Solapur : "दगड फोडणाऱ्या हातातून सुबक तुळशी वृंदावन निर्मिती

कुटुंबात पाच सदस्य व कमवते फक्त वडीलच! अशा परिस्थितीमुळे शाळेची पायरी देखील न चढता आलेलीकुटुंबाला हातभार म्हणून दगड फोडायचे काम करावे लागले
Solapur
Solapur sakal
Updated on

पंढरपूर : घरची हलाखीची परिस्थिती! कुटुंबात पाच सदस्य व कमवते फक्त वडीलच! अशा परिस्थितीमुळे शाळेची पायरी देखील न चढता आलेली! कुटुंबाला हातभार म्हणून दगड फोडायचे काम करावे लागले. मात्र जिद्दीच्या जोरावर पंढरीतील पांडुरंग बंदपट्टे यांचे दगड फोडणारे हेच हात आता सुबक दगडी तुळशी वृंदावन घडवीत आहेत. या कलेच्या जोरावरच त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली आहे.

पंढरपूर मधील वडार समाज पिढ्यान पिढ्या पासून दगड घडविण्याचे काम करीत आहे. पूर्वीच्या काळी सर्वत्र दगडी चौसोपी वाडे असायचे. या वाड्याच्या बांधकामासाठी दगड घडविण्याचे काम वडार समाजातील बहुतांश लोक करीत असत. मात्र कालानुरूप बदल होत गेल्याने वडार समाजातील काही तरुण देव देवतांच्या दगडी मूर्तीकलेकडे वळले. आजही अनेक तरुण या दगडी मूर्ती घडविण्याचा कलेमध्ये पारंगत आहेत.

पंढरीतील पांडुरंग सुभाष बंदपट्टे हेही या तरुणांपैकीच एक! लहानपण अत्यंत बिकट परिस्थितीत व्यतीत केलेले. अशा परिस्थितीमुळे त्यांना शाळेची पायरी देखील चढता आली नाही. त्यामुळे त्यांनी घराशेजारीच असलेल्या अनिल शिवदास पवार या मूर्तिकाराकडे दगड फोडण्याचे काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना आठवड्याला फक्त 10 रुपये मजुरी मिळत असे. दगड फोडता फोडताच त्यांनी विविध देवदेवतांच्या दगडी मूर्ती घडविण्याची कला प्राप्त केली. वयाची 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांनी हेच काम केले.

तदनंतर एका नातलगाकडून कोल्हापूर परिसरातील मूर्तिकारांकडे जादा मजुरी मिळते हे कळले. त्यामुळे 2012 साली पांडुरंग कोल्हापूरला गेले. कोल्हापूर पन्हाळा रोड वरच्या एका गावातील मूर्तिकाराकडे ते काम करू लागले. त्या परिसरातील काही गावांमध्ये प्रामुख्याने मंदिराची शिखरे व दगडी तुळशी वृंदावन घडविण्याची कला जोपासली गेली आहे. पांडुरंग यांनी ही दगडी तुळशी वृंदावन घडवण्याची कला देखील आत्मसात केली. मात्र ही कला आत्मसात करणे एवढे सोपे नव्हते. ही कला शिकण्यासाठी त्यांनी सलग 7 वर्ष खडतर परिश्रम घेतले. त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले.

कोल्हापुरातही काम बंद झाल्याने ते आपल्या मूळ गावी पंढरपूरला परत आले. कोरोना काळात त्यांनी येथील जुनी वडार गल्लीतील जागेमध्ये दगडी तुळशी वृंदावन घडविण्याच्या कामास सुरुवात केली. त्यांनी घडविलेल्या सुबक रेखीव दगडी तुळशी वृंदावनास हळूहळू ग्राहकांची पसंती मिळू लागली. या तुळशी वृंदावनास मागणी वाढल्यामुळे त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर तुळशी वृंदावनाची निर्मिती सुरू केली.

पंढरीतील सरगम चौक ते डीव्हीपी मॉल रस्त्यालगत त्यांनी विविध आकाराची तुळशी वृंदावन विक्रीस ठेवली आहेत. आकारमानानुसार या तुळशी वृंदावनाच्या 10 हजार ते 50 हजार रुपये पर्यंत किंमती आहेत. पंढरपूर परिसरातील ग्राहकांबरोबरच श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक देखील हे सुबक तुळशी वृंदावन खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. एकेकाळी दगड फोडणारे पांडुरंग यांनी आपल्या या व्यवसायातून अनेक मूर्ती कारागिरांना रोजगार निर्माण करून दिला आहे. या व्यवसायात यश प्राप्त करीत त्यांनी आपली आर्थिक प्रगती देखील साधली आहे. *कोट: दगडी तुळशी वृंदावन तयार करणे ही एक अवघड कला आहे. एक तुळशी वृंदावन तयार करण्यास किमान आठ ते दहा दिवस लागतात. मात्र दगडी तुळशी वृंदावन हे एकसंध व टिकाऊ असल्याने वर्षानुवर्षे आपल्या अंगणाची शोभा वाढवते.

- पांडुरंग बंदपट्टे, मूर्तिकार, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.