महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी 'सकाळ' व 'साम'ने महासर्व्हे केला आहे.
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) पंढरपूरचे (Pandharpur) आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपविरुद्ध (BJP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), अशीच सरळ सरळ लढत झाली. या लढतीत भाजपने पंढरपूरच्या मतदार संघात काठावरचा विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या हातातून थोडक्यात निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीकडे येईल, असा कल या मतदार संघातील मतदारांनी दिला आहे. आज विधानसभेची निवडणूक झाल्यास अथवा महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा सामना झाल्यास पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असेल, असा निष्कर्ष समोर आला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी 'सकाळ' (Sakal) व 'साम'ने (Saam) केलेल्या महासर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या 11 विधानसभा मतदार संघांपैकी फक्त पंढरपूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजपने आता चांगलाच जम बसविला आहे. आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय सक्षम असल्याचेही या सर्व्हेतून समोर आले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप, अशी लढाई झाली तर जिल्ह्यातील 11 पैकी सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामध्ये करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर व सांगोला या मतदार संघाचा समावेश आहे. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या चार मतदार संघांमध्ये सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण व माळशिरस या चार मतदार संघांचा समावेश आहे.
बार्शीत आज निवडणूक झाल्यास भाजपचा आमदार विजयी होईल. बार्शीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी लढाई झाल्यास येथून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल, ही एक धक्कादायक माहिती या सर्व्हेतून समोर आली आहे. जिल्ह्यात शेकापचे अस्तित्व फक्त सांगोला मतदार संघापुरते मर्यादित झाले आहे. या मतदार संघात आता निवडणूक झाल्यास शिवसेनेचा (Shiv Sena) आमदार विजयी होईल. महाविकास आघाडीविरुद्ध भाजप, अशी लढत झाल्यास येथून शिवसेना व राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल, असा अंदाजही या सर्व्हेतून व्यक्त झाला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपचे चार, राष्ट्रवादीचे तीन, कॉंग्रेसचा एक, शिवसेनेचा एक व दोन अपक्ष आमदार विजयी झाले आहेत. पंढरपुरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारल्याने जिल्ह्यातील भाजप आमदारांची संख्या आता पाच झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या दोनवर येऊन ठेपली आहे.
जिल्ह्यात आता विधानसभा निवडणूक झाल्यास भाजपचे पुन्हा पाच आमदार विजयी होतील, असा निष्कर्षही या सर्व्हेतून निघाला आहे. भाजप बाजी मारणाऱ्या चार मतदार संघांमध्ये बार्शी, सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, माळशिरस या मतदार संघांचा समावेश आहे. आज निवडणुका झाल्यास सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आमदार विजयी होतील; त्यामध्ये मोहोळ, करमाळा, माढा, पंढरपूर या मतदार संघांचा समावेश असेल, अशी माहितीही या सर्व्हेतून समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेचा एक (सांगोला) व कॉंग्रेसचा (Congress) एकच (सोलापूर शहर मध्य) आमदार विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2019 मध्येही सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यातून शिवसेना व सोलापूर शहर मध्यमधून कॉंग्रेसचा आमदार विजयी झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. दुसरीकडे मात्र नव्याने स्थापन झालेल्या व मुदत संपलेल्या पाच नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामध्ये नातेपुते, माळशिरस, माढा, वैराग, श्रीपूर- महाळुंग या पाच नगरपंचायतींचा समावेश आहे. आगामी काळात जिल्ह्यातील 11 नगर परिषदा, सोलापूर जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती, सोलापूर महापालिका, सोलापूरची विधान परिषद या निवडणुका होत आहेत. "सकाळ - साम'ने केलेल्या सर्व्हेमध्ये सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजप आहे त्या स्थितीवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. महाविकास आघाडी सरकारला सोलापूर जिल्ह्यात मोठी बांधणी करावी लागणार आहे. शिवसेना व कॉंग्रेस सोलापूर जिल्ह्यात आगामी काळात कशी बांधणी करते? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन व एक पुरस्कृत, असे तीन आमदार आहेत. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक आमदार वाढणार असल्याचाही कल व्यक्त झाला आहे. शिवसेना व कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या मात्र आहे त्याच जागेवर राहणार असल्याचेही या महासर्व्हेतून समोर आले आहे.
आज निवडणूक झाली तर कोणाचा कुठे आमदार...
राष्ट्रवादी : करमाळा, माढा, मोहोळ, पंढरपूर
भाजप : सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, माळशिरस
शिवसेना : सांगोला
कॉंग्रेस : सोलापूर शहर मध्य
महाविकास आघाडीविरुद्ध भाजप लढतीत कोणाचा आमदार कुठे...
महाविकास आघाडी : करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला
भाजप : सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, माळशिरस
ठळक...
जिल्ह्यात भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच आवश्यक
महाविकास आघाडी : करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला
भाजप : सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, माळशिरस
एमआयएम (MIM) च्या कामगिरीकडे लक्ष
सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर दक्षिण या तिन्ही विधानसभा मतदार संघात एमआयएमची ताकद कमीअधिक प्रमाणात आहे. 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने कॉंग्रेसच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महापालिकेची निवडणूक एमआयएमने पहिल्यांदाच लढविली. या निवडणुकीत एमआयएमचे नऊ नगरसेवक विजयी झाले आहेत. एमआयएम नगरसेवक तथा एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह काही नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. एमआयएममधून होणारे आउटगोईंग लक्षात घेऊन एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी नुकताच सोलापूर दौरा केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत एमआयएमला आउटगोईंगचा किती फटका बसणार? 2022 च्या महापालिका निवडणुकीत एमआयएम कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुस्लिम आरक्षणाच्या माध्यमातून खासदार ओवेसी यांनी मुस्लिम समाजाची व्होट बॅंक अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत कॉंग्रेस व राष्ट्रवादीने सत्तेसाठी हातमिळवणी केल्याचा मुद्दाही खासदार ओवेसी मांडत आहेत. या सर्वांचा परिणाम आगामी काळात कसा होणार? एमआयएमची कामगिरी कशी असणार? यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत.
शेकापच्या भूमिकेकडे लक्ष
विधानसभेचे रेकॉर्डब्रेक आमदार म्हणून सांगोल्याचे माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. राज्यातील शेकाप अस्तित्व गमावत असताना सांगोल्यातील शेकाप मात्र तग धरून आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने शेकापच्या उमेदवाराचा अल्पशा मतांनी पराभव केला. शेकापचा पराभव करण्यासाठी सांगोल्यात शिवसेनेला राष्ट्रवादीची साथ मिळाली. त्यामुळे सांगोल्यातील शेकापचा राग आजही तेथील राष्ट्रवादीवर आहे. आगामी निवडणुकीत शेकाप भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास अथवा महाविकास आघाडीच्या विरोधात सांगोल्यातील शेकापने भूमिका घेतल्यास या मतदार संघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सांगोल्यातील शेकाप आगामी काळात काय राजकीय भूमिका घेते? यावर या मतदार संघातील विजयाची गणिते अवलंबून आहेत.
बालेकिल्ले भाजप अन् राष्ट्रवादीचे
मोहोळ आणि माढा मतदार संघावर 1999 पासून राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सलग पाच टर्म वर्चस्व असलेल्या या मतदार संघात आता निवडणूक झाल्यास पुन्हा राष्ट्रवादी विजयी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्यानंतरही राष्ट्रवादीचाच विजय होणार असल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात मोहोळ व माढा हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीचे अभेद्य बालेकिल्ले असल्याचे समोर आले आहे. सोलापूर शहर उत्तर मतदार संघावर 2004 पासून तब्बल सलग 20 वर्षे वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघात आजही निवडणूक झाली तरीही भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा कल व्यक्त करण्यात आला आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई झाल्यानंतरही येथून भाजप विजयी होण्याचा अंदाज व्यक्त झाल्याने हा मतदारसंघ भाजपचा कट्टर बालेकिल्ला असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.