Airport
Airport

सोलापूर विकास मंचने खोडून काढले "सिद्धेश्‍वर'चे चेअरमन काडादी यांचे सर्व मुद्दे 

Published on

सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी मंगळवारी कारखान्याच्या चिमणीबाबत काही मुद्दे उपस्थित केले होते. ते मुद्दे खोडून काढत सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी काडादींना चांगलेच खरमरीत उत्तर दिले आहे. 

एनटीपीसीचा पॉवर प्लांट हा विमानतळपासून 12.8 किलोमीटर लांब आहे व सिद्धेश्‍वर कारखाना हा विमानतळाच्या अगदी भिंतीलागतच आहे. डीजीसीएच्या नियमानुसार एनटीपीसीची चिमणी ही उड्डाण क्षेत्राच्या कक्षेत येत नाही. इतर 18 अडथळे आहेत ते म्हणजे उंच झाड, इमारतीवरील पाण्याची टाकी, मोबाईल टॉवर अशा प्रकारचे किरकोळ अडथळे आहेत. त्या सर्वांनी प्रशासन जेव्हा सांगेल तेव्हा लगेच आम्ही स्वतःहून अडथळे काढून घेऊ, असे लेखी लिहून दिलेले आहे. साखर कारखान्याची 90 मीटरची विनापरवाना चिमणी हा एकमेव मोठा अडथळा आहे. 

2009-10 ला किंगफिशर कंपनीची विमानसेवा चालू होती त्या कालावधीत कारखान्याच्या दोन चिमण्या 30 मीटर उंचीच्या होत्या. तरी सुद्धा डीजीसीए त्या वेळेस सुद्धा परवानगी देत नव्हते. त्या वेळी सोलापूर चेंबरने विनंती केल्यावर आसन संख्या कमी करून विमानसेवेला परवानगी दिली होती. 2014 साली 90 मीटरची अनधिकृत चिमणी रन-वेच्या मधोमध बांधली आहे, म्हणून ती अडथळा ठरत आहे. वर्षाला 400 ते 500 विमाने येतात आणि जातात ती सगळी विमाने चार्टर विमाने व ट्रेनिंगची विमाने येतात. ती विमाने एका दिशेने येऊ-जाऊ शकतात. पण ज्या वेळी प्रवासी विमानसेवा सुरू करावयाची असते त्यास शेड्यूल एअर सर्व्हिस म्हणतात त्यास परवानगी ही भारत सरकार अंतर्गत असलेली डीजीसीए म्हणजे (डायरेक्‍टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन) ही संस्था देते. त्यांच्या परवानगीशिवाय भारतात कोठेही प्रवासी विमानसेवा चालू होऊच शकत नाही व त्याच संस्थेने त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लेखी निकालात चिमणीची उंची कमी करण्याचे आदेश दिले आहेत. 

बेकायदेशीर बांधकामे केली म्हणून महापालिका कायदेशीर नोटीस देऊन पाडकामास येणार आहे, असे समजल्यावर कारखान्याकडून लगेच वेळ काढण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेतली. असे करून मागील सहा वर्षे कारखाना बेकायदेशीर सहवीज प्रकल्प व वाढीव गाळप चालवत आहते. आता न्यायालयाने आपले अर्ज फेटाळून लावले आहेत व महानगरपालिकेने चिमणी पाडण्याच्या कामास मान्यता दिली आहे, त्यानुसार आयुक्तांनी निविदा मागवल्या आहेत. 

कारखाना पहिला उभारला नंतर विमानतळ झाले हे म्हणणे साफ चुकीचे आहे. होटगी रोडवरील ही धावपट्टी ही 1948 पासून आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामात या धावपट्टीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे, त्यानंतर 1986 साली विमानतळाची पुनर्बांधणी केली आहे. प्रोजेक्‍ट मध्येच थांबवता येत नाही, असे सांगणाऱ्या कारखान्याने सगळ्या परवानग्या घेतल्या, शिवाय प्रोजेक्‍ट चालूच का केला, असा सवाल शेतकरी सभासदांचा आहे. त्यामुळे आता होणारे 250 कोटींच्या नुकसानीस आपणच जबाबदार, असा आरोप सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

सोलापूरची विमानसेवा सुरू होणे ही काळाची गरज आहे. साखर कारखान्याच्या एका चुकीच्या बांधकामामुळे संपूर्ण सोलापूरकरांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शिकलेला मुलगा हा नोकरीसाठी आई-वडील, शहर-जिल्हा सोडून बाहेरगावी जात आहे. केवळ विमानसेवा नसल्याने गेल्या अनेक वर्षात सोलापुरात एकही नवीन उद्योजक किंवा उद्योग आलेला नाही. त्यामुळे कारखाना प्रशासनाने स्वत:हून चिमणी हटवून विमानसेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करावे. 
केतन शहा, 
सदस्य, सोलापूर विकास मंच 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.