Mahayuti Propaganda : प्रचारासाठी ‘महायुती’ने आखली दशसूत्री; योजनांचा घरोघरी करणार प्रचार

लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्याने महायुती सरकारने नाराज घटकांना खूष करण्यासाठी मागील तीन महिन्यांत तब्बल दीड लाख कोटींच्या नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत.
Government Womens Scheme
Government Womens Schemesakal
Updated on

सोलापूर - लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्याने महायुती सरकारने नाराज घटकांना खूष करण्यासाठी मागील तीन महिन्यांत तब्बल दीड लाख कोटींच्या नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांची तातडीने अंमलबजावणीही सुरु केली आहे.

आता विधानसभा निवडणुकीत हमखास यश मिळेल आणि ‘मी पुन्हा येईन’चा नारा खरा ठरेल या हेतूने दरमहा १० हजार रुपयांचे मानधन देऊन तब्बल ५० हजार योजना दूत नेमले जात आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रमुख १० योजनांचा घरोघरी प्रचार व प्रसार केला जाणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक ५४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून योजनेसाठी आतापर्यंत अडीच कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आठ लाखांहून अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी नोंदणी केली आहे.

त्यांना आता दरमहा सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन (सहा महिन्यांपर्यंत) मिळणार आहे. २० लाख मुलींना मोफत उच्चशिक्षण (६५०हून अधिक कोर्स) देण्याचाही निर्णय झाला असून अशा सर्वच प्रमुख योजनांचा प्रचार शासकीय खर्चातून केला जाणार आहे.

गावागावात योजनादूत नेमून एकूण ५० हजार जणांच्या माध्यमातून त्या योजना घरोघरी पोचविल्या जातील. त्यावेळी महायुती सरकारचा प्रचार होणार आहे. प्रमुख दहा योजनांवर महायुती सरकारची मदार अवलंबून असून त्यावरच महायुतीतील तिन्ही पक्षांचा प्रचार असेल हे निश्चित.

लोकसभेनंतर ‘महायुती’चे ७,६८० शासन निर्णय

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने राज्य सरकारने १ जुलैपासून नवनवीन योजनांचा सपाटा लावला. मागील सव्वातीन महिन्यांत राज्यातील महायुती सरकारने १ जुलै ते १० ऑक्टोबर या काळात तब्बल ७,६८० शासन निर्णय काढले आहेत. त्यात महाविद्यालयीन मुलींसह वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठीच्या योजनांचा समावेश आहे.

‘या’ १० योजनांवर विधानसभेची मदार

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : दरवर्षी ५० हजार कोटींचा खर्च, अडीच कोटी लाभार्थी

  • मुख्यमंत्री वयोश्री योजना : दरवर्षी ९००० कोटींचा खर्च, आतापर्यंत १८ लाख लाभार्थींची नोंदणी

  • मुलींना मोफत उच्चशिक्षण : २० लाख लाभार्थी मुली, दरवर्षी शासन भरणार १८०० कोटी

  • पिंक (गुलाबी) ई-रिक्षा : १७ शहरांमधील १० हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट

  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : दरवर्षी १० लाख तरुण-तरुणींना लाभ, दरमहा ६ ते १० हजारांचे विद्यावेतन

  • पंढरीत येणाऱ्या मानाच्या पालख्यांना निधी : ३४४ पालख्यांना प्रत्येकी २० हजार रु.

  • एक रुपयात पीकविमा : एक ते सव्वाकोटी शेतकऱ्यांना लाभ, शासन भरते दरवर्षी ७०० कोटींचा हिस्सा

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’मधील महिलांना दरवर्षी ३ गॅस सिलिंडर मोफत

  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : वयोगट ६० वर्षे पूर्ण, प्रतिप्रवासी सरकार देणार ३० हजार रुपये

  • नमो शेतकरी सन्मान निधी योजना : ९२ लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी ६ हजार कोटी

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.