Solapur Election Update: सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी लक्षवेधक ठरत आहे. विविध पक्षांच्या मधील नेत्यांच्याच वेगवेगळ्या आघाड्या, युत्या झाल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या निवडणुकीमध्ये 'नेत्यांचा मेळ लागेना, मतदारांना काही कळेना !' अशीच अवस्था निर्माण झाल्यासारखी झाली आहे.
तालुक्यातील सहकारी सूतगिरणी व खरेदी विक्री संघाच्या बिनविरोध निवडणुकीनंतर सर्वच पक्षांचे व प्रमुख नेते मंडळींचे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. या कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल मोठी असल्यामुळे काहींचा तिरका डोळाही या निवडणूकीकडे अगोदर पासूनच असल्याचे दिसून आले होते.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील बदललेली राजकीय परिस्थितीनुसार शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत ही निवडणूक ताकतीने लढविणार असल्याचे सांगितले होते तर सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने ही निवडणूक लढविण्याचे ठरवून तयारीला लागण्याचे आदेशही दिले होते. नेत्यांनी केलेल्या वल्गणामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने विविध गटातून आपले उमेदवारी अर्ज भरले.
अर्ज माघारी घेण्याच्या काही तास अगोदर तालुक्यातील प्रमुख पक्षाने व त्यांच्या नेत्यांनी बिनविरोध करण्यासाठी आपली तयारी दर्शवली आणि त्या दृष्टीने शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रमुख नेत्यांनी आपली युती केली. नेत्यांनीच अगोदर दिलेल्या आदेशमुळे अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेण्यास नकार दिला. त्यातच शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी आपले पॅनलच स्वतंत्रपणे बनवुन सत्ताधारी शेकापमध्ये जणू फूटच पाडली.
या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांची साथ मिळाल्याने यामध्ये आरपीआय, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेने हातात हात घेतला. पक्षापेक्षा नेत्यांच्या आघाड्या झाल्याचे या निवडणुकीत दिसून येऊ लागले आहे. सध्या प्रचार व गाठीभेटीचा जोर वाढला असला तरी या नव्या युती, आघाड्यांमुळे कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षांपेक्षा नेत्यांच्या झाल्या युत्या - आघाड्या -
एकीकडे सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे पाटील यांच्याशी युती केली व तसे पॅनेल तयार करून निवडणूक लढवीत आहेत. दुसरीकडे शेकापचेच जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी स्व. गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव गायकवाड यांना सोबत घेतले आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी परिवर्तन आघाडीसोबत असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. झपके हे मात्र सत्ताधारी आघाडीत असल्याचे दिसत आहेत. आरपीआय व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना परिवर्तन आघाडीत सामील झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पक्षापेक्षा नेत्यांच्या आघाड्या व यूत्या झाल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.