सोलापूर : सध्या महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केवळ चार नगरसेवक आहेत. आता भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना आणि कॉंग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेले उमेदवार हा निकष धरून आम्हाला सन्मानपूर्वक जागा व पक्षाची ताकद असलेले प्रभाग मिळावेत, अशी भूमिका शिवसेना व कॉंग्रेसने घेतली आहे. त्यामुळे महापौर आमचाच म्हणणाऱ्या राष्ट्रवादीची कोंडी झाल्याची चर्चा आहे.
सध्या महापालिकेवर भाजपची सत्ता असून त्यांचे 49 नगरसेवक आहेत. कॉंग्रेसचे 14 तर शिवसेनेचे 22 आणि राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहेत. दरम्यान, माजी महापौर महेश कोठेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीला शहरात निश्चितपणे बळ मिळेल. भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेतील नाराजांना राष्ट्रवादीत आणण्यात त्यांचा मोठा वाटा राहिल्याचे बोलले जात आहे. या नेत्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची ताकद वाढेल, पण पक्षाचे विद्यमान नगरसेवक किती, यावर मित्रपक्षांचे जागा वाटप ठरेल. शिवसेना असो वा कॉंग्रेस, भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल होणाऱ्या इच्छुकांच्या प्रभागांवर (जागांवर) मित्रपक्षांनी दावा केल्यास त्या इच्छुकांना संधी कुठे द्यायची हा राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पहिला प्रश्न असणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामुळे विजयी उमेदवार वगळून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविलेल्या जागांवर संबंधित पक्षाचा दावा राहणार आहे. महेश कोठे व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तरीही त्या जागा शिवसेनेलाच सोडाव्या लागतील, असेही बोलले जात आहे. हा तिढा सोडवितानाही राष्ट्रवादीची कोंडी होणार आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची रणनिती पाहता कॉंग्रेस व शिवसेनेने वरिष्ठांच्या निर्देशानुसार स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे तिन्ही पक्षांच्या भांडणात आम्हीच बाजी मारू, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. आता भाजपला रोखण्यासाठी तिन्ही पक्षांची आघाडी होईल की सर्वजण स्वबळावर लढतील, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष वाले म्हणतात...
कॉंग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असून शहरात पक्षाची ताकद मोठी आहे. काही पदाधिकारी पक्षाला सोडून गेले, तरीही कार्यकर्ते पक्षासोबतच आहेत. राज्यात महाविकास आघाडी असली, तरीही स्थानिक पातळीवरील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला अपेक्षित जागा सोडणे अपेक्षित आहे. आघाडीच्या बैठकीत पक्षाला सन्मान न मिळाल्यास निश्चितपणे स्वबळावर निवडणूक लढवू. सध्या साडेतीनशे ते चारशेजण कॉंग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत, असा दावा शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केला आहे. ब्लॉक अध्यक्षांच्या माध्यमातून पक्षाचे क्रियाशिल सदस्य करण्याची मोहीम सध्या जोमात सुरू आहे, असेही वाले म्हणाले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बरडे म्हणाले...
शिवसेना ही व्यक्तींच्या जीवावर नव्हे तर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर मोठी झाली आहे. शिवसेनेची ताकद मोठी असून शहरातील 113 जागांवर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. तत्पूर्वी, महाविकास आघाडी होताना सन्मानपूर्वक जागा मिळतील का, याचा अंदाज घेतला जाईल. तरीही, आम्ही शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील जवळपास दीड हजार बुथवरील यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने तेथील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची यादी शिवसेनाभवनाला पाठविली आहेत. बदलत्या राजकीय समिकरणांचा अंदाज घेऊन आपला डाव ओपन करू, असा इशारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिला आहे.
महेश कोठे म्हणाले...
मागील निवडणुकीत कोणाची किती ताकद होती आणि आता काय, याचा विचार कोणत्याही पक्षाने करू नये. सध्याची स्थिती पाहून जागा वाटपांचा तिढा सोडविला जाईल. राष्ट्रवादीने शिवसेना व कॉंग्रेसला सोबत घेऊन जाण्याची भूमिका पहिल्यापासून मांडली आहे. महाविकास आघाडी करायची की नाही हा त्या-त्या पक्षांचा प्रश्न आहे. तरीही, शहरातील सर्वच प्रभागांमधील तिन्ही पक्षाच्या इच्छुकांची यादी घेऊन त्यातील तुल्यबळ कोण, भाजपच्या उमेदवाराला कोणता उमेदवार पराभूत करू शकतो, याचा विचार होईल. वादग्रस्त प्रभागांचा तिढा शेवटी सोडविला जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख महेश कोठे यांनी मांडली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.