सोलापूर : राज्यातील धरणांनी तळ गाठला असून धरणांमधील पाणीसाठा सरासरी ३० टक्क्यांवर आहे. जमिनीची पाणीपातळी खालावल्याने अनेक गावे, वाड्या-वस्त्यांवरील हातपंप बंद पडले असून ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या विहिरींमधील पाणी खोलवर गेले आहे. या पार्श्वभूमीवर टॅंकरची मागणी वाढत असून सध्या राज्यातील १५ जिल्ह्यांमधील एक हजार २३९ गावांसह दोन हजार ७७९ वाड्या-वस्त्यांना एक हजार ५३२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
रायगड जिल्ह्यात १३, पालघरमध्ये १३, धुळ्यात पाच, जळगाव जिल्ह्यात ५३, सोलापूर जिल्ह्यात ३८, अमरावतीत एक, बुलढाण्यात २७ टॅंकर सुरु आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत ८४ गावे आणि २०९ वाड्यांवर टॅंकर सुरु झाले आहेत. सध्या सुरु असलेल्या एक हजार ५३२ टॅंकरमध्ये साडेचौदाशे टॅंकर खासगी आहेत. गतवर्षी १ एप्रिल रोजी राज्यातील अवघ्या ५९ गावांमध्ये ६८ टॅंकर सुरु होते. यंदा मात्र साडेबाराशे गावांमध्ये साडेपंधराशेपर्यंत टॅंकर सुरु असल्याची वस्तुस्थिती आहे.
टॅंकरसाठी १०० कोटी
राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज टॅंकरची मागणी वाढत असून यंदाच्या दुष्काळात १५ हजार टॅंकर सुरु होतील, असा अंदाज आहे. शासनाकडून त्यासाठी १०० कोटींचा निधी दिल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.
सात तालुक्यांमध्ये भीषण स्थिती
राज्यातील नगर जिल्ह्यातील १०४ गावे व ५२९ वाड्यांना १०३ टॅंकर, पुणे जिल्ह्यातील ३९ गावे व ३५२ वाड्यांवर ७१, सातारा जिल्ह्यातील १४२ गावे आणि ५३१ वाड्यांवर १४९ टॅंकर, सांगलीतील ७४ गावे व ५३१ वाड्यांवर ७७, छत्रपती संभाजीनगरातील २३९ गावे आणि ४९ वाड्यांवर सर्वाधिक ३८४, जालन्यातील २२७ गावे व ७३ वाड्यांवर २७१ आणि बीड जिल्ह्यातील १०६ गावे आणि ६९ वाड्यांवर ११९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दर आठवड्याला सुमारे १५ ते २० गावे व तेवढ्या वाड्यांवर टॅंकरची मागणी होत आहे.
पाण्याचा टॅंकर देण्याचे अधिकार प्रातांधिकाऱ्यांना देण्यात आले असून टॅंकर मागणी करणाऱ्या गावांमधील पाण्याची स्थिती, भूजल पातळी व ग्रामपंचायतीचा ठराव पडताळला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या ३८ टॅंकर सुरू असून दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे.
— अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.