सोलापूर : शहराचे आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने एसटीपी प्रकल्प, बायोएनर्जी प्रकल्प या महत्त्वाच्या योजना आहेत. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांकडे महापालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांचा मूळ हेतू साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण रोखण्यासाठी सुरू केलेल्या या प्रकल्पांकडूनच पर्यावरणाची हानी होत असल्याचे दिसून येते.
शहरात अमृत योजनेंतर्गत देगाव (७० एमएलडी), कुमठे (७० एमएलडी) आणि प्रतापनगर (५० एमएलडी) या तीन ठिकाणी एकूण १९० एमएलडी क्षमतेचे एसटीपी प्रकल्प उभारण्यात आले. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरात आणणे आणि इतर जलस्रोतांमध्ये सांडपाणी मिसळून होणारे जलप्रदूषण थांबविणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. एसटीपी प्रकल्पामधून प्रक्रिया झालेले पाणी एनटीपीसीला देण्याचा करार महापालिकेने केला होता. मात्र, शहरातील ड्रेनेजलाइनचे काम अपूर्ण असल्याने या करारानुसार एसटीपी प्रकल्पाला आजतागायत गरजेनुसार सांडपाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे तिन्ही एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. प्रतापनगर येथील एसटीपी प्रकल्पातील पाण्यावर एकदाच प्रक्रिया करून परिसरातील कॅनॉलमध्ये सोडून देण्यात येते. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांची ओरड सुरू आहे.
तसेच तुळजापूर रस्त्यावरील भोगाव येथे ५८ एकरावर कचरा डेपो आहे. या ठिकाणी नऊ एकरावर देशातील पहिला बायोएनर्जी प्रकल्प उभारण्यात आला. या डेपोमध्ये दररोज २५० ते ३०० टन कचरा संकलित होतो. या कचऱ्यामध्ये प्लॉस्टिकचे प्रमाण सर्वाधिक आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती आणि खत तयार करण्याबरोबरच दैनंदिन संकलित होणारा कचरादेखील नष्ट करणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश होता. बायोएनर्जी प्रकल्पामध्ये प्रक्रिया होऊन साचलेल्या झिरो कचऱ्याच्या ढिगाला दरवर्षी उन्हाळ्यात आग लागते. नुकतीच मे महिन्यात या झिरो कचऱ्याच्या ढिगाला आग लागली अन् महिनाभर ही आग विझली नाही. प्रदूषित हवेने संपूर्ण शहराला घेरले. हा कचरा डेपो परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याबरोबरच पर्यावरणाला घातक ठरत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ८१ लाखांचा दंडही महापालिकेला केला होता. कचरा डेपोमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून ४८ कोटींच्या बायोमायनिंग प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु, अस्तित्वात असलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प महापालिकेच्या योग्य नियंत्रणाअभावी फेल ठरत असल्याचे दिसून येते.
सोलापूर कचरा डेपोबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर उपाययोजना म्हणून बायोमायनिंग प्रकल्प प्रभावी ठरणार आहे. शास्त्रीय पद्धतीने भूगर्भग्रहण आणि कचऱ्याचे योग्य विलगीकरण करण्यात येणार आहे. दोन वर्षात डेपोतील कचरा नष्ट होईल. नागरिकांच्या व पर्यावरणाच्या समस्या दूर होतील. अर्धवट कामामुळे एसटीपी प्रकल्पात सुरवातीला तांत्रिक अडचणी होत्या. त्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. सांडपाण्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया होत आहे.
- आयुक्त पी. शिवशंकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.