सांगोला : सांगोला तालुक्यातील संगेवाडी हे महसूल मंडळ केंद्र असलेले एक प्रमुख गाव आहे. परंतु सध्या गावाला स्वतंत्रपणे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक नाहीत. इतर गावच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्तपणे या गावचा कारभार दिला आहे.
स्वतंत्रपणे गाव हाकणारे प्रमुख कर्मचारी वर्गचं नसल्याने ग्रामस्थांचे अतिशय हाल होत असून "गाव तसं चांगलं, पण कर्मचाऱ्यांविना टांगलं" असेचं बोलले जात आहे. शासन स्तरावरून गावे, खेडी स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विविध योजना अमलात आणल्या जातात.
या योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी वर स्थारपासून खालच्या खेडेगावापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष महत्त्व असते. गावचा गावगाडा चालवण्यासाठी ग्रामपंचायतेतील सदस्य, सरपंचांबरोबरच ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक इत्यादी कर्मचाऱ्यांना विशेष महत्त्व असते.
शासनाच्या योजना तसेच सुव्यवस्थेत गावगाडा चालवण्यासाठी या तिन्ही कर्मचारी गावात असणे जरुरीची असते. परंतु तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेले संगेवाडी येथे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यातील कोणतेही कर्मचारी नियमित नसून इतर गावच्या कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त गावाची जबाबदारी दिली आहे.
त्यामुळे हे कर्मचारी आपल्या दिलेल्या नियमित गावचा कारभार पाहून एखादा दुसरा दिवस गावात हजर असतात. गावातील नागरिकांना ग्रामपंचायत, तलाठी व कृषी कार्यालय संबंधित कामे करण्यात मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत आहे.
सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून पालकांना आपल्या मुलाचे व स्वतःचे विविध प्रकारचे धाकले काढण्यासाठी या कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसावे लागते. अन्यथा त्या कर्मचाऱ्यांच्या संबंधित गावांमध्ये जाऊन आपली कागदपत्रे घ्यावी लागतात. गावगाडा चालवणारे गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे नियमित कर्मचारी द्यावेत अशी मागणी सध्या ग्रामस्थांकडून होत आहे.
आमच्याच गावावर अन्याय का ?
प्रशासनामध्ये अधिकारी व कर्मचारी पाहिजे तेवढी संख्या नाही याची जाणीव आहे. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे दोन-तीन गावांचा कारभार एका कर्मचारी द्यावा लागतो अशी परिस्थिती आहे. परंतु संगेवाडी हे महसूल मंडल केंद्र असूनही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे तिघेही कर्मचारी नियमित का नाहीत. आमच्याच गावावर अन्याय का होतो आहे असे ग्रामस्थ उघडपणे बोलत आहेत.
बापू, तेवढे कर्मचाऱ्यांचं बघा..
तालुक्याचे आमदार शहाजी पाटील सध्या 'झाडी डोंगर'मुळे राज्यात प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्याच तालुक्यातील एका महसूल मंडळामध्ये कर्मचाऱ्यांविना नागरिकांचे मोठ्या प्रमाणात कामे खोळांबत आहेत. हे प्रमुख कर्मचारी नियमित गावाला द्यावेत यासाठी येथील ग्रामस्थ 'बापू, तेवढे कर्मचाऱ्यांचं बघा' असेच म्हणत आहेत.
आमचे गाव महसूल मंडळ केंद्र असून सुद्धा गावात कायमस्वरूपी ग्रामसेवक, तलाठी अथवा कृषी सहाय्यक हे प्रमुख कर्मचारी नाहीत. नियमित कर्मचारी गावात येत नसल्यामुळे नागरिकांचे कामे करण्यास दिरंगाई होते. आमच्या गावास हे तिन्ही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
- नंदादेवी वाघमारे, सरपंच, संगेवाडी, ता. सांगोला.
आमचं गाव प्रशासनाच्या व राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक राजकीय कार्यक्रमांचे, निवडणुकांची सुरुवात येथील ग्रामदैवताच्या पूजनाने होते. परंतु सध्या गावात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक नियमित नसल्यामुळे अडचणी येत आहेत. अधिकारी व प्रमुख राजकीय नेत्यांनी याबाबत लक्ष घालून या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी.
- राजू खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य, संगेवाडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.