प्रणिती शिंदे समर्थक म्हणाले, राष्ट्रवादी हाच आपला कट्टर शत्रू असून, त्या पक्षातील नाराजांचा शोध घेऊन त्यांना फोडण्याची गरज आहे.
सोलापूर : महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) केंद्र सरकारविरोधात वारंवार रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमधील (Congress) नाराज माजी महापौर नलिनी चंदेले व माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कॉंग्रेसला शरद पवार यांचा हा घाव वर्मी बसल्याचे दिसून आले. कारण, त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांचे समर्थक म्हणाले की, राष्ट्रवादी हाच आपला कट्टर शत्रू असून, त्या पक्षातील नाराजांचा शोध घेऊन त्यांना फोडण्याची गरज आहे.
महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर शिवसेनेने सर्वप्रथम शहरातील बहुतेक प्रभागांमध्ये शिवसंपर्क अभियान राबविले. त्यानंतर कॉंग्रेसने 'कॉंग्रेस मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात" हे अभियान हाती घेतले. यामध्ये राष्ट्रवादीनेही उडी घेत जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसने पहिलाच कार्यक्रम घेतला आणि शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले. आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारबरोबरच माजी पालकमंत्री व शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, त्यानंतर कॉंग्रेसच्या बाजूने तयार झालेले वातावरण कॉंग्रेसला कायम ठेवता आले नाही. त्याचाच परिणाम म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दौऱ्यात कॉंग्रेसचे माजी महापौर व माजी शहराध्यक्षांनी पक्षालाच हात दाखविला. त्यांच्यासोबत काही पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर हे काहीच नाही, आणखी खूप मोठे नेते येतील, असा गौप्यस्फोट महेश कोठेंनी केला.
दरम्यान, काही दिवसांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दौरा केला. त्यावेळी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी हाच आपला खरा शत्रू असल्याचे विधान केले. अशा अस्थिर वातावरणात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याची गरज असतानाही कॉंग्रेस नेत्यांना त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील काही पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभर झाले असून ते दुसऱ्या पक्षात जाण्याची तयारी करीत असल्याचेही बोलले जात आहे.
बालेकिल्ला सांभाळण्याचे प्रणितींसमोर आव्हान
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत देऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी हॅट्ट्रिक करीत विधानसभेत एंट्री केली. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले महेश कोठे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर ऍड. यू. एन. बेरिया यांचीदेखील चर्चा आहे. तर कॉंग्रेसच्या काही नगरसेविका, नगरसेवक वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून भाजपने शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करीत कॉंग्रेसचा बालेकिल्ला पोखरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे महापालिकेवरील सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या कॉंग्रेससमोर आमदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला सांभाळण्याचेही आव्हान असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.