सोलापूर - येथील विजयपूर रस्त्यालगतच्या धर्मवीर छत्रपती संभाजी तलावात मागूर मासा पाहून शनिवार (ता.९) सायंकाळी चारच्या सुमारस मगर असल्याची अफवा उठली. यामुळे बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या कार्यकर्त्यांनी बोटीतून तलावात जाऊन पाहाणी केली असता येथे देशात बंदी असलेला मागूर मासा त्यांना आढळून आला. दरम्यान, मगर ऐवजी मासा असल्याचे निर्दशनास आल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी जणू सुटकेचा नि:श्वास सोडला.
संभाजी तलावात पृष्ठभागावर आलेल्या मोठ्या मागूर माशाला पाहून कोणीतरी मगर असल्याची अफवा उठली. ही वार्ता कानोनकानी या परिसरात पोचली. त्यातून तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. याबाबतची माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला मिळाली असता त्यांनी बोटीतून तलावात प्रवेश केला.
यावेळी तलावात भला मोठा मासा पोहत असल्याचे आढळून आला. हा मागूर मासा विदेशी असून तो तलावातील परिसंस्थेला हानीकारक आहे. मानवाला खाण्यासाठीदेखील हा मासा अयोग्य आहे.
दोन प्रकारचे असतात मागूर
भारतात मागूर माशाची प्रजात चांगली प्रसिद्ध आहे. हा मासा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिशमध्ये समाविष्ट केला गेला आहे. देशी मागुर मासा त्याच्या उत्तम चवीसाठी प्रसिद्ध आहे. देशी मागूर माशाबरोबर विदेशी थाई मागुरही भारतात आढळतो. परंतु हा थाई मागूर मानवी आरोग्यास हानिकारक असतो. या माशाबद्दल नेहमीच चर्चा होत असते.
१९९७ पासून आहे मागूरवर बंदीथाई मागूर जलीय परिसंस्थांमधील इतर घटकांसाठी हानिकारक आहे. तसेच हा मासा इतर प्रजाती लुप्त होण्यासही कारणीभूत समजला जातो. थाई मागुर दिसायला देशी मागूरसारखाच असल्याने या दोन्ही माशांतील फरक ओळखणे गरजेचे आहे. हा मासा अनेकदा अजैविक कचऱ्याचे सेवन करतो.
माशाच्या मांसात अनेकदा जड धातू जसे झिंक, कॅडमिअम आणि आर्सेनिकचे संक्रमणसुद्धा आढळून आलेले आहे. हे धातू मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असल्याने, १९९७ मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मासेमारी विभागातर्फे थाई मागूर माशावर बंदी घातली होती.
श्वसनासाठी येतो पृष्ठभागावर
हिरवट तांबूस रंगाच्या या माशाचे डोके चपटे असते. जबडा देखील चपटा असून वरच्या आणि खालच्या जबड्यास प्रत्येकी चार अशा एकूण आठ मिशा असतात. पाठीवरील पर लांब असतो. मात्र तो शेपटीच्या पराशी जोडलेला नसतो. या माशाच्या अंगावर खवले नसतात.
मागूर मासे पाण्याच्या तळाशी राहतात. तलावातील किडे, अळ्या, छोटे मासे हे त्यांचे मुख्य खाद्य असते. मागूर माशाची मादी तलावाच्या किनाऱ्याजवळ घरटे करून त्यात अंडी घालते. या माशामध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वसन करण्यासाठी खास श्वसनेन्द्रिय असतात. त्यामुळे हा मासा श्वसनासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येतो. मगीची चर्चा शहरात सर्वत्र पसरली.
‘तो’ मासा आला कुठून ?
छत्रपती संभाजी तलावात हा धोकादायक मागूर मासा कुठून आला असावा, याबाबत काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता, असा निष्कर्ष निघाला की, तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात या तलावाजवळ कर्नाटकातून येणाऱ्या माशाच्या ट्रकला अपघात झाला होता. यावेळी अनेक मासे तलावात सोडले गेले होते. यावेळी हा मासा या तलावात आला असावा.
या तलावातील पाणी प्रदूषित असल्याने कदाचित माशाला श्वास घेण्यासाठी अडथळा येत असावा. वास्तविक हा मागूर मासा स्थनिक जैवविविधतेसाठी धोकादायक आहे. यामुळे हा मासा नष्ट करण्याची आवश्यकता आहे.
भरत छेडा, नेचर कॅन्झर्वेशन सर्कल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.