सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमध्ये आता ७०० शिक्षकांची भरती होणार आहे. मागासवर्गीय कक्षाकडून जिल्हा परिषद शाळांची बिंदुनामावली अंतिम झाल्यानंतर भरती प्रक्रियेला वेग आला आहे.
आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पडल्यानंतर ‘पवित्र’ पोर्टलवर रिक्त पदांची माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी मिळणार असून अंतिम टप्प्यात मेरिट यादीनुसार ही भरती होईल.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात दोन हजार ७९५ शाळा आहेत. या शाळांमध्ये साडेआठ हजारांपर्यंत शिक्षक आहेत, पण पटसंख्येच्या तुलनेत अद्याप शिक्षकांची संख्या कमीच आहे. जवळपास सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नसल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी जास्त अन् शिक्षक कमी अशी स्थिती आहे.
आता राज्य सरकारने ३२ हजार शिक्षक भरती जाहीर केली आणि सर्व जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाने तपासून अंतिम केली. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ६२० पदे तर उर्दु माध्यमांच्या शाळांमध्ये ५८ आणि कन्नड माध्यमांच्या शाळांमध्येही जवळपास ३० पदांची भरती होणार आहे.
पण, आंतरजिल्हा बदलीमुळे परजिल्ह्यातील काही शिक्षक सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे हा आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पार पडल्यानंतर उर्वरित जागांवर नवीन शिक्षकांची भरती होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कोणत्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गाची पदे रिक्त आहेत ही माहिती आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र शिक्षकांना पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांना अर्ज करण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात जिल्हा परिषदेच्या ३७ शाळा असून त्यातील महालक्ष्मी नगर व सलगरवाडी येथील शाळा पटसंख्येअभावी गतवर्षी बंद पडल्या आहेत. आता उर्वरित ३५ पैकी कमी पटसंख्या असलेल्या काही शाळा जवळील शाळांमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पटसंख्या कमी असतानाही त्याठिकाणी जास्त शिक्षक कार्यरत आहेत. त्या शिक्षकांना दुसऱ्या शाळांमध्ये नेमणूक दिली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.
उर्दु माध्यम रिक्त पदे
जात संवर्ग - भरती होणारी पदे
एसटी- १८
एससी -५
एनटी-ब -६
एनटी-क -९
एनटी-ड -५
एसबीसी -५
खुला - १०
एकूण - ५८
(मराठी माध्यम)
जात संवर्ग - भरती होणारी पदे
एसटी -४३०
एससी- ५२
ओबीसी -४२
खुला -३४
ईडब्ल्यूएस- ६२
एकूण -६२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.