करकंब : फेब्रुवारी महिना उजाडला की सर्वांना विशेषतः तरुणाईला वेध लागतात ते १४ फेब्रुवारीचे अर्थात ’व्हॅलेंटाईन डे’चे! याची सुरुवात आठ दिवस आधीच म्हणजे ’रोज डे’पासूनच होते. पण याच कालावधीत अनेक पक्ष्यांचा विणीचा काळ सुरू होत असल्याने खरे ’व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन’ त्यांच्यामध्ये पहायला मिळते. मागील आठवडाभर सोशल मीडियावरून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विविध पोस्ट व्हायरल होत असताना निसर्गातील काही पक्ष्यांचे व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन पहायला मिळाले.
परवा म्हणजे तुमच्या-आमच्या ’चॉकलेट डे’ दिवशी शाळेच्या मैदानातील बुचाच्या झाडावर बुलबुल पक्षी विशिष्ट आवाज काढून छान नृत्य करताना चौथीतील मुलींनी पाहिला. माझे पक्षीवेड त्यांना माहीत असल्याने त्यांनी मला ’ओ सर, बुलबुल बघा किती छान डान्स करतोय! त्याचे फोटो काढा’, असे फर्मान सोडले.
वास्तविक पाहता कागदी पंख्याप्रमाणे आपली शेपटी फुलवून आणि पंख पसरुन विशिष्ट लयीत नाचताना आणि विशिष्ट आवाज काढत आपल्या जोडीदाराला साद घालणाऱ्या बुलबुल पक्ष्याचे निरीक्षण आधीपासूनच चालू होते. एकूण दहा बुलबुल पक्षांचे व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनची तयारी मागील तीन-चार दिवसांपासून (कदाचित रोज डेपासून) चालू होती. आजअखेर दोघा जणांनी आपापला जोडीदार निवडल्याचे लक्ष्यात आले होते. कारण ह्या दोन जोड्या एकसाथ बागडताना आणि प्रेमी युगलाप्रमाणे एकमेकांशी लगट करताना दिसत होत्या. इतर बुलबुल मात्र अजूनही एक-एकटेच बसून विशिष्ट आवाज काढत आणि एका लयीत विशिष्ठ हालचाली करून जोडीदाराला वश करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.
कदाचित आजच्या व्हॅलेंटाईन डेपर्यंत त्यांचेही प्रयत्न फळाला आलेले असतील. सनबर्ड अर्थात शिंजिर पक्ष्यांची देखील छान जोडी जमली असून त्यांनी पुढील संसाराच्या दृष्टीने तयारीही चालू केली आहे. गुलाबाच्या फांदीवर घरटे बनविण्यासाठी मादीची धडपड असून निळाशार शिंजिर आजूबाजूला देखरेख करताना आणि गाताना दररोज भेटतोय. आज (रविवार) शेतातून फेरफटका मारताना जुन्या विहिरी जवळील वाळलेल्या बाभळीच्या झाडावर अशीच तांबट पक्ष्याची जोडी मस्त विहरताना दिसली. फेब्रुवारी ते एप्रिल हा विणीचा काळ असलेल्या तांबट पक्ष्याची जोडीही अशीच व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर नवसंसार थाटण्यासाठी लगबग करताना दिसत होती.
जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी एकमेकांना साद
एकंदरीतच बहुतांश पक्ष्यांचा विणीचा काळ हा फेब्रुवारी ते जून महिन्याच्या दरम्यान असल्याने व्हॅलेंटाईन डेला जसे मानव प्राण्यातील तरुणाईला प्रेमाचे भरते येते. त्यात किती जणांना यश येते हा संशोधनाचा भाग असला तरी पक्षी जीवनात मात्र फेब्रुवारी महिन्यात विणीचा काळ असणारे पक्षी मनसोक्त पणे व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, हे मात्र नक्की! आणि म्हणूनच आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी पक्ष्यांनी एकमेकांना घातलेली साद ऐकणे असो की त्यांनी केलेले सुंदर नाच असो याची अनुभूती घेणे ही सुद्धा एक परवणीच ठरते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.