सोलापूर - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेची प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि चाकरमान्यांना ज्यादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे याचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू आटोक्यात आल्याने रेल्वे प्रशासनाने मासिक पास सेवा पूर्ववत करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनामुळे एक्सप्रेस पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जवळपास सर्वच कर्मचारी नोकरदार हे लसीकरण करून प्रवास करीत आहेत. इतर राज्यात पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातच पॅसेंजर गाड्या बंद का? असा प्रश्न देखील प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, बॅंक कर्मचारी, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी यांना दररोज प्रवास करण्याकरीता आरक्षणाचे आगाउ तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. हे तिकीट मिळण्याकरिता अनेकांना वेटिंग देखील करावे लागत आहे. त्यामुळे या प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदारांना तातडीने मासिक पास सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.
सोलापूर विभागातून सोलापूर-कुर्डूवाडी, कुर्डूवाडी - दौंड, पंढरपूर, सांगोला, सोलापूर- विजापूर, सोलापूर- गुलबर्गा, शाहाबादवाडी, अक्कलकोट, दुधनी, गाणगापूर रोड, गुलबर्गा येथे दररोज शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, चाकरमानी हे मासिक पास काढून प्रवास करीत असतात. मात्र मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे मासिक पास रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.
रेल्वे प्रशासनाने मुंबईमध्ये लोकल प्रवासाकरिता लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मासिक पासची सुविधा दिली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर विभागांतील दोन लस घेतलेल्या प्रवाशांना मासिक पासची सोय करावी. मात्र सोलापूर विभागात मासिक पासची सवलत का नाही असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. पॅसेंजर गाडया सोडून बंद असलेल्या सर्व रेल्वे गाड्या नियमित सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कामगार वर्गाकरिता मासिक पास सेवा आणि जनरल तिकीट सेवा सुरू केल्यास सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ठळक बाबी...
- मासिक पासमुळे पैशाची होते बचत
- रेल्वेचा सुरक्षीत प्रवास होतो
- विद्यार्थी, शेतकरी, चाकरमानी यांच्याकडे सर्वाधिक पास
- 2500 ते 3 हजार मासिक पास धारक
- खाजगी वाहनांचा घ्यावा लागतो आधार
व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, यांना खाजगी वाहनांने प्रवास करणे कठीण बनले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरीत मासिक पास पूर्ववत सुरु करावेत जेणेकरुन दररोज प्रवास करणा-यांची चांगली सोय होईल.
- संजय पाटील, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ, सोलापूर
सध्या केवळ विशेष एक्सप्रेस गाडया सुरु आहेत. त्यामुळे आरक्षीत तिकीट असणा-या प्रवाशांनाच प्रवास करता येतो. त्यामुळे ज्यावेळेस पॅसेंजर गाडया सुरु होतील त्यावेळेस मासिक पासची सेवा पूर्ववत होईल.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.