Solapur Lok Sabha: सोलापूरचा खासदार कोण? 46 वर्षे काँग्रेस तर 17 वर्षे भाजपची सत्ता; आई-वडिलांच्या पराभवाचा वचपा लेक काढणार ?

सोलापूर जिल्ह्यात आमदार असतानाही प्रणिती शिंदे यांनी भाजपला तगडे आव्हान दिले आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. आम आदमी पार्टीने देखील त्यांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे.
solapur sakal
Solapur Loksabha 2024: Praniti Shinde vs Ram Satputeesakal
Updated on

सोलापूर : २००४च्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे असताना त्यांच्या पत्नी उज्वला शिंदे यांचा पराभव भाजपचे सुभाष देशमुख यांनी केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात मंत्री असतानाही मोदी लाटेत आणि २०१९ च्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आई-वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे आता केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या महायुतीच्या विरोधात लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील त्या एकमेव विरोधी पक्षातील आमदार आहेत. दुसरीकडे भाजपसमोर विजयाची हॅट्‌ट्रिक करण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे.

महाराष्ट्रासह देशातील राजकारणात अलीकडे खूपच बदल झाला असून एरव्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर सडकून टीका करणारे विरोधी पक्षातील नेते आता विकासासाठी पंतप्रधान मोदींना साथ द्यायची आहे, असे सांगून पक्षनिष्ठेची माळ खुंटीला टांगून पक्षांतर करू लागले आहेत. अनेकांच्या पक्षांतरामागे ईडीसह इतर शासकीय यंत्रणांच्या कारवाईचा पाश असल्याचेही बोलले जाते. अशा स्थितीतही आमदार प्रणिती शिंदे एकट्या थेट पंतप्रधानांसह राज्यातील, जिल्ह्यातील भाजप व महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका करण्याचे धाडस करीत आहेत, हे विशेष.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. तरीदेखील, भाजपला याठिकाणी ताण काढावा लागतोय, अशी सद्य:स्थिती आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवावाच लागेल, अन्यथा पुढच्यावेळी हा मतदारसंघ मित्रपक्षाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे या विजयाच्या माध्यमातून महाविकास आघाडीत जिल्ह्याचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे जाईल आणि प्रणिती शिंदे यांचे पक्षातील वजन वाढणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना त्यांच्या विजयामुळे हक्काचा कायमचा मतदारसंघ मिळणार आहे.

४६ वर्षे काँग्रेस तर १७ वर्षे भाजपची सत्ता

सोलापूर लोकसभा मतदारसंघ १९५२मध्ये स्थापन झाला आणि पहिल्याच निवडणुकीत शेकापचे उमेदवार शंकरराव मोरे यांनी विजय मिळविला. तेव्हापासून या मतदारसंघाच्या ७२ वर्षांच्या सत्ता काळात तब्बल ४६ वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर १७ वर्षे भाजपचे खासदार राहिले आहेत. २००४च्या पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा पराभव केला होता. हा मतदारसंघ काँग्रेसच्या विचाराचा असल्याची स्थिती या निवडणुकांमधील निकालावरून स्पष्ट होते. पण, मागील १० वर्षांतील स्थिती बदलली असून मागील दोन निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे.

आमदार प्रणितींसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंची सभा

सोलापूर जिल्ह्यात एकट्याच विरोधातील आमदार असतानाही प्रणिती शिंदे यांनी भाजपला तगडे आव्हान दिले आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. आम आदमी पार्टीने देखील त्यांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. दुसरीकडे १० वर्षे भाजपचीच सत्ता असतानाही स्थानिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभेसाठी बोलावले आहे.

सोलापूर लोकसभेचे ७२ वर्षांतील खासदार

  • सन विजयी उमेदवार पक्ष

  • १९५२-५७ शंकरराव मोरे शेकाप

  • १९५७-६२ जयवंत मोरे संयुक्त महाराष्ट्र समिती

  • १९६२-६७ मडेप्पा काडादी काँग्रेस

  • १९६७-७१ सूरज रतन दमाणी काँग्रेस

  • १९७१-७७ सूरज रतन दमाणी काँग्रेस

  • १९७७-८० सूरज रतन दमाणी काँग्रेस

  • १९८०-८४ गंगाधर कुचन काँग्रेस(आय)

  • १९८४-८९ गंगाधर कुचन काँग्रेस(आय)

  • १९८९-९१ धर्मण्णा सादूल काँग्रेस(आय)

  • १९९१-९६ धर्मण्णा सादूल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

  • १९९६-९८ लिंगराज वल्याळ भाजप

  • १९९८-९९ सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

  • १९९९-०४ सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

  • २००४-०९ सुभाष देशमुख भाजप

  • २००९-१४ सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

  • २०१४-१९ शरद बनसोडे भाजप

  • २०१९-२४ जयसिद्धेश्वर महास्वामी भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.