सोलापूर लोकसभा मतदारंसघातील दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ लिंगायत, धनगर, मुस्लिम व मराठा समाजाचे प्राबल्य आहे. ५० वर्षे लिंगायत व धनगर नेत्यांचे या मतदासंघावर वर्चस्व होते. अलीकडच्या १५ वर्षात हा मराठा नेत्यांच्या ताब्यात आला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत लिंगायत, धनगर, मराठा व इतर समाजाच्या पाठिंब्याने भाजपला ३७ हजारांचे मताधिक्य होते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. तरीही लिंगायत, धनगर या समाजातील मते या मतदासंघात निर्णायक असून त्यावर विजयाचे समीकरण ठरणार आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे खासदार, आमदार यांच्यावर नाराज असलेली जनता. याच मतदारसंघात असलेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे २५ हजार सभासद, तिसऱ्या स्थानावर असलेले मुस्लिम समाज, वंचित बहुजन आघाडीची कमी झालेली क्रेझ आणि माजी आमदार दिलीप माने यांचा काँग्रेस प्रवेश या पाच मुद्यांवर या तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट होताना दिसत आहे.
या तालुक्यात तीन लाख ३ हजार मतदार आहेत. गतवेळी लोकसभेला १ लाख ७० हजार २७७ इतके मतदान झाले. त्यामध्ये भाजपच्या जयसिद्धेश्वर महास्वामींना ८८ हजार ६९१ तर सुशीलकुमार शिंदे यांना ५० हजार ९१३ मते पडली. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना २८ हजार ९२ इतकी मते पडली.
भाजपने लिंगायत, धनगर, मराठा व इतर समाजाच्या पाठिंब्याने ३७ हजार ७७८ चे मताधिक्य मिळविले. याच तालुक्यात विधानसभा निवडणुकीत बाबा मिस्त्री यांना ५८ हजार मते मिळाली होती. यावरून मतदारसंघात मुस्लिम समाजदेखील निर्णायक असल्याचे प्रखरतेने दिसून आले.
काँग्रेस पक्षाकडून १९६२ पासून सलग १५ वर्षे लिंगायत समाजातील शिवदारे कुटुंबीयांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर धनगर समाजातील आनंदराव देवकते यांनी २५ वर्षे तालुका ताब्यात ठेवला होता. दरम्यान, जनता दल आणि शिवसेनेकडून शिवशरण पाटील, गुरुनाथ पाटील या लिंगायत समाजातील नेत्यांनी वर्चस्व ठेवले होते.
एकूण राजकारणाच्या वाटचालीत लिंगायत व धनगर समाजाने आलटूनपालटून सलग ५० वर्षे तालुका ताब्यात ठेवला होता. ज्यावेळी काँग्रेसने लिंगायत, धनगर समाजातील नेत्यांना दूर केले. त्यावेळी मात्र काँग्रेसचा गड भाजपच्या ताब्यात गेला. या तालुक्यात लिंगायत, धनगर, मुस्लिम समाज प्रभावी असून या मतदारांचा कौल हेच उमेदवाराच्या विजयाचे समीकरण असणार आहे.
आतापर्यंतचे आमदार
१९६२ ते १९७८ : विरुपक्षप्पा शिवदारे (काँग्रेस)
१९७८ ते १९८० : आनंदराव देवकते (काँग्रेस)
१९८० ते १९८५ : गुरुनाथ पाटील (जनता दल)
१९८५ ते २००४ : आनंदराव देवकते (काँग्रेस)
२००४ ते २००९ : सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
२००९ ते २०१४ : दिलीप माने (काँग्रेस)
२०१४ ते २०२४ : सुभाष देशमुख (भाजप)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.