Cement Rate : सिमेंट दरात उत्पादकांकडून अचानक कृत्रिम दरवाढ

कोळशासह कच्चा माल अन् वाहतूक खर्चात दरवाढ नाही, तरीपण महाग केले सिमेंट; घर बांधकामाचे बिघडले गणित.
cement price increased
cement price increasedsakal
Updated on

सोलापूर : बांधकामांसाठी अत्‍यावश्‍‍यक सिमेंटच्‍या दरात गेल्‍या सहा दिवसांत प्रतिपोते ४० रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी सिमेंटच्या कृत्रीम दरवाढीचा परिणाम अनेक घटकांवर होत आहे. सिमेंट दरवाढीतून बांधकाम खर्च वाढला आहे, त्याचा सर्वाधीक सर्वसामान्‍यांना फटका बसत आहे. सिमेंट पोत्याचा दर हा ३३० वरुन ३७० रुपयांवर गेला आहे.

सिमेंटच्या दरवाढीला कोळशासह कच्‍चा माल व वाहतूक खर्च वाढल्याची पुष्टी सिमेंट उद्योगांकडून दिली जात असली तरी कोळसा आणि वाहतूक दरात वाढ झाली नसल्‍याचे कोळसा उद्योजक आणि वाहतूक व्यावसायिकांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्यामुळे सिमेंटची दरवाढ ही नैसर्गिक नव्हे, तर कृत्रिम असल्‍याचे उघड होत आहे.

दरम्यान, सिमेंट उद्योजकांनी एकत्र येऊन अचानक वाढविलेल्‍या दरवाढीसंदर्भात सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी बांधकाम व्‍यावसायिक, सिमेंट ग्राहक यांच्याकडून होत आहे.

सप्‍टेंबर महिनाअखेरपर्यंत विविध उद्योगांचा सिमेंटचा दर प्रतिपोते २८० ते ३३० रुपयांपर्यंत होता. मात्र, उद्योगांनी अचानक एक ऑक्‍टोबरपासून सिमेंटच्‍या दरात वाढ केली. पाच ऑक्‍टोबरपासून त्‍याच्‍या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. सोलापूर शहर परिसरात विविध सिमेंट निर्मितीचे उद्योग आहेत. तर शहरासह जिल्ह्यात त्‍यांचे वितरक असून दरररोज हजारो पोत्‍यांची विक्री होते.

आता प्रत्‍येकजण आरसीसी घर बांधत असल्‍याने त्‍यासाठी सिमेंट गरजेचे आहे. त्यातून सिमेंटचा वापर वाढला आहे. मागणी वाढली आहे. तसेच केंद्र व राज्‍य सरकारच्‍या घरकुल योजनांमुळे सर्वसामान्‍य ‍नागरिकांचे आरसीसी घराचे स्‍वप्‍न साकार होत आहे. सिमेंटचे दर वाढल्‍याने शासकीय योजनांसह स्‍:वखर्चातून घर बांधणाऱ्या सर्वसामान्‍य माणसाचे आर्थिक गणित बिघडल्‍याने घराचे स्‍वप्‍न धुसर बनले आहे.

सिमेंटचे दर वाढल्‍याने साहजिकच बांधकाम व्‍यावसायिकांनाही दरात वाढ करावी लागली आहे. मात्र, या दरवाढीबद्दल सर्वसामान्‍यांसह बांधकाम व्‍यावसायिकांतून नाराजी व्‍यक्‍त होत आहे. या दरवाढीविषयी सिमेंट उद्योग कोळशासह कच्‍चा माल व वाहतूक दरवाढीचे कारण देत आहेत. मात्र, कोळसा व वाहतूक दरात वाढ झाली नसल्‍याचे वास्‍तव आहे. सिमेंटसाठी लागणाऱ्या कोळशाच्‍या दरात कोणतीही वाढ झाली नसल्‍याचे वेस्‍टन कोल लिमिटेडने स्‍पष्‍ट केले आहे.

तर सध्‍या वाहतूक दरवाढीसाठी डिझेल दरवाढीसह कोणतेही कारण दिसत नाही. त्‍यामुळे सिमेंट दरवाढ नैसर्गिक नव्हे तर कंपन्‍यांनी एकत्र येऊन केलेली कृत्रिम दरवाढ केल्‍याचे दिसत आहे. याविरोधात बांधकाम व्‍यावसायिकांनी सरकार दरबारी आवाज उठवावा, अशी मागणी सर्वसामान्‍यांतून होत आहे.

कच्‍चा माल, वाहतूक दरवाढीचा परिणाम सध्‍या सिमेंटचे दर प्रतिपोते ३७० रुपयांपर्यंत आहेत. कोळशासह कच्‍चा माल, वाहतूक दरात झालेल्‍या दरवाढीमुळे सिमेंटचे भाव वाढवावे लागले आहेत.

- सुमीत चौधरी, वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक, एसीसी सिमेंट कंपनी

‘एमओसी’कडून कोळशाची आधारभूत किंमत ठरविली जाते. सिमेंट निर्मितीसाठी नॉन कोकिंग कोळशाचा वापर होतो. त्‍याच्‍या जी नऊ, जी १०, जी १३ या प्रकारच्‍या कोळशाच्‍या दरात कोणतीही वाढ झाली नाही. सध्‍या प्रतिटन दोन हजार रुपयांपर्यंत कोळशाचा दर आहे.

- अभषचंद्र सिंग, सहायक सरव्‍यवस्‍थापक, वेस्‍टर्न कोल लिमिटेड

सिमेंटच्‍या दरवाढीमुळे बांधकाम खर्च वाढला आहे. आम्‍हाल नाईलाजाने दरवाढ करावी लागली आहे. सिमेंटर दरवाढ नैसर्गिक नाही. कारण आता वाहतूक खर्च वाढायला इंधन दरवाढीसह कोणतेच कारण नाही. त्‍यामुळे कंपन्‍यांनी एकत्र येऊन ही दरवाढ केली आहे. सरकारने याप्रकरणी तातडीने लक्ष घालून दर नियंत्रणात आणावे, अन्‍यथा सिमेंट उत्‍पादक कंपन्‍यांची मनमानी अशीच सुरू राहील.

- शशिकांत जिड्डीमनी, अध्‍यक्ष, क्रेडाई, सोलापूर

सध्या माझ्‍या घराचे बांधकाम सुरू आहे. अचानक सिमेंटचे दर वाढल्‍याने बांधकामाचा खर्च वाढला आहे. दरवाढीविरोधात बांधकाम व्‍यावसायिकांनी सरकार दरबारी आवाज उठवावा. सिमेंटचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी परवडणारे नाहीत.

- सुखदेव गुरव, नागरिक, जुळे सोलापूर

तत्कालीनवेळी गडकरींचा इशारा अन्‌ दरवाढ मागे...

सन २०१९ मध्‍येही सिमेंट उत्पादक उद्योगांनी अशाच प्रकारे अचानक दरवाढ केली होती. देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्‍या रस्त्यांच्या कामांनाही याचा मोठा फटका बसला होता. यादरम्यान केंद्रीय वाहतूक व दळणवळणमंत्रि नितीन गडकरी यांनी सिमेंट उत्पादकांना इशारा दिला होता. दरवाढ मागे न घेतल्‍यास परदेशातून सिमेंट आयात करु असे सांगितले होते. श्री. गडकरींच्या इशाऱ्यानंतर सिमेंट उद्योगांनी दरवाढ मागे घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.