Solapur : दलदलीमधल्या फुलांचा दरवळला सुंगध
सोलापूर : आजी , आई , मावशी, बहिणी, मावस बहिणी असा सगळा गोतावळा...नव्हे, तर सगळं खानदानचं आब्रुच्या बाजारात इभ्रत विकायला बसणारं. ना ओळखीचा ना पाळखीचा, ना जातीचा ना पातीचा. ज्याला कधीही पाहिलं नाही किंवा ओळख नाही अशा माणसाला लगोलग शरीर सोपावायचं. इथं देहविक्रीच्या बाजाराची अक्षरश: नुसती दलदल.
तथापि, याच दलदलीमधल्या फुललेल्या फुलांचा सुंगध आता सर्वत्र दरवळतोय. या दलदलीमध्ये परिवर्तनाची पहाट उगवलीय. अबु्रच्या बाजारातल्या काही हिरकण्यांच्या उत्कर्षाच्या वाटा उजळून निघाल्यात. या हिरकण्यांच्या नावापुढं लागणार्या वारांगणा किंवा सेक्स वर्कर या शब्दांऐवजी त्यांच्या नावापुढं डाक्टर, इंजिनिअर, पोलिस उपनिरीक्षक आणि आरोग्य विभाग सुपरीडेंट असे शब्द लागलेत.
या रणरागिणींनी चोखाळलेल्या वेगळ्या करिअरच्या वाटांमधून त्यांचं व्यक्तीमत्व हे हायप्रोफाईल झालय. देहविक्रीच्या दूनियेतल्या कोंदणाऐवजी उच्च शिक्षीत अन् नोकरदार असं वेगळं व्यक्तीमत्वं त्यांचं झालय. देहविक्रीऐवजी त्यांच्या कर्तृत्वाला वेगळेच धूमारे फुटलेत.
मुळच्या सोलापूरातील मात्र आता वेगवेगळ्या ठिकाणी अन् वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करत असलेल्या या हिरकरण्यांना ‘सकाळ’ नं बोलतं केलं, तेव्हा त्या बेधडक बोलल्या. सृष्टी म्हणते, आई ज्या दलदलीत आहे, अगर ती जे रोज करते त्याबद्दल मला थोडं अवघडल्यासारख्या वाटतं.
पण, तिनं जर अब्रु विकली नसती, पैंसे कमविले नसते तरी मी एमबीबीएस डाक्टर झाली नसते. टेटीस्कोप तिच्यामुळं माझ्या गळ्यात आला. डाक्टर म्हणून मला मान मिळाला. तो तिच्यामुळे. तिने हा व्यावसाय केला नसता तर मला मोठ्या खर्चाची एमबीबीएसला पदवी मिळणं कधीच शक्य नव्हतं. तिनं आता त्या दलदलीमधून बाहेर पडावं. मी कितीही मोठी झाले, तरी आईच्या नरजेत लहानच आहे.
कंम्प्युटर इंजिनिअर झालेली ननया म्हणते, आईनं स्वातंत्र्य दिलं, पैसे घालून इंजिनिअर केलं. म्हणून मी आज पुण्यात आयटी कंपनीत वर्षाला 15 लाखाचं पेकेज घेते, तिनं हे सगळं केलं नसतं तर एक तर मी देहविक्रीच्या व्यावसायात राहिली असते. मन मारून केवळ पैशांसाठी रोजच इज्जत विकत बसावी लागली असती. नाहीतर जादा वय असलेल्या कोण्या एखाद्या प्रौंढाशी माझं लग्न लावून दिलं असतं किंवा जोकतीन म्हणून देवीला सोडून दिलं असतं. आईनं जे केलं त्याबद्दल आभार मानायला शब्दच नाहीत.
करिअरची अगदी वेगळी वाट चोखाळून फौंजदार झालेली दिव्या तर म्हणते, खानदानाच्या पाठिंब्यामुळं माझ्या अंगावर खाकीवर्दी आली. ज्या खाकीवर्दीची आमच्या बायकांना सततची भिती. आमच्या बायकांपैकी कोणी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर केवळ वारांगणा म्हणून बेइज्जतीनं पोलिस बोलायचे त्याच पोलिसांच्या वर्दीत मी आले. पण समाजाचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलत नाही, त्याचं वाईट वाटतं. आम्हाला आमच्या खानदानाची ओळख लपवून ठेवावी लागते.
मुळची सोलापूरची पण सध्या पुण्यात आरोग्य विभाग संचालनालयाकडं आफिस सुपरीडेंट असलेली पूजादेखील तेच म्हणते. आम्ही कोणत्या खानदानाचे? आमच्या खानदानाचा व्यावसाय काय? याला आता महत्व नाही. आम्ही पुढं आलोत. भूतकाळात रमण्याची गरज नाही. माझी आई, बहिण यांना मी आता देवविक्रीच्या व्यावासायातून बाहेर काढलयं. जितकं केलं तितकं बस्स. आता नको. पण जे केलं त्यावर मी उभे राहिलं हे विसरून कसं चालेल.
सोलापूरात देह विक्रीच्या व्यावसायामध्ये काही खानदानंच्या खानदानं आहेत. या व्यावसायातून या महिला बाहेर पडणं अशक्य आहे. त्यांचं 100 टक्के पुनर्रवसन होणंदेखील अवघड आहे. तथापि या व्यावसायातील महिलांमध्ये आता परिवर्तन झालय. मुलींना या व्यावसायात न ठेवता किंवा लग्न लावून देण्याऐवजी, जोकतीन म्हणून देवाला वाहण्याऐवजी मुलींना चांगलं शिकण देण्याचा पायंडा पडत आहे. काही मुली विविध पदांवर काम करीत आहेत. मुली शिकून मोठ्या नोकरीवर गेल्या तरी आई अगर खानदान यांना त्यांच्या देहविक्रीच्या व्यावसायासोबत एक्सस्पेट करीत आहेत. फक्त समाजाची नजर बदलायला हवी.
- काशीबाई जाधव
अध्यक्षा, क्रांती महिला संघ
‘त्या’ अंधारात आशेचा कवडसा
ना ओळखीचा ना पाळखीचा, यापूर्वी कधी न पाहिलेला, ना जातीचा ना पातीचा...अशा व्यक्तीशी शरीर विक्रीचा सौदा करायचा, काळ वेळ दिवस - रात्र इच्छा, मन असं काहीच न बघता चार भितींच्या आड अंधारात शरीर सोपवून द्यायचं. इभ्रतीवर घाला घालून घ्यायचा. रोजचं हेच...तीच ती दलदल हे वास्तव असलं तरी पैशाच्या बदल्यात ‘त्या’ अंधारात शरीर सोपवलं जातं. त्याचवेळी पोटच्या पोरींच्या उज्वल भविष्याचा किरण अथवा कवडसा वारांगणांना दिसतो.जणू रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.