सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (ता. १२) सुरवात होणार असून अर्ज भरण्यासाठी सुट्ट्या वगळून केवळ पाच दिवसांचाच अवधी मिळणार आहे. अर्ज भरायला जाताना उमेदवारांसोबत तीन वाहने व स्वत:सह पाच जणांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, २१ तारखेला रविवार असल्याने इतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी केवळ एकच दिवस (२२ एप्रिल) असणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी तीन हजार ६१७ मतदान केंद्रे असून त्यात २७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. यंदा पहिल्यांदाच एक हजार ८४० मतदान केंद्रे वेब कास्टिंगच्या निगराणीखाली असणार असून त्याठिकाणची प्रत्येक हालचाल थेट निवडणूक आयोगासह जिल्हाधिकाऱ्यांना पाहता येणार आहे. उमेदवारांना अर्ज भरायला येताना रॅली काढायची असल्यास त्याची पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागणार असून त्यात केवळ दहा वाहने अपेक्षित आहेत.
दरम्यान, खुल्या प्रवर्गातील उमेदवारास लोकसभा निवडणुकीसाठी २५ हजार रुपये तर मागासवर्गीय उमेदवारास साडेबारा हजार रुपयांची अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागणार आहे. स्वत:वरील दाखल गुन्हे, मुले, उत्पन्न व उत्पन्नाचे स्रोत अशी संपूर्ण माहिती अर्जात द्यावी लागणार आहे. २० एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून अर्ज माघारीनंतर २३ एप्रिलला अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर २३ एप्रिल ते ५ मे पर्यंत प्रचाराची रणधुमाळी आणि ७ मे रोजी मतदान, असा निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालासाठी ४ जूनची वाट पाहावी लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात माढा व सोलापूर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. सोलापूर मतदारसंघातून भाजपतर्फे आमदार राम सातपुते, काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे, वंचितकडून राहुल गायकवाड, यशवंत सेनेकडून संजय क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आहे. पण, एमआयएमचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही.
या मतदारसंघात एकूण २० लाख नऊ हजार ५२२ मतदार आहेत. दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी मिळाली असून वंचितकडून रमेश बारसकर हे रिंगणात उतरले आहेत. पण, महाविकास आघाडीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. या मतदारसंघात माण-खटावसह एकूण १९ लाख ८१ हजार १५० मतदार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.