सोलापूर : शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड, समाजविघातक कृत्य करणाऱ्या जवळपास ९० जणांची यादी शहर पोलिसांनी तयार केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी संबंधित गुन्हेगारांवर पोलिसांनी विशेष वॉच ठेवला आहे. आता एकजरी गुन्हा केला की, त्याच्यावर ‘एमपीडीए’ची कारवाई केली जाणार आहे.
आगामी काही दिवसांत महापालिका निवडणूक जाहीर होऊ शकते. निवडणुकीपूर्वी शहरातील एखाद्या परिसरात गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती तथा सराईत गुन्हेगार दहशत निर्माण करीत असल्यास त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे.
जेलरोड पोलिसांच्या माध्यमातून शुक्रवारी (ता. २७) पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी संजय राठोड या हातभट्टी व्यावसायिकांवर स्थानबद्धतेची कारवाई करीत त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात पाठवले. २०२३मधील ही पहिलीच कारवाई असून आता आणखी दोन-तीन जण कारवाईच्या रडारवर असून त्यांनी चूक तथा गुन्हा केल्यास त्यांनाही येरवडा कारागृहात पाठवले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
शहरात सात पोलिस ठाणी असून त्याअंतर्गत जेलरोड, फौजदार चावडी, सदर बझार, विजापूर नाका, जोडभावी पेठ, एमआयडीसी आणि सलगर वस्ती पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. पाच पोलिस ठाण्याअंतर्गत सराईत गुन्हेगारांची संख्या अधिक असल्याचेही सांगण्यात आले.
‘या’ गुंडांवर होते ‘एमपीडीए’ची कारवाई
स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना धोका निर्माण करणारा, परिसरात दहशत निर्माण करून सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणारा, ज्याच्या कृत्यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते, अशा सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. तत्पूर्वी, त्या व्यक्तीला सुधारण्याची संधी दिली जाते. तरीपण त्याचे गुन्हेगारी वर्तन तसेच सुरु राहिल्यास संबंधितावर पोलिस प्रमुख अहवाल मागवून त्याची पार्श्वभूमी पडताळून ‘एमपीडीए’ची कारवाई करतात.
वर्तनात सुधारणा न झाल्यास कारवाई निश्चित
सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गुंड तथा सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. त्या गुन्हेगाराची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली जाते. शहरातील अजून काहीजण कारवाईच्या रडारवर आहेत.
- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
व्हाइट कॉलरसह अन्य गुंडांची यादी तयार
शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने पोलिस ठाणेनिहाय गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात व्हाइट कॉलर (राजकीय) गुंड, अवैध व्यावसायिक, सराईत गुंड तथा गुन्हेगार व समाजविघातक कृत्य करणारे गुन्हेगार, अशांचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.