Narendra Modi : पंडित नेहरुनंतर नरेंद्र मोदी सोलापूरच्या ‘त्या’ भूमीत!

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा १९६० मध्ये सोलापुरातील ज्या ‘सेटलमेंट’ जागेला पदस्पर्श झाला होता.
pandit jawaharlal nehru narendra modi
pandit jawaharlal nehru narendra modisakal
Updated on
Summary

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा १९६० मध्ये सोलापुरातील ज्या ‘सेटलमेंट’ जागेला पदस्पर्श झाला होता.

- शिवाजी भोसले

सोलापूर - स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा १९६० मध्ये सोलापुरातील ज्या ‘सेटलमेंट’ जागेला पदस्पर्श झाला होता, त्यांच्या पदस्पर्शाने पर्यायाने त्यांच्या आगमनाने इथली भूमी पुनीत झाली होती, त्याच भूमीला तब्बल ६२ वर्षानंतर देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदस्पर्श लागणार आहेत. तब्बल ६२ वर्षानंतर इथल्या भूमीत पुन्हा पंतप्रधान येण्याचा आगळावेगळा योगायोग साधला जाणार आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. तारेच्या कुंपणाची जागा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेटलमेंट येथील ९० एकराच्या जागेवर भटक्या विमुक्तांसाठी भव्य-दिव्य असा साधारण १५ हजार घरांचा महागृहप्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी श्री मोदी यांना निमंत्रित केले जाणार आहे.

विशेषत्वे, देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूरला येऊन तारेचे कुंपण तोडून भटक्यांची मुक्तता, त्यांना व्हीजेएनटी प्रवर्गाच्या सवलती जाहीर केल्या होत्या, त्याच तारेच्या कुंपणाच्या जागेवर गृहप्रकल्प साकारून स्वातंत्र्यापूर्वी जे भटके तारेच्या कुंपणात बंदिवान केले होते, त्यांच्या वारसदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हक्काचे छत दिले जाणार आहे.

सोलापूर महापालिका हद्दीत जुन्या वांगी रस्त्यावर सेटलमेंट म्हणून ओळखली जाणारी ऐतिहासिक जागा. ज्या जागेला तारेचे कुंपण घालून इंग्रजांनी रजपूत भामटा, टकारी,कैकाडी,कंजारभाट, पारधी, छप्परबंद, मांगगारुडी आदी नऊ भटक्या जमातींना बंदिवासात ठेवले होते. पुढे १५ ऑगष्ट १९४७ लाअखंड हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपसूकच तारेच्या कुंपणामधून या भटक्यांची मुक्तता झाली. या टप्यादरम्यानच १९६० साली तारेचे कुंपण या जागेवर भटक्यांचा ऐतिहासिक मेळावा घेण्यात आला होता.

या मेळाव्याला त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. भटक्यांसाठी काही विशेष सवलती जाहीर केल्या होत्या, त्याच जागेवर आणि त्याच जागेशी संबंधित असलेल्या भटक्या विमुक्तांच्या वारसांना हक्काचा निवारा देण्यासाठीच्या प्रकल्प पाया भरणीसाठी देशाच्या पंतप्रधानांना आणून जुन्या इतिहासला नव्याने उजाळा देतानाच, महागृह प्रकल्पाचा वेगळा अन्‌ इतिहास निर्माण केला जाणार आहे.

सर्व भटक्या विमुक्त जमातींना भाजपच्या झेंड्यखाली आणण्याच्या अनुषंगाने, सोलापूरचा महत्वकांक्षी प्रकल्प साकारण्याकडे भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींचे लक्ष आहे. त्यातूनच या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी मोदींना आणण्यचा ‘व्होरा’ असल्याची वस्तुस्थिती आहे.

तेव्हांचा ‘तिरंगा’ अन्‌ आताचा भगवा

स्वातंत्र्यानंतर सन १९६० मध्ये तारेचे कुंपण जागेवर पंडित नेहरू यांच्या खास उपस्थितीत घेण्यात आलेल्या भटक्यांच्या मेळाव्यावेळी उपस्थितांच्या हातात तिरंगी झेंडे होते. त्यावेळी सगळे वातावरण तिरंगामय झाले होते. तद्‌नंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या खास कार्यक्रमात संबंधित भटक्या विमुक्तांच्या हाता भाजपच्या कमळाचा भगवा ध्वज असणार आहे.अवघे वातावरण ‘कमळ‘मय करण्याचा अट्टाहास केला जाणार आहे.

काही लक्षवेधी नोंदी

  • भटक्या विमुक्त जमातींसाठी साकारण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पाच्या फायलीला फुटले वेगाने पाय

  • भटक्या विमुक्तांमध्ये समावेश असलेल्या ‘चौदा जमाती’च्या लोकांना मिळणार मोफत घरे

  • भटक्य विमुक्त जमातीमधील चौघा नेतेमंडळींचा गृहप्रकल्प साकारण्यासाठी राहतोय पुढाकार

  • घरकुल देताना सोलापूर शहरातील भटक्या जमातीमधील लाभधारकांना प्रथम प्राधान्य

  • सोलापूर शहरातील भटक्यांना घरकुल देण्याचा कोटा पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील भटक्यांना घरे देण्याचा निर्णय

'कमळ' फुलविण्याला भटक्या विमुक्तांच्या व्होटबँकेची भक्कम साथ

आजवर नेहमी अस्थिरतेची वाट चालणाऱ्या चौदा भटक्या विमुक्त जमातींना स्वत:च्या हक्काच्या निवारा देऊन त्यांना स्थिर करण्यासाठी सेटलमेंट ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहे. वास्तविक या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड भाजपचे मोठे स्वार्थाचे गोळाबेरजेचे राजकारण आहे. आजवर काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेल्या भटक्यांना भाजपच्या झेंड्याखाली आणण्याची रणनिती आखण्यात आली आहे. खासदारकी, आमदारकी यांसह सर्वच निवडणुकांमध्ये ‘कमळ’ फुलविण्यासाठी १४ भटक्या विमुक्त जमातींच्या व्होट बँकेची भक्कम साथ घेतली जाणार आहे. भटक्या विमुक्तांच्या हाती ‘कमळ’ दिले जाणार आहे.

पेरणी सोलापूरात अन्‌ पीक उभ्या महाराष्ट्रात…

पिढ्यान पिढ्या संघर्षाची अन्‌ अस्थिरतेची वाट चालणाऱ्या १४ भटक्या जमातींना घरकुल देऊन सोलापूरात कायमचे स्थिर केले. घरकुलांबरोबरच त्यांना अन्य काही सोई-सवलती दिल्या. रोजगाराचे प्रकल्प राबविले. मुख्यत्वे, सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील भटक्यांनादेखील प्राप्त परिस्थितीनुसार, दिलासा दिला तर त्याचा सकारात्मक मेसेज महाराष्ट्रात जाऊ शकतो. भाजपबद्दल पर्यायाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींबद्दल महाराष्ट्रातील विविध भटक्या जमातींमधील लोकांवर त्याचा सकारात्मक परिणाम उमटू शकतो. म्हणूनच भटक्यांच्या गृह आणि रोजगार प्रकल्पांचे सोलापूर हे रोल मॉडेल बनविले जाणार आहे. या संबंधीची पेरणी सोलापूरात अन्‌ पीक उभ्या महाराष्ट्रात असा प्रकार होऊ शकतो, ही दूरदृष्टी ठेऊन भाजपने सोलापूरच्या भटक्या विमुक्तांच्या गृहप्रकल्पाच्या फायली गतिमान केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.