Solapur - परिस्थितीशी संघर्ष, अभ्यासातील सातत्य आणि सर्वच बाबतीतील संयम या गोष्टी मी माझ्या कुटुंबाकडून शिकलो आणि त्याचा मला माझ्या यशात फायदा झाला. त्यामुळे शिक्षणाच्या आड परिस्थिती येत नाही. मनात जिद्द आणि संघर्ष करण्याची तयारी पाहिजे. मग कोणतेही क्षेत्र अवघड नाही, असे नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेले नरेंद्र देशमुख यांनी सांगितले.
सुगाव-भोसे (ता. पंढरपूर) येथील नरेंद्र मधुकर देशमुख याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याचे कळताच शेतकरी असणाऱ्या आई तारामती व वडील मधुकर यांना आभाळ ठेंगणे वाटायला लागले. आईने आनंदाने नरेंद्रला मिठी मारली अन् माझा नरेंद्र पोलिस झाला, असे उद्गार काढले.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नरेंद्र याने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगाव-भोसे येथे, माध्यमिक शिक्षण यशवंत विद्यालय, भोसे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे पूर्ण केले.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पुणे येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२० घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेमध्ये ३५ व्या रँकने उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.
आई-वडिलांना झाला मोठा आनंद
शेतकरी असलेल्या आई-वडिलांना मुलगा पोलिस अधिकारी झाल्याने प्रचंड आनंद झाला होता. पोरांने आमच्या कष्टाचे चीज केले, अशी भावना नरेंद्रच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
आजोबा आणि भावाची इच्छा पूर्ण
सेवानिवृत्त शिक्षक तुळशीराम देशमुख (आजोबा), स्व. सुरेश देशमुख (चुलते) व भाऊ महेंद्र देशमुख यांची इच्छा आणि पाठबळ यामुळेच मी पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालू शकलो. तुला लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे,
मात्र मला कोणतेही कारण न सांगता निवड झाल्याचे सांगायचे, अशी प्रेमपूर्वक तंबी दिल्याने मी जिद्दीने अभ्यासाला लागलो. त्यातच आई-वडील यांचा पाठिंबा होताच. तुला काय करायचे आहे, ते कर परंतु योग्य तेच कर आणि तू करशील, असा आम्हाला विश्वास आहे, असे सांगितले.
त्यामुळे माझा विश्वास आणखी बळावला. माझे आजोबा हे स्व. यशवंतभाऊ पाटील यांचे सहकारी असल्याने स्व. राजूबापू पाटील व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्यासह रावसाहेब पाटील व संपूर्ण पाटील कुटुंबीय यांची नेहमीच कौतुकाची थाप असायची. त्यामुळेही मला हे यश मिळाले असल्याच्या भावना नरेंद्रने बोलून दाखवल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.