पूर परिस्थिती नियंत्रणासाठी बोरी मध्यम प्रकल्प, कुरनूर या धरणातून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
अक्कलकोट (सोलापूर): कुरनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी होवून अक्कलकोट तालुक्यातील हरणा व बोरी या नद्यांच्या पाणी प्रवाहामध्ये जलदगतीने वाढ झालेली आहे. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी बोरी मध्यम प्रकल्प, कुरनूर या धरणातून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
या अंतर्गत 28 सप्टेंबर पहाटे चार वाजल्यापासून 3000 आणि काही काळ कमी करून सायंकाळ पासून पुन्हा 3000 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे धरणाखालील बोरी नदीच्या पाणी प्रवाहामध्ये वाढ होवून पूरप्रवण क्षेत्रातील गावांचा संपर्क तुटला आहे. यास्तव मंगळवारी तालुक्यातील बोरी नदी पूरप्रवण क्षेत्रातील काळेगाव, सांगवी बुद्रूक, आंदेवाडी जहांगिर व चिंचोळी (मै) या गावांना मनिषा आव्हाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, उपविभागीय अधिकारी, अक्कलकोट व बाळासाहेब सिरसट, तहसिलदार अक्कलकोट आदी अधिकारी यांनी भेट देवून पाहणी केलेली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी माहिती दिली आहे की, आजच्या झालेल्या भेटीअंतर्गत संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना नागरिकांना देणेत आल्या असून सर्व शासकीय विभागांना देखील आवश्यक ती कार्यवाही जलदगतीने करण्यास कळविण्यात आले आहे. मौजे काळेगाव येथील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू व वैद्यकीय सेवेची आवश्यकता भासल्यास तालुका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मौजे चिंचोळी मै. येथील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद दुधनी यांना कळविण्यात आले असून मौजे आंदेवाडी ज. येथील नागरिकांना आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सेवा पुरविणे कामी आरोग्य विभागाचे पथक पाठविण्यात आले आहे. तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये काही समस्या निर्माण झाल्यास त्यासंदर्भात तालुका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय अक्कलकोट येथील टेलिफोन क्रमांक 02181 220733 या क्रमांकावर कळविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.