मुलगी झाल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली; परंतु पत्नीने घटस्फोट देण्यासाठी नकार दिल्याने तिचा अनन्वित छळ केला.
सोलापूर : मुलगी झाल्याने पत्नीकडे घटस्फोटाची (Divorce) मागणी केली; परंतु पत्नीने घटस्फोट देण्यासाठी नकार दिल्याने तिचा अनन्वित छळ केला. पत्नीस कोरोना (Covid-19) झाल्यानंतर तिचा मृत्यू होण्यासाठी करोनाचा शस्त्र म्हणून वापर करून तिला औषधोपचार योग्य वेळी न करता जाणीवपूर्वक तिचा मृत्यू घडवून आणल्याच्या आरोपावरून पतीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Crime) दाखल झाला होता. या प्रकरणात पतीने दुसऱ्यांदा दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूरच्या सत्र न्यायालयाने (Sessions Court of Pandharpur) पुन्हा फेटाळला.
कर्नाटकच्या शासकीय वैद्यकीय खात्यात सेवेत असलेल्या लिंगराज दामू पवार (रा.मंगळवेढा) याचा विवाह सोलापूरच्या अश्विनी शंकर चव्हाण हिच्याशी झाला होता. तिला पहिली मुलगी झाल्याने लिंगराज प्रचंड नाराज झाला. त्याची मजल पत्नीला घटस्फोट घेण्याची मागणी करेपर्यंत गेली. तिने घटस्फोट देण्यास नकार देताच त्याने पुन्हा तिचा छळ सुरू केला. दरम्यान, कोरोना महामारीत एप्रिल 2021 मध्ये पत्नीला कोरोनाची बाधा झाली असता, तिचा मृत्यू घडविण्यासाठी लिंगराज याने तिला वेळेवर वैद्यकीय उपचार करू न देता वाऱ्यावर सोडले. सासू-सासरे व शेजारच्या मंडळींनी तगादा लावला असता लिंगराज याने जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. उपचाराअभावी अश्विनीची प्रकृती जास्तच खालावली होती. शेवटी पत्नीला कर्नाटकात विजयपूरला उपचारासाठी नेत असताना वाटेत भर उन्हात मुद्दाम गाडी चार तास थांबविली होती. अखेर उपचाराअभावी तिने प्राण सोडले. शिक्षिका असलेल्या तिच्या आई उमा चव्हाण यांनी हा प्रकार सदोष मनुष्यवधाचा असल्यामुळे जावई लिंगराजविरुद्ध मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिली होती.
दरम्यान, या खटल्यात अटक टाळण्यासाठी लिंगराजने पंढरपूरच्या सत्र न्यायालयात धाव घेतली असता, त्यास अटकपूर्व जामीन नाकारला गेला होता. नंतर पुन्हा तांत्रिक बाबी पुढे करून त्याने दुसऱ्यांदा पंढरपूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता त्यास प्रखर विरोध करणारे मूळ फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. सरकारतर्फे ऍड. सारंग वांगीकर, मूळ फिर्यादीतर्फे ऍड. धनंजय माने, ऍड. जयदीप माने, ऍड. सिद्धेश्वर खंडागळे, ऍड. सुहास कदम तर आरोपीतर्फे ऍड. जे. डी. मुल्ला यांनी काम पाहिले.
गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरीही संशयित आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आरोपीला त्वरित अटक करावी, अशी मागणी मृताच्या आई- वडिलांनी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जर आरोपीला त्वरित अटक नाही झाली तर कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.