पंढरपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंदिर परिसरातूनच विरोध वाढू लागला आहे. प्रस्तावित विकास आराखडा रद्द करावा आदी, या मागणीसाठी गुरुवारीमंदिर परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांनी नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला. स्थानिकांच्या वाढत्या विरोधामुळे विकास आराखडा वादात सापडला आहे.
दोन दिवसापूर्वीच स्थानिक व्यापाऱ्यांनी एक बैठक घेवून विकास आराखड्याला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनीही या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर गुरुवारी विकास आराखड्याच्या विरोधात व व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून मंदिर परिसर बचाव समितीच्या वतीने सर्व पक्षीय मोर्चा काढला. येथील संत नामदेव पायरीपासून सुरु झालेला मोर्चाने पालिकेवर धडक मारली. यावेळी प्रांताधिकारी गजनान गुरव आणि पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी मोर्चेकरांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
मोर्चामध्ये मनसेचे नेते दिलीप धोत्रे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, माजी नगसेवक सुधीर धोत्रे, लखन चौगुले, महादेव धोत्रे, संजय बंदपट्टे, दत्ता भोसले, अरुण कोळी, महम्मद उस्ताद, धनंजय कोताळकर, आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे, संदीप मांडवे, सतीश शिंदे, नागेश भोसले, प्रणव परिचारक, अनिल अभंगराव, लक्ष्मण पापरकर, वीर महाराज, नाना कवठेकर, बाबा महाजन, साईनाथ बडवे, विक्रम पापरकर, अनिल अभंगराव, शैलेश बडवे, ऋषी उत्पात, श्रीकांत हरिदास, संजय घोडके, ओकांर देवडीकर, गणेश लंके, वैभव बडवे, मंगेश मंजुळ, अॅड. ओंकार जोशी, गणेश पिंपळनेरकर, शशिकांत पाटील आदींसह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सत्ताधाऱ्यांनी झोपेत दगड घातला
मंदिर परिसरातील विकास आराखडा तयार करण्याचे काम सत्ताधारी नगराध्यक्ष आणि त्यांच्या नगरसेवकांनी केले आहे. लोकांना अंधार ठेवून सत्ताधाऱ्यांनी झोपेत डोक्यात दगड घातला आहे, असा गंभीर आरोप मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विकास आराखडा राबवू देणार नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून त्यांना विनंती करणार असल्याचे आश्वासन प्रणव परिचारक यांनी दिले.
शहर विकास आघाडीचे निवेदन
विठ्ठल मंदिर परिसरातील प्रस्तावित विकास आराखड्याला सर्वपक्षीय विरोध सुरु झाल्यानंतर आज सत्ताधारी शहर विकास आघाडी आणि भाजपच्या वतीने विकास आराखड्या विरोधात प्रांताधिकारी गजानन गुरव यांना स्वतंत्र निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने विकास आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध आहे. या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा माजी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी दिला आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा साधना भोसले, श्वेता डोंबे, नागेश भोसले. निलेश डोंबे उपस्थित होते.
घरे, दुकाने बाधित
विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चांगली सोय व्हावी. त्याचबरोबर मंदिर परिसरातील वाढती गर्दी नियंत्रणात ठेवावी यासाठी मंदिर परिसरात काशी विश्वेश्वर व उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये विठ्ठल मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावरील ५०० हून अधिक घरे व दुकाने बाधित होणार आहेत. त्यामुळे व्यापारी व रहिवाशी हवालदिल झाले आहेत. मंदिर परिसरातील दुकाने आणि लोकांची घरे पाडून कॉरिडॉर तयार करण्यास मंदिर परिसर बचाव समितीने तीव्र विरोध केला आहे.
प्रमुख नेत्यांची मोर्चाकडे पाठ
विठ्ठल मंदिर परिसरातील दुकानदार आणि नागरिकांच्या मुळावर आलेल्या विकास आराखड्याच्या विरोधात सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सर्वच पक्षातील पदाधिकारी सहभागी झाले होते. मात्र सर्वच प्रमुख नेत्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, कल्याणराव काळे, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील या नेते मंडळींनी मात्र सोयीस्करपणे पाठ फिरवल्याने व्यापारी व नागरिकांनी नाराजी व्यक्ती केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.