कोरोना मृतदेहांच्या सततच्या अंत्यविधींमुळे होतेय विद्युतदाहिनीची झीज !

कोरोना मृतदेहांच्या सततच्या अंत्यविधींमुळे होतेय विद्युतदाहिनीची झीज
Funerals
FuneralsCanva
Updated on

सोलापूर : कोरोनामुळे शहरातील मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी सध्या पूर्ण क्षमतेने सुरु आहे. सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत त्याठिकाणी मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. विद्युतदाहिनी सुरू केल्यानंतर तापमान 660 डिग्रीपर्यंत असते आणि मृतदेह आत टाकल्यानंतर तापमान 725 ते 750 डिग्रीपर्यंत जाते. त्यामुळे उष्णता वाढून विद्युतदाहिनीच्या बॉडीची झीज होऊ लागली आहे, असे निरीक्षण इलेक्‍ट्रिसिटी इंजिनिअरने नोंदविले आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांवर अंत्यविधी करताना शासनाच्या निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे. शहरातील विविध रूग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्या बहुतेक रूग्णांवर मोदी स्मशानभूमीत अंत्यविधी केले जातात. दररोज सरासरी 12 ते 14 जणांचे अंत्यविधी त्याठिकाणी पार पडतात. मागील आठ दिवसांत मृत्यूची संख्या वाढल्याने रात्रंदिवस ही विद्युत दाहिनी सुरुच ठेवावी लागत आहे. याच स्मशानभूमीतील दुसरी विद्युतदाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद असून आता त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. तत्पूर्वी, 50 लाखांचा खर्च करून अक्‍कलकोट रोडवरील शांती चौक स्मशानभूमीत गॅस दाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी दररोज प्रत्येक सव्वा तासाला एका मृतदेहाचा अंत्यविधी केला जाणार आहे. दरम्यान, इतरवेळी अन्य आजारांमुळे मृत्यू झालेल्यांवर शहरातील इतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा अंत्यविधी करताना खबरदारी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे एकाच विद्युत दाहिनीवरील ताण लक्षात घेऊन दुसरीकडे गॅसदाहिनी सुरु केली जात असल्याचेही महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी सांगितले. गॅस दाहिनीवर अंत्यविधी करताना एका मृतदेहासाठी 19 किलोचे गॅस सिलेंडरची गरज लागणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी अंत्यविधी करताना संबंधितांच्या नातेवाईकांकडून काही रक्‍कम घेता येईल का, यादृष्टीने चर्चा सुरु असल्याचेही समजते. दरम्यान, आतापर्यंत मोदी स्मशानभूमीत मृतांवर मोफत अंत्यविधी केले जात आहेत.

क्षमतेपेक्षा अधिक कामामुळे विद्युत दाहिनीची झीज

शहरात एकूण 27 स्मशानभूमी असून त्यात विविध धर्मातील व्यक्‍ती त्यांच्या पंरपरेनुसार अंत्यविधी त्याठिकाणी करतात. परंतु, कोरोना काळात शासनाच्या निकषांनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदी स्मशानभूमीत विद्युतदाहिनीच्या माध्यमातून दररोज 16 तास अंत्यविधीचे काम सुरु आहे. त्यामुळे निश्‍चितपणे विद्युतदाहिनीची झिज होत आहे.

- धनराज पांडे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका

ठळक बाबी...

  • मोदी स्मशानभूमीत सव्वा ते दीड तासाला एका मृतदेहावर होतात विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार

  • शहरात मागील 13 दिवसांत 115 रूग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

  • विद्युतदाहिनीची स्टेनलेस स्टिलची बॉडी; मृतदेह टाकल्यानंतर दाहिनीची उष्णता 725 डिग्रीहून होते अधिक

  • विद्युतदाहिनीची दररोजची क्षमता आठ ते दहा तासांची; नियमित सुरु असल्याने होऊ लागली दाहिनीची झिज

  • कोरोना व्यतिरिक्‍त अन्य आजारांमुळे मृत्यू झालेल्यांवर दुसऱ्या स्मशानभूमीत होतात अंत्यसंस्कार

  • मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीवर ताण येत असल्याने दुसरी बिघडलेली दाहिनीही केली जातेय दुरुस्त

  • अक्‍कलकोट रोडवरील शांती चौक स्मशानभूमीत बसविली गॅस दाहिनी; आज पहिली चाचणी

संपादन : श्रीनिवास दुध्याल

बातमीदार : तात्या लांडगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.