नववधूप्रमाणे येती-जातीचा कार्यक्रम करणाऱ्या पालकमंत्र्यांना हटवणार का?

जनभावना ओळखून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवण्याची होत आहे मागणी
Dattatraya Bharne
Dattatraya BharneEsakal
Updated on

सोलापूर : इंदापूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congres Party) आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) हे इंदापूर तालुक्‍यासाठी जलनायक ठरले आहेत. इंदापूरसाठी जलनायक ठरत असलेले दत्तात्रय भरणे सोलापूरसाठी पालकमंत्री (Guardian Minister) म्हणून खलनायक ठरू लागले आहेत. कोरोनाचे संकट परतवून लावण्यात अत्यंत निष्क्रिय ठरलेल्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माथी आता सोलापूर जिल्ह्याच्या पाणीचोरीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात जनभावना पेटू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आता तरी या भावनेचा विचार करून पालकमंत्र्यांना हटवणार, की आमचंच खरं म्हणत आपले घोडे दामटवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (there is a demand to remove the Guardian Minister Dattatraya Bharane)

सोलापूर जिल्ह्याला आजपर्यंत अनेक मंत्री व पालकमंत्री मिळाले. कोणत्या मंत्र्याच्या काळात सोलापूर जिल्ह्याला काय मिळाले? याची आठवण व लेखाजोखा काढला जातो. या मंत्र्यांच्या काळात सोलापूरचा हा प्रश्न मार्गी लागला, त्या मंत्र्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी कष्ट घेतले... अशी अनेक उदाहरणे सांगितली जातात. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बाबतीत मात्र सोलापूरकरांना वेगळाच अनुभव आला आहे. पालकमंत्री भरणे यांच्या काळात सोलापूरला काय मिळाले? यापेक्षाही सोलापूरकरांच्या वाट्याचे हक्काचे पाच टीएमसी पाणी पालकमंत्री भरणे यांनी त्यांच्या तालुक्‍यासाठी पळविले, हा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना आयुष्यभर सहन करावा लागणार आहे.

Dattatraya Bharne
मराठा आरक्षण रद्दबाबत काय आहेत राजकीय नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि तरुणांच्या भावना !

ज्या ज्या वेळी सोलापूरच्या पालकमंत्री पदाचा आणि दत्तात्रय भरणे यांचा भविष्यात विषय निघेल त्या वेळेस पाणी चोरीचा हा शिक्का कायम स्मरणात राहील. सोलापूर शहर व जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून ठोस उपाययोजना अपेक्षित होती. रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन, कोरोना लसीचा पुरेसा साठा, रुग्णांना ऑक्‍सिजन बेड या तीन महत्त्वाच्या गोष्टी मिळवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना सध्या पदोपदी झगडावे लागत आहे. यातील कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. रुग्णाचे नातेवाईक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेकांच्या हातापाया पडून या गोष्टी मिळवत आहेत. स्वाभिमानी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांवर अशी लाचारीची वाईट वेळ आली आहे. याचा थोडा तरी विचार पालकमंत्री भरणे करतील का?, गेल्या वर्ष- सव्वा वर्षाच्या काळामध्ये पालकमंत्री भरणे यांनी सोलापूर साठी काय केले, हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.

नववधूप्रमाणे येती-जातीचा कार्यक्रम

भीमा नदी ओलांडल्यानंतर शेजारच्या इंदापूर तालुक्‍यातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येतात. दुपारी आलेले पालकमंत्री सायंकाळी पुन्हा आपल्या घरी सुखरूप जातात. नववधू ज्याप्रमाणे येती- जातीचा कार्यक्रम करण्यासाठी माहेरी येते आणि पुन्हा सासरी निघून जाते त्या पद्धतीनेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूरचा दौरा करतात आणि निघून जातात. या दौऱ्यातून काय साध्य होते, या प्रश्नाचे उत्तर ना सर्वसामान्यांना मिळाले ना जिल्हा प्रशासनाला मिळाले आहे. सोलापूर शहर व जिल्हा कोरोनाच्या भीषण संकटाचा सामना करत असताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात तळ ठोकून राहणे अपेक्षित होते. सध्या मात्र तसे घडताना दिसत नाही.

Dattatraya Bharne
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमुळे मिळाला अक्कलकोटच्या आठवणींना उजाळा !

सोलापूरला राष्ट्रवादीपेक्षा भाजप वाटू लागली जवळची

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर मनापासून प्रेम करणारा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आणि शरद पवारांच्या मर्जीतल्या जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, अशीच आजपर्यंतची सोलापूर जिल्ह्याची ओळख होती. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक भावना व स्थानिक प्रश्न याचा कसलाही विचार न करता राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापूरच्या बाबतीत परस्पर निर्णय घेऊ लागल्याने सोलापूर जिल्ह्याचा कल आता बदलत आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा आता भाजपकडे झुकू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या तब्बल 11 पैकी सहा जागा या भाजपकडे आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरानंतर आता सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष दिले आहे. शरद पवार आणि सोलापूर यांच्यातील नाते जुन्या पिढीने पाहिले आहे. नव्या पिढीला सोलापूर आणि फडणवीस यांच्यातील नव्या नात्याची विश्वासार्हता अधिक वाटू लागली आहे. सोलापूर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात विश्वासाचे आणि विकासाचे नवीन नाते तयार होऊ लागले आहे. हेच नाते भविष्यात राष्ट्रवादीला प्रचंड अडचणीचे ठरण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.