सोलापूर : शहरातील टेक्स्टाईल उद्योगाला अत्यंत उपयुक्त मनुष्यबळ पुरवणारा शासकीय तंत्रनिकेतनचा टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग हा पदविका अभ्यासक्रम बंद करून स्थानिक यंत्रमाग उद्योगाला अडचणीत आणण्याचा प्रकार झाला आहे. प्रत्यक्षात टेक्स्टाईल विषयावर एकापेक्षा अधिक अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे असताना, सुरू असलेला एकमेव अभ्यासक्रमही बंद केल्याने या क्षेत्रातील केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या धोरणाला विसंगत भूमिका समोर आली आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्रात दोन ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता. त्यामध्ये नागपूर व सोलापूरचा समावेश होता. त्यापैकी सोलापूर शहरातील टेक्स्टाईल उद्योग हा टेरी टॉवेल उत्पादनातून सर्वाधिक निर्यात मिळवून देणारा ठरतो. तसेच सोलापुरी चादर देश-विदेशात लोकप्रिय आहे. त्यामुळे या पदविकेला सोलापुरात मोठी मागणी व रोजगाराची संधी उपलब्ध होती. यातून सोलापूरच्या स्थानिक कुशल मनुष्यबळाची गरज भागवली जाते. राज्यातील टेक्स्टाईल उद्योगाचे केंद्र असलेल्या इचलकरंजी टेक्स्टाईल हबमध्ये खासगी संस्थांकडून हाच पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. एवढेच नव्हे, तर पदविका अभ्यासक्रमासोबत फॅशन डिझायनिंग व टेक्स्टाईल प्रोसेसिंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सोलापूरला पदविका घेतलेले काही विद्यार्थी इचलकरंजीत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
मध्यंतरी एआयसीटीई या केंद्र सरकारच्या तंत्रशिक्षण संस्थेने पदविकेस प्रवेश मिळत नसल्याच्या कारणावरून पदविका अभ्यासक्रमच रद्द ठरवला. प्रत्यक्षात राज्यात केवळ दोनच ठिकाणी म्हणजे नागपूर व सोलापूर येथे असलेली टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका शिक्षण स्थानिक गरज न पाहता रद्द केली. आता सोलापुरातील टेक्स्टाईल हबसाठी पूरक अभ्यासक्रमच शिल्लक राहिलेला नाही.
ठळक बाबी
- प्रवेश कमी झाले म्हणून अभ्यासक्रम बंद केल्याचे कारण
- प्रत्यक्षात प्राध्यापकांची पदे मंजूर
- १९७६ पासून यशस्वी अभ्यासक्रमाचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ
- विद्यार्थ्यांनी यापूर्वी तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे पदविका सुरू ठेवण्याची केली होती विनंती
- अभ्यासक्रमासाठी जकार्ट, डॉबी, टेरी टॉवेल तयार करण्याचे यंत्र, स्पिनिंग रिंग फ्रेम, डबलर मशिन फ्रेम, मिनिएचर कार्ड, रॅपिअर मशिन, इलेक्ट्रॉनिक डॉबी, एअरजेट मशिन, साइजिंग मशिन अशा अनेक यंत्रसामग्री उपलब्ध
मुले परत गेली त्याचे काय?
यावर्षी प्रतीक्षा यादीतील ५० विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची तयारी दाखवली तरी ही पदविका बंद केल्याने प्रवेश मिळाला नाही. शेवटी त्यांना प्रवेश न घेताच परतावे लागले. मागील तीन वर्षांत सर्वच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश कमी झाले होते, हा निकष सरसकटपणे राज्यात केवळ दोनच ठिकाणी असलेल्या टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग अभ्यासक्रमाला लावला गेला.
वर्ष २०२०-२१ ची शेवटच्या तिसऱ्या वर्षाची बॅच संपल्यानंतर टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंगचा पदविका अभ्यासक्रम बंद करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पदविका अभ्यासक्रम बंद झाला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनंतरच कार्यवाही होऊ शकते.
- सोमनाथ हुनसिमरद, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर
यशस्वी करिअर तरी अभ्यासक्रम बंद का?
काही दिवसांपूर्वी या पदविकेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. या सर्व विद्यार्थ्यांनी या पदविकेचे शिक्षण घेतल्यानंतर देश व विदेशात उत्तम करिअरच्या संधी मिळवल्या आहेत. आम्हाला उत्तम करिअर मिळाले आहे तर ती संधी सोलापूरच्या स्थानिक विद्यार्थ्यांना
पुढेही मिळावी, अशी रास्त मागणी विद्यार्थ्यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.