मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या आठव्या दिवशीही जिल्ह्यात आंदोलनाची धग वाढतच आहे. सलग दुसऱ्या दिवशी मराठा समाजाच्या युवकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी महामार्गांवर रास्ता रोको, टायर पेटवून देऊन राज्य सरकारचा निषेध केला. शेटेवस्ती येथे लोहमार्गावरही टायर पेटवून रेल्वे रोखण्यात आली. दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील एका ३० वर्षीय दिव्यांग तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ही घटना तालुक्यातील तारापूर येथे काल(मंगळवार) पहाटेच्या सुमारास घडली. विलास कृष्णा क्षीरसागर, असे या तरुणाचे नाव आहे.
आंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस होता. त्यांना समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून योग्य तोडगा न निघाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. मंगळवारीदेखील जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.
पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील विलास क्षीरसागर हा मराठा आंदोलनामध्ये मागील काही दिवसांपासून सक्रिय होता. सोमवारी रात्री अकरा वाजेपर्यंत तो आंदोलनस्थळी बसून होता. दरम्यान, रात्रीत त्याने जवळच असलेल्या करंजीच्या झाडाला भगव्या शालीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यानंतर मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केली.
विलास क्षीरसागर याच्या आत्महत्येमुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या तरुणांनी तारापूर चौकात चार तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही , अशी आंदोलकांनी भूमिका घेतली होती. तहसीलदार सुशील बेल्हेकर आणि पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मराठा समाज आंदोलकांबरोबरच चर्चा करून सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचे आव्हान केले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने विलास क्षीरसागर याच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना दिले.
नियमानुसार सर्व ती मदत दिली जाईल. मयत कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारला पाठवला जाईल, असे आश्वासन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी विलास क्षीरसागर याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा तारापूर येथे विलास क्षीरसागर यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून तपास पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील हे करीत आहेत.
सोलापूर शहरात आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर मराठा समाजबांधवांनी आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर शेटेवस्ती येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवून लोहमार्गावर टायर पेटवून दिले. सोलापूर-पुणे महामार्गावरही टायर पेटविण्यात आले. सोलापूर शहरापेक्षा ग्रामीण भागात या आंदोलनाची धग जास्त आहे. ग्रामीण भागातील अघोषित बंदसदृश्य स्थिती आहे.
बंदची हाक कुणाची?
सकल मराठा समाजाने कोणत्याची प्रकारचा बंद पुकारलेला नाही. सोमवारच्या बंदची पोस्ट समाजा माध्यमात नेमकी कोणी व्हायरल केली. याचा शोध घ्यावा. मराठा समाजाचे आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र यामागे असून शकते. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. कुणाचीही गैरसोय होऊ नये, असा सकल मराठा समाजाचा हेतू आहे, असे सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी कळविले आहे.
ठळक बाबी
जिल्ह्यातील बस वाहतूक पूर्णपणे ठप्प
ठिकठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा
जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले टाळे
सोलापूर शहरात ठिकठिकाणी मेणबत्ती मोर्चा
करमाळा तालुक्यात आदिनाथ कारखान्याजवळ बस पेटविली
पंढरपूर तालुक्यातही आंदोलकांकडून बस गाड्या लक्ष्य
तिऱ्हे (ता.उत्तर सोलापूर) येथे जरांगे- पाटील यांच्या आरोग्यासाठी मसोबाला दंडवत
अंकोली (ता. मोहोळ) येथे सोमवारी रात्री उशिरा पेटविली एसटी बस
कोंडीत आज गावबंद-चुलबंद
आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.