उपळाई बुद्रूक : जिल्हा सोलापूर दाहावी-बारावीनंतर ग्रामीण भागात सुशिक्षित लोकही बऱ्याच मुलींची लग्न करतात. परंतु इथे मात्र गोष्ट वेगळी आहे. आई-वडील दोघेही अशिक्षित पण मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन कायम. आईवडिलांची हि धडपड मुलीची जिद्द बनली असून, त्यांचे कष्ट मुलीने सार्थकी लावले असून, विविध शिष्यवृत्तीचा लाभ घेत उच्च शिक्षण घेऊन बादलेवाडी (ता.माढा) येथील वर्षा नाना कोळेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकाचवर्षी एमपीएससीतुन 'उपशिक्षणधिकारी व सहाय्यक वन संरक्षक' अशा दोन पदांना गवसणी घातली आहे.
त्यांची हि यशोगाथा. बादलेवाडी गावात बहुतांश कुटुंबे हे अल्पभूधारक त्यात दुष्काळी भाग. त्यामुळे आर्थिक परिस्थिती आमच्या कुटुंबाची सुद्धा चांगली नव्हती. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाल. पुढे कुटुंबांच्या आर्थिक कारणामुळे मुंबईला जायचं ठरल. त्यामुळे पाचवीला मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला. पाचवी ते आठवी मुंबईला झाल्यावर परत गावाला आलो. पुढील शिक्षण निमगाव येथुन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुर्ण केले. दहावीची गुणपत्रिका आणायला शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी विवेकानंद महाविद्यालय प्रवेश घेण्याचे सुचिवले. खऱ्या अर्थाने आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट होता.
आई-वडील दोघेही शिकले नसले तरी, त्यांनी शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांनी इतर गोष्टीलाही दुय्यम स्थान देऊन शिक्षणासाठी पैसे प्राधान्याने पुरवले. विवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यांचे, प्राध्यापकांचे अभ्यासाबाबत वैयक्तिक लक्ष असायचे. त्यात प्राचार्य हिंदुराव पाटील यांनी करिअर निवडीबद्दल अनेक शंकाचे निरसन केले. त्यामुळेच कदाचित मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचे निश्चित केले. बारावी सीईटीला चांगले मार्क पडल्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे प्रवेश मिळाला. Katalyst नावाच्या संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे कुटुंबावरील बराचसा आर्थिक ताण कमी झाला. याकाळात मामांनी प्रशासकीय सेवा परीक्षाबद्दल माहिती दिली. तोपर्यंत या परिक्षेबाबत कसलीही माहिती नव्हती. इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना कॅम्पस मधून निवड झाली होती. परंतु स्पर्धा परीक्षेचे आकर्षण निर्माण झाले होते.
त्यामुळे खूप विचार करून युपीएससी करायच अस ठरवल. त्यासाठी ज्ञानप्रबोधनी या संस्थेत यूपीएससीसाठी मार्गदर्शन घेतल. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अथक परिश्रम घेत पहिल्या प्रयत्नात मुख्य परीक्षापर्यंत मजल मारली परंतु अंतिम यादीत नाव आले नाही. प्रयत्न सुरूच होते. त्यावेळी (IBPS PO) झाल असल्याने, विजया बँकेत असिस्टंट मॅनेजर नोकरीसाठी हजर होण्याचे पत्र मिळाले. अन् नेमकं त्याच वेळी यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नातील मुख्य परीक्षेच्या पेपर होता. त्यामुळे डोक्यात नुसता गोंधळ सुरू होता.
एकीकडे आर्थिक संकट तर दुसरीकडे प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी मुकण्याची भीती. शांतचित्ताने विचार करून इथे खूप मोठी रिस्क घेतली. बॅंकेतील नोकरी नाकारत यूपीएससी करण्यासाठी प्राधान्य दिले. त्यावेळी यूपीएससीची मुलाखतही दिली परंतु अंतिम यादीत नाव आले. पुन्हा पदरी निराशाच पडली. त्यात आता हातात आलेली बँकेतील नोकरी पण नव्हती. त्यामुळे खंत वाटू लागली. अशावेळी ज्ञानप्रबोधनी मधल्या विवेक कुलकर्णी व सविता कुलकर्णी यांना भेटून मनमोकळे करत खाजगी नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी सांगितलं 'जर आर्थिक कारणामुळे करत असेल तर लगेच निर्णय घेऊ नकोस' पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. व पुढील एका वर्षासाठी आर्थिक मदतही देऊ केली.
परंतु पुन्हा एकदा यूपीएससीत अपयश आल्याने तिथेच थांबत एमपीएससीकडे मोर्चा वळवला. सातत्याने अपयश आल्याने, खच्चीकरण होत होते. परंतु दरवर्षी नव्याने सुरुवात करायचे हे मनाशी पक्के केले होते. कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2019 ला एमपीएससीतुन सहायक वनसंरक्षक अधिकारी व उपशिक्षणाधिकारी या दोन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करता आले. हा प्रवास खूप कठीण होता. पण मी हार मानणार नव्हती. यामध्ये आई-वडील व मामांचा नेहमीच सपोर्ट होता. त्यांच्याशिवाय हे यश अशक्य आहे. कौटुंबिक वैचारिक समृद्धीमुळे उत्तमरीत्या शिक्षण पूर्ण करू शकले. कारण दहावीपर्यंत माझ्या वर्गातल्या बऱ्याच मुलींची लग्न झाली होती. तर बऱ्याच मुलांना आर्थिक कारणामुळे शिक्षण ठेवून काम करावे लागले. परंतु माझ्या कुटुंबाने शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे मी इथपर्यंत पोहचु शकले. सध्या उपशिक्षणाधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहे. असे त्या 'सकाळ' शी बोलताना सांगत होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.