मळेगाव : जलसंधारणाबरोबरच गावकऱ्यांचे मनसंधारण झाल्यामुळे बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने इतिहास घडविला. कायम दुष्काळी भाग असलेली ओळख पुसून सुर्डी गावात जलक्रांती निर्माण केली. केलेल्या कामाचे फलित म्हणून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत गावास दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच जल व्यवस्थापनामध्ये देशपातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने सुर्डी गावास राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते वृक्षमित्र मधुकर डोईफोडे, माजी सरपंच विनायक डोईफोडे, आयएफएस जीवन दगडे यांना सुर्डी गावचा राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुर्डीतील गावकऱ्यांनी जलसंधारणाशी मनसंधारण करून काहीही झाले तरी आपले गाव पाणीदार करायचे म्हणून कंबर कसली आणि पुढे वॉटर कप स्पर्धा-२०१९ मध्ये गावचा सहभाग नोंदवला. यासाठी ‘माथा ते पायथा’ हे जलसंधारणाचे सूत्र समोर ठेवून कामास सुरवात केली. त्यामध्ये ग्रामस्थांनी प्रभावी वॉटर बजेट राबवून कामाचा डोंगर उभा केला. पाणी फाउंडेशनचे ७५ लाख, राज्य शासनाचे ७५ लाख असे दीड कोटी रुपयांचे मानकरी सुर्डी गाव ठरले.
बालेवाडी येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा अभिनेता आमिर खान, किरण राव, राज्य समन्वयक अविनाश पौळ, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते सुर्डी गावास पाणी फाउंडेशनचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हेच केलेले काम राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर पोचले आणि सुर्डी गावास राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त झाला. मार्च, एप्रिल महिन्यात देखील मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने सुर्डी गावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. जलसंधारणाच्या झालेल्या कामामुळेच सुर्डी गावच्या परिसरात ३५ कोटी लिटर पाणीसाठा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
माझ्या गावाने सर्व गट-तट आपसातील हेवेदावे विसरून सुर्डी गावचे नाव देशपातळीवर पोचवले आहे. गावातील आबालवृद्धांनी, युवकांनी दाखवलेल्या एकीचे व मेहनतीचे हे फळ आहे. देशाचा राष्ट्रीय जल पुरस्कार सुर्डी गावास भेटणे ही अभिमानाची बाब आहे.
- मधुकर डोईफोडे, वृक्षमित्र, सुर्डी, ता.बार्शी
सुर्डीने गाव पाणीदार करून एक इतिहास निर्माण केला आहे. ऐन उन्हाळ्यात देखील सुर्डी गावच्या परिसरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असणे हे केलेल्या कामाचे फलित आहे. ही चळवळ गावोगावी उभी केली तर कायमचा दुष्काळ मिटेल.
- नितीन आतकरे, तालुका समन्वयक, पाणी फाउंडेशन
कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून सुर्डीची ओळख होती. जलसंधारणाच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे सुर्डीची ओळख पाणीदार गाव म्हणून झाली आहे. गावातून पाण्याचा एक थेंबही वाया जात नाही. जेवढे पाणी पडते तेवढे अडले जाते व जिरलेही जाते. सुर्डीत आलेल्या श्रमदानाच्या तुफानाने सर्व काही बदलून गेले आहे.
- विनायक डोईफोडे, माजी सरपंच, सुर्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.