बार्शी : बार्शी येथील विशाल फटे (vishal fate)याच्या फसवणुकीची व्याप्ती राज्यभर असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. फटे याने राज्यातील शेकडो लोकांना ठकवले आहे. आतापर्यंत फटे याच्या विरोधात ७६ जणांनी तक्रार अर्ज दाखल केलेअसून फसवणुकीची रक्कम १८ कोटी ५३ लाख १७ हजार इतकी झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात आली आहे. (76 people filed complaint against vishal fate)
मागील तीन दशकांमध्ये बार्शी शहर अन् तालुक्यात नाईकवाडी प्लॉट येथील दीन स्टील, अमन चौकातील थंगम आणि आता विशाल फटे फसवणूक प्रकरण उघडकीस आले. या माध्यमातून बार्शीकरांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. फटे प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील इतर जिल्ह्यात कमिशन एजंट नेमून त्याने पैसे गोळा केले असल्याचे समोर येत आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून शासन व्यवहार बॅंकेमार्फत, गुगल, युपीएमार्फत करा असे आग्रही असतानाही फसवणूक झालेल्या शेकडो नागरिकांनी रोख रक्कम आणून विशाल फटेच्या ताब्यात देत होते. ती रक्कम मोजण्यासही तो वेळ घालवत नव्हता. रक्कम तशीच कपाटात ठेवत, असे आज अनेक जण सांगत आहेत.
शेअर मार्केटमध्ये इतके पैसे मिळत असते तर सर्वजण कामधंदे सोडून तेथेच बसले असते. आपणच स्वतःची फसवणूक करुन घेतली, असे म्हणून अनेक जण स्वतःची समजूत काढून घेत आहेत. विशाल फटे याने तीन वित्तीय संस्था स्थापन करुन शेअर मार्केटचा व्यवहार करतो, अशी थाप मारत पैसे घेऊन फसवले. प्रत्यक्षात त्याने कोणाचेही शेअर मार्केटमध्ये खाते उघडले नाही. स्वतःच्या खात्यावरुन तो व्यवहार करीत असे. सामान्य नागरिक, व्यापाऱ्यांना बॅंका पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर पूर्वसूचना द्या, असे सांगतात. पण फटे याने एकाच दिवसांत पन्नास लाख ते एक कोटी रुपये रक्कम काढले आहे.
विशाल फटे याच्या मित्राने ४१ लाख रुपयांची अलिशान चारचाकी कार बुक केली होती. ती अलिशान कार फटे याने स्वतःच्या वाढदिवसादिवशी रोख पैसे भरुन आणली होती. कार शेतामध्ये ठेवली असतानाही ती पहाण्यासाठी गर्दी होत होती. एका गुंतवणूकदाराने तेथूनही कार नेली असल्याची चर्चा आहे.९ जानेवारीपासून शहरातून विशाल फटे पळून गेला असल्याची चर्चा सुरु होताच, त्यांचे मोबाईल क्रमांक, ऑफिस, नेटकॅफे बंद दिसताच गुंतवणूकदारांनी त्याच्या ऑफिसमधील कॉम्प्युटर, इतर सामान लंपास केले आहे. तर घर फोडून घरातील पंखे, एसी यासह अन्य वस्तूही नेल्या आहेत.
विशाल फटे याच्याकडे फक्त स्वतःचा पासपोर्ट असून पत्नी व मुलीचा नाही. त्यामुळे तो परदेशात पळून जाऊ शकत नाही. जेथे पासपोर्टची गरज नाही, अशा लहान देशात तो जाऊ शकतो. पण तो लवकरच आमच्या ताब्यात येईल, असे पोलिस पथकांकडून सांगण्यात आले. किमान पाचशे कोटींपेक्षा जास्त आर्थिक फसवणुकीचे हे प्रकरण असल्याची चर्चा असून पाचशेपेक्षा जास्त जणांची रक्कम गुंतवणूक असल्याने या घटनेचा तपासासाठी विशेष पोलिस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकाचे तपास अधिकारी म्हणून आर्थिक गुन्हे शाखा सोलापूरचे पोलिस उपअधीक्षक संजय बोठे आहेत. तर पोलिस उपअधीक्षक विशाल हिरे, पोलिस निरीक्षक रामदास शेळके, पोलिस निरीक्षक नारायण मिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार या समितीचे सदस्य आहेत.(fraud news)
विशाल फटे फसवणुकीत आघाडीवर
बारावीपर्यंत शिक्षण झालेला विशाल फटे याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए. ची पदवी घेतली होती. इंग्रजीवर बऱ्यापैकी प्रभुत्व असल्याने माणूस त्याला भेटला की फसलाच म्हणून समजा. त्याने पुण्यामध्ये असताना बारावीमध्ये गणित विषयांत प्रथम आल्यानंतर त्याचा सन्मान महाविद्यालयाने ठेवला होता. त्यावेळी त्याने मेसमधील महिलेला आई म्हणून सोबत नेहून सन्मान स्वीकारला होता.
पुणे, कोल्हापूरसह कर्नाटकपर्यंत व्याप्ती
पुणे येथील खराडी येथे कार्यालय उघडून तेथे एक जणाला कामाला ठेवून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तर वाघोली (पुणे) येथील फसवणूक झालेले नागरिकही पोलिसांच्या संपर्कात आले आहेत. चाळीसगाव, कोल्हापूर, कर्नाटकमधील निपाणी येथील अनेक नागरिकांना गंडा घातला असून त्यांनीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
एकच ध्येय, गर्भश्रीमंत व्हायचे
फटे याचे वडील प्राध्यापक होते. त्याला कॉलेज रोडला कॅफे टाकून दिले. पण ग्राहक नसताना निवांत वेळेत शेअर मार्केट पाहण्याचा उपक्रम त्याने सुरु केला. त्यातून तो स्वतः गुंतवणूक करीत होता. नेट कॅफेमध्ये रोज पाचशे ते हजार रुपये मिळवण्यापेक्षा शक्कल लढवून विशाल फटेने ही योजना आखली. नेट कॅफे भावाकडे दिले अन् तीन वर्षात विश्वास संपादन करुन कोट्यवधीची माया गोळा केली.(Solapur news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.