अक्कलकोट : जेऊर (ता. अक्कलकोट) येथील खंडप्पा चनमलप्पा वग्गे हे शाळेची पायरी देखील चढले नाहीत पण आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर यशस्वी शेती व विविध उद्योग करीत आता त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. वडिलोपार्जित असलेल्या तीन एकर शेतीची आता ५५ एकर एवढी शेती केली आहे. ज्यात अठरा एकर द्राक्ष बाग व पाच एकर डाळिंब शेती तर पंधरा एकर ऊस यांचा समावेश आहे. यशस्वी शेतकऱ्यासोबत ते आता पुणे विभाग द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी विराजमान झाले आहेत. शिक्षण नाही तसेच भांडवल नाही, असे सांगत बसण्यापेक्षा शून्यातून सुरुवात करून विलक्षण प्रगती करता येथे हे खंडप्पा वग्गे यांनी तरुण पिढीस दाखवून दिले आहे.
सुमारे वीस वर्षांपूर्वी दररोज दहा रुपये मजुरीवर परिसरातील शेतात शेतमजूर म्हणून आपल्या खंडप्पा वग्गे यांनी दैनंदिन जीवनास सुरुवात केली. त्याकाळी शेतीत विहीर घेणारे अनेक शेतकरी बांधव जेऊर परिसरात होते. त्यासाठी त्यांनी विहिरीतील एक गाळ व माती काढण्याचा व्यवसाय करण्यासाठी क्रेन खरेदी केले. त्यातून उत्पन्न मिळत गेले आणि त्यावरील मजुरांचा उपयोग करून जुन्या विहिरी पूर्ण करणे व नवीन विहिरी खोदण्याचा ठेका घेण्याचे काम सुरू केले. त्यानंतर विहिरीसाठी लागणारा ब्लास्टिंग ट्रॅक्टर खरेदी केले.
त्यामुळे व्यवसाय बहरत गेला. महाराष्ट्र व कर्नाटकातील शेकडो गावात त्यांनी विहिरी खोदून दिल्या. यातून लक्षणीय उत्पन्न मिळत गेल्याने दोन जेसीबी यंत्र घेऊन शेतीचे कामे करण्यास सुरू केले. त्यामुळे लोकांना रोजगार मिळत गेले. तसेच शेतकरी बांधवांची कामे कमी वेळेत पूर्ण होऊ लागली. या कामातून जनसंपर्क वाढत गेला. वग्गे यांनी थोडी थोडी करीत जवळपास ५५ एकर शेती खरेदी केली. व्यवसाय करीत असताना अनेक बागायतदार शेतकरी बांधवांचा संपर्क आल्याने त्यांचा सल्ला, मार्गदर्शन व प्रेरणा महत्वाची ठरली.
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्याकडून प्रारंभी द्राक्ष रोपे आणून शेतात लावली. त्यात वाढ होऊन आज घडीस त्यांनी अठरा एकर द्राक्ष बाग उभी आहे. तासगाव बाजारात आज चांगल्या दर्जाचे बेदाणे निर्माते म्हणून त्यांनी नाव कमविले आहे. यामुळे शेतमजूर ते शेतमालक मालक बनून आता द्राक्ष बागायतदार, अशी ख्याती मिळवत द्राक्ष बागायतदार संघ संचालकपदावर त्यांची वर्णी लागली आहे. यातून खंडप्पा वग्गे यांनी आपल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना व्यक्त केली. वग्गे यांना मोबाईल नंबर सुद्धा टाईप करता येत नाही. पण मित्रांचा फोटो त्याला लावून बरोबर त्यांना फोन करून आपले काम भागवतात.
अनेकांना दिला रोजगार
वग्गे हे सध्या दररोज २५ महिला व आठ पुरुष, यांना आपल्या शेतात वर्षभर रोजगार देत आहेत. स्वतःची प्रगती करीत इतरांना ही जगण्याची व यशस्वी होण्याची ते प्रेरणा देत आहे. त्यांचा शेतमजूर ते यशस्वी द्राक्ष बागायतदार व उद्योजक हा खडतर प्रवास गेल्या २० वर्षांपासून निरंतर सुरू आहे.
जेऊर येथील निरक्षर शेतमजूर असा सुरू झालेला प्रवास निरंतर कष्ट, व्यवसायातील बारकावे जाणून घेऊन अनेकांचे मार्गदर्शन व सहकार्याने सुरू आहे. व्यवसाय, द्राक्ष व इतर शेतीत नवीन प्रयोग करण्यात यशस्वी झाला आहे. तरुणांनी कोणतीही कामे हे अडचण न मानता, ती एक संधी मानून केली तर काहीच अडचण येणार नाही व त्यात निश्चित आपण पुढे जाऊ शकतो.
- खंडप्पा वग्गे, द्राक्ष बागायतदार, जेऊर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.