शिवाजी भोसले
सोलापूर - मटक्याच्या धंद्यातून अमाप पैसा मिळविलेल्या मटका किंग वाल्यांची ‘माया’ कमाविण्याची अभिलाषा कमी होताना दिसत नाही. बड्या हस्तींची या धंद्यात ‘बाप तो बाप रहेगा’ असा नारा देत सोलापूर पोलिस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या जेलरोड, जोडभावी, सदर बझार, अक्कलकोट रोड एमआयडीसी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत धंदा तेजीत चालविण्यासाठी मोठी चढाओढ लागली आहे.
एका शेठसह मालक आमदार समर्थक माजी नगरसेवक कम मटका किंगचे मटक्याचे मोठे धंदे तेजीत असून दररोज या धंद्यामधली त्यांची लाखोंची उलाढाल असल्याचा बोलबाला आहे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मटक्याच्या धंद्यात एकापेक्षा एक बाप, येथे आहेत.
सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा नेता, महापालिकेतील पदाधिकारी आणि आता शिवसेना शिंदे गटात असलेल्या ‘भाऊ’ नेत्याचा चेला या धंद्यात आहे. त्यांची पाटिलकी इथं आहे. जशी ती याच धंद्यासाठी सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतसुद्धा असल्याचा बोलबाला आहे
सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत महापालिकेतील एका माजी नगरसेवकानेदेखील धनुष्यबाण खाली ठेवत, या धंद्यासाठी ‘लक्ष्मण’ रेषा ओलांडली आहे. मालक माजी आमदार भाच्याचादेखील सलगवस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत या धंद्यात रुबाब आहे.
जोडभावी पेठ आणि सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत तेजीतील मटका धंदा चालवून ‘शेठ’ बनलेल्या खार्कीवर्दी अन् खार्दीवाल्यांना ‘पापा... पापा’ म्हणजेच या या म्हणत धंद्यात जम बसवलाय. सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘हुंडी’ देत भाईनं आपला धंदा चालू ठेवलाय. याच हद्दीत एका पक्षामधील पैलवान तौफिकभाई नव्हे, तर त्यांच्या नावाबरोबरच आडनावाशी साधर्म्य असलेल्या ‘भाई’नं या धंद्यातील इनकमिंग-आऊटगोईंग चालू ठेवलंय.
जोडभावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ज्यांच्या नावात ‘मेघ’ म्हणजे ढग आणि या नावातील शब्दांबरोबरच मटक्याच्या व्यावसायतून ‘राज’ आलेल्या शिंदेशाही मटका किंगचा धंदा आहे. इतरांच्या मटका धंद्याची तुलना करता करता आपण या धंद्यात ‘अतुल’नीय कामगिरी करायची असं जणू ठरविलेल्या सोनवणे मटका किंगचासुध्दा धंदा तेजीत आहे.
जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतच या धंद्यात ‘स्वामित्व’ असणाऱ्या मटका किंग स्वामी मालक आणि कांबळे मालक यांचा धंदा तेजीत असल्याचा बोलबाला आहे. वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘मंथली’बरोबरच अधूनमधून चिरीमिरी देऊन खाकीवर्दीला ‘गुल’ करणाऱ्या ‘मल्लू’नं धंद्यात जम बसवलाय.
पोलिस आयुक्तालय अंतर्गत सात पोलिस ठाणी आणि सोलापूर तालुका पोलिस ठाणे, वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील मटका किंगची यादी अजून वाढू शकते. सदर बझार, जेलरोड आणि जोडभावी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्येच साधारण १७०० ते १८०० टपऱ्यांमधून मटका चालतोय. हा आकडा कमी जास्त असू होऊ शकतो.
तालुका पोलिस ठाणे हद्दीत ‘भाऊं’चा बाजार तेजीत
सोलापूर तालुका पोलिस ठाण्याची हद्ददेखील मुंबई-कल्याण बाजारासाठी अजिबात अपवाद नाही. अंदाजे २५० ते २७५ हून अधिक टपऱ्यांमध्ये मटका व्यवसाय चालतो आहे. या हद्दीत ‘भाऊं’नी आपला मस्तच वट्ट बसवलाय. भाजपचे ‘कमळ’ फुलावं तसं इथं मटका फुललाय. भाजपमध्ये मोठं ‘वजन’ असलेल्या एका भावाच्या जिवावर दुसऱ्या भावाने मटक्याच्या धंद्यात हार न मानता ‘जीत’ दाखवलीय. नावात ‘इंद्र’ असलेल्या ‘भाऊं’नी मटक्याच्या धंद्याला जोर लावलाय. हे इंद्रदेवाबरोबच सर्वांना माहिती असावं.
मालकांच्या जिवावर मलई वरपण्याची ‘डब्बल’ गेम
भाजपच्या वळचणीला अन् मालकांच्या मर्जीत राहून ‘उत्तर’मध्ये आपल्या भागात नेतृत्व करताना राजकारणाचे डाव खेळताना दोघा माजी नगरसेवकांनी जोडभावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटक्याच्या धंद्याचा डाव मांडलाल्याची चर्चा आहे. इथं या धंद्यात ‘पाटील’की लयच फुरफुतेय. जणू या भागात त्यांचं ‘राज’ असावं. ‘कोळी’ ज्याप्रमाणे जाळं विणतो त्याप्रमाणे या पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळजापूर मारुती मंदिराजवळच्या ‘देशमुखशाही’च्या मर्जीमधील एका माजी नगरसेवकाने मटक्याच्या धंद्याचे जाळं चांगलंच विणले आहे. एकीकडं महापालिकेतील मलई वरपण्याची दोघे नगरसेवक मटक्यामधील मलई ‘मालकां’च्या जिवावर वापरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.