शिवाजी भोसले : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर - कापड उद्योगामुळे कधी काळी सोन्याचा धूर निघणारे गिरणगाव सोलापूर हे कापड गिरण्या बंद पडण्यातून बकाल झालं. तद्नंतर गेल्या पंधरा वर्षात औद्योगिक पिछाडीमुळं या शहराची अक्षरश: वाताहात झाली. तरुणाईच्या हाताला इथं काम धंदा नाही. दोन वेळेला हाता-तोंडाची गाठ पडणं इथं कित्येकांना मुष्कील आहे.
बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न इथला आहे. इथलं समाजमन अस्वस्थ अन् भयावह चिंतेत आहे. हे कमी म्हणून की काय? ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणारे इथले डान्सबार आता या शहराच्या मुळावर उठलेत. डान्स बारच्या नादात इथल्या अनेक तरुणांचे संसार अक्षरश: उद्ध्वस्त झालेत. तरुणाई भिकेकंगाल झाली आहे.
विशेषत्वे, डान्स बारच्या नादात स्वत:चे घरदार, जागा, जमीन जुमला हे सगळे फुकून टाकून स्वत:च्या संसाराची राख रांगोळी इथल्या तरुणांनी केली. तरुणाई भिकेकंगाल झाली. बारबालांवर उधळण्यासाठी लागणारे पैसे खासगी सावकारांकडून घेतले.
ते फेडता आले नाहीत, म्हणून सावकारांच्या तगाद्याला कंटाळून काहीजणांनी सोलापूर सोडले. तर काहीजणांनी कर्जाच्या पायात स्वत:चे आयुष्य संपविले. बायको-लेकरं, बिचारे वृध्द आई-वडील यांना अनाथ केलं. एवढी भयावह परिस्थिती सोलापुरात डान्सबारमुळं झाली आहे. डान्स बार हा सोलापूरच्या सामाजिक चिंतेचा विषय बनला आहे.
दरम्यान, अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाह तरुणाईला भीकेकंगाल बनविणारे इथले बेकायदा डान्सबार चालतात कसे ? हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. परवानगी ऑर्केस्ट्रा बारची असताना रात्रीपासून ते पहाटेपर्यत डान्स बार बिनधास्तपणे चालविण्याचे धाडस बारचालक दाखिवतातच कसे?
असा सवाल सूज्ञ सोलापूरकरांमधून विचारला जातोय. सोलापूर शहर हद्दीबरोबरच ग्रामीण भागात काही ठिकाणी राजरोसपणे चालणाऱ्या या डान्स बाराची ‘खाकी’ वर्दीला खबर कशी नसावी? हा ‘कळी’चा मुद्दा आहे.
कामाच्या ताणामुळे आपल्या हद्दीमधील डान्सबारकडं ‘खाकी’ वर्दीचं दुर्लक्ष होत असावं का? ऑर्केस्ट्रा बारमध्ये चालणाऱ्या ‘खऱ्या उद्योगा’ची खाकीवर्दीला कल्पना कशी नसावी, असे सवाल सूज्ञ सोलापूरकरांना सतावत आहेत.
पुढे ‘लाल’ दिव्याच्या गाड्यांची रपेट अन् आत मात्र धुमाकूळ
सोलापूर शहर अन् ग्रामीण हद्दीमधील बहुतांश सगळे ऑर्स्केस्ट्रा बार पर्यायाने डान्स बार हे मुख्य रस्त्यांवर, हमरस्त्यावर आहेत. या बेकायदा डान्सबारच्या समोरुन दिवसा खास करुन रात्री पोलिसांच्या लाल दिव्यांच्या गाड्या सतत फिरत असतात. नेमक्या याचवेळी आत आक्षेपार्ह धुमाकूळ सुरु असतो. कायद्याची पायमल्ली उघडपणे होत राहते.
कायदा अक्षरश: पायदळी तुडविला जातो. हे सगळं होत असताना पोलिसांच्या गाड्यांना डान्सबारच्या ठिकाणी का ब्रेक लागत नसावा, बार चालविण्यासाठी सर्व सेटिंग लावण्यात आली, त्यातून हे होत असावं अशी चर्चा आहे.
महिन्याला ओतली जाते २० ते २५ पेटी ‘माया’
कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना डान्स बार उगीच चालत नाहीत म्हणे. प्रत्येक महिन्याला डान्स बार चालक हा दीड ते दोन पेटी ‘माया’ ओततो, प्रत्येक महिन्याच्या मंथलीच्या ‘माये’चा आकडा २० ते २५ पेटी असल्याचा बोलबाला आहे.
शिवाय जादा वेळ डान्स बार चालविणे, बारसंबंधी कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ठ असणे या संबंधीची ‘माया’ प्रत्येक वेळी वेगळी ओतावी लागते असादेखील बोलबाला आहे. शिवाय कायद्याचे रक्षक म्हणविणारांचे काही मित्र डान्स बारमध्ये हौशेसाठी वारंवार येतात, त्यांचा वेगळा ‘पाहुणाचार’ डान्सबार चालकांना करावा लागतो अशीदेखील चर्चा डान्सबार विश्वात आहे. अधूनमधून ओतावी लागते ती ‘माये’ची चिरीमिरी वेगळी.
‘खाकी’वर्दीला सुज्ञ नागरिकांचे काही सवाल
महाराष्ट्रात बंदी असताना सोलापुरात डान्सबार चालतातच कसे? डान्स बारला रात्री दीडपर्यंत परवानगी असताना पहाटेपर्यंत ऑर्केस्ट्रा बार चालतात कसे? डान्स बार चालविण्याचे धाडस चालक दाखितातच कसे? बेकायदा ऑर्केस्ट्रा बार चालविण्याला चालकांना आशीर्वाद तरी कोणाचे? डान्स बार ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर सगळंच काही ‘सेटिंग’ असल्याचा का येतोय प्रत्यय ? ऑर्केस्टा बारमध्ये दारु विक्रीला परवानगी कशी?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.