Solapur : सोलापूर जिल्ह्याचे राजकारण नेहमी दादा आणि मालक यांच्या भोवती फिरले

मालक, दादांच्या जिल्ह्यात मामांची जोडी
 संजय शिंदे
संजय शिंदे sakal
Updated on

सोलापूर जिल्ह्याचे राजकारण नेहमी दादा आणि मालक यांच्या भोवती फिरले आहे. मग ते दादा विजयसिंह मोहिते पाटील, बबनराव शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, उमेश पाटील असोत की मालक कै. सुधाकरपंत परिचारक, विजयकुमार देशमुख, राजन पाटील, दिलीप माने, प्रशांत परिचारक.

दादा आणि मालक यांचे गारुड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच राहिले आहे. दादा-मालकांच्या जिल्ह्यात एक मामा संजय शिंदे यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या जोडीला आता राष्ट्रवादीने प्रभारी म्हणून इंदापूरचे मामा दत्तात्रय भरणे यांना आणले आहे. दादा-मालकांच्या जिल्ह्यात आता ही मामा जोडी एकामेकांवर कुरघोडी करणार की दमदार कामगिरी करणार? यावर राष्ट्रवादीची दशा अन्‌ दिशा नक्कीच अवलंबून आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री म्हणून आलेले दत्तात्रय भरणे आता राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून पुन्हा सोलापूर जिल्ह्यात आले आहेत. सत्ता असताना आणि सत्ता नसताना काय फरक पडतो? याचा अनुभव आता भरणेमामा यांना नक्कीच येईल. सत्तेच्या काळात कामांसाठी जवळीक साधलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आता खऱ्या कामाला लावण्याची वेळ आली आहे. सत्तेमुळे जवळ आलेले लोक खरचं आपले होते का? याचाही छडा राष्ट्रवादीला आणि प्रभारी भरणे यांना या निमित्ताने लावता येणार आहे. पालकमंत्री म्हणून काम करताना दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहरातील अनेकांना भरभरून निधी दिला. ज्यांना निधी दिला त्यांना राष्ट्रवादीसोबत घेण्याची नैतिक जबबादारी आता नवीन प्रभारी भरणे यांच्यावर असणार आहे.

सध्याच्या स्थितीला एकवेळ सोलापूर शहर राष्ट्रवादी परवडली. परंतु ग्रामीण राष्ट्रवादी नको, अशीच स्थिती झाली आहे. मोहोळमधील अनगरविरूध्द नरखेडची सुरु असलेली धुसफूस असो की सांगोल्यातील मित्रपक्ष असलेल्या शेकापचा स्थानिक राष्ट्रवादीवर असलेला पराभवाचा राग. या संदर्भात प्रभारी भरणेमामांना ठोस निर्णय घेतल्याशिवाय पुढे जाणे कठीणच दिसते. माळशिरसमध्ये जानकर यांच्या नेतृत्वावरून असलेली छुपी दरी, पंढरपूरमध्ये भगीरथ भालके, कल्याणराव काळे, युवराज पाटील, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्यात असलेली गटबाजी, मोहोळच्या गटबाजीचे उत्तर सोलापूर तालुक्‍यात पोहोचलेले लोण, असे अनेक लहान-मोठे विषय प्रभारी भरणे यांना प्रभावीपणे सोडवावे लागणार आहेत.

पालकमंत्री म्हणून काम करताना भरणेमामा यांनी घेतलेली मवाळ भूमिका एकावेळ ठिक आहे. पण आता प्रभारी म्हणून त्यांना वेळीच ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याची सुरुवात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष या पदावरील नियुक्‍त्यांपासून करावी लागणार आहे. इंदापूरच्या मामांकडे असलेला कास्ट फॅक्‍टर सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी नवसंजीवनी देणारा ठरु शकतो. या फॅक्‍टरचा उपयोग सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी ८ ते १० विधानसभा मतदार संघात निश्‍चितपणे होण्याची शक्‍यता आहे. या फॅक्‍टरचा लाभ जिल्ह्यातील नेते किती व कसा घेतात? यावर राष्ट्रवादीच्या यशाचे गणित अवलंबून आहे. प्रभारी भरणे यांचा जसा उपयोग सोलापूरच्या राष्ट्रवादील होईल तसाच सोलापूरच्या कामगिरीचा उपयोग प्रभारी भरणे यांना त्यांच्या पॉलिटिकल करिअरला होण्याची शक्‍यता आहे.

एका मामांची शक्ती, दुसऱ्या मामांची युक्ती

परिस्थिती नसताना जनमत कसे तयार करायचे यात इंदापूरचे मामा माहीर आहेत तर कुठल्या वेळी कुठला डाव खेळायचा यामध्ये निमगावचे मामा माहीर आहेत. या दोन मामांची शक्ती आणि युक्ती एक झाल्यास सोलापूर जिल्ह्यात "राष्ट्रवादी पुन्हा'' शक्‍य आहे. उजनीच्या निमित्ताने दोन्ही मामांमध्ये चालणारे डाव-प्रतिडाव दोन्ही मामांसाठी इगो पॉईंट होऊ नयेत, याची मात्र आवर्जून खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे.

महिना अखेरीस पवारांचा दौरा

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवर हे ऑक्‍टोबर अखेरीस बार्शीच्या दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्‍वासराव बारबोले यांच्या प्रवेश सोहळ्याठी हा दौरा होणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील ऑक्‍टोबर अखेरीस सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. या दौऱ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नवे शिलेदार आणि दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.