळे सोलापूर

Solapur dance bar crime police Bar dancer sakal ban dance bars
Solapur News : मोहोळ बस स्थानक बनले चोरांचे आगार विविध उपाय योजनांची गरज

डान्स बारचं वृत्तांकन उपमुख्यमंत्री फडणवीसापर्यंत

‘सोलापुरी छमछम : उद्ध्वस्त संसार अन् भिकेकंगाल तरुणाई ’ या वृत्तमालिकेच्या शीर्षकाखाली ‘सकाळ’ ने सोलापुर शहर- जिल्ह्यातील डान्स बारचे ‘पोस्ट मार्टम’ केले. या संदर्भातील वृत्तांकन मंगळवारी (ता. १६ ) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. विशेषत्वे, हे वृत्तांकन त्यांनी पाहिले. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या विद्या लोलगे यांनी हे वृत्तांकन श्री फडणवीस यांना पाठवून सोलापुरातील डान्स बारचा प्रकार थांबायला पाहिजे, अशी मागणी केली. दरम्यान उपमुख्यमंत्री काय भूमिका घेताता, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.