सोलापूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. घरासमोर लावलेली दुचाकी, बंद घरात चोरी, दागिने घालून दुचाकीवरून फिरताना, रिक्षातून प्रवास करताना चोरी होऊ लागली आहे. 1 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या 48 दिवसांत तब्बल 46 दुचाकींची चोरी झाली असून एक कार व एक ऍटोरिक्षाही चोरीला गेल आहे. दुसरीकडे 28 हून अधिक घर, दुकानांत चोरी झाली आहे.
शहरातील शांतता व सुव्यवस्थेसाठी सात पोलिस ठाणे असून प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत डीबी पथक कार्यरत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाते. दुसरीकडे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी प्रथमच स्वत:च्या नृेत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. रात्रीची गस्त, दिवसभर पोलिसांचा शहरात वावर असतानाही चोरट्यांनी कोणतीही वेळ न पाळता चोरी करायला सुरवात केली आहे. रस्त्यावरील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करताना अनेकांचा मोबाइल व खिशातील रोकड चोरीला गेली आहे. तर रिक्षातून प्रवास करताना अनेकांचे दागिने व रक्कम लंपास झाली आहे. शाळेतून घरी जाताना अथवा शिकवणुकीला गेलेल्या मुलींना शाळेतून घरी नेताना महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचे प्रकारही वाढत आहेत. घरासमोर लावलेली दुचाकी सकाळी उठेपर्यंत सुरक्षित असेल की नाही, काही कामानिमित्त अथवा देवदर्शनासाठी परगावी गेलेल्यांच्या घरात परत येईपर्यंत चोरी होणार नाही, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, अशी स्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. दीड महिन्यांत शहरातून दररोज एक, या प्रमाणात 46 दुचाकी चोरीला गेल्या असून त्यातील काही दुचाकींचा शोध लागला आहे. काहींचा शोध सुरु आहे.
दुचाकी चोरीला गेलेली ठिकाणे...
शहरातील मुरारजी पेठ, जुनी पोलिस लाईन, जिल्हा परिषदेसमोरील पार्किंग, नाकोडा रेसिडेन्सी, झंवर मळा, इंदिरा नगर, पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील पार्किंग, बेन्नूर नगर, रामलाल चौक, आदित्य नगर, आरटीओ कार्यालयाजवळ, जी. डी. देगाव यांच्या दुकानासमोरील रस्त्यावरून, समर्थ नगर, रेल्वे लाईन, मुध्देश चादर सेंटरसमोरून, मंत्री चंडक, आंगण विजयपूर रोड, मार्केट यार्ड, शास्त्री नगर, गंगाधर हौसिंग सोसायटी (होटगी रोड), रुपाभवानी मंदिर परिसर, जवळकर वस्ती, कोटणीस कॉम्प्लेक्स (विजयपूर रोड), सिध्देश्वर मंदिर (संमती कट्टाजवळ), तोडकर वस्ती, शिवाजी नगर, बाळे, सोमवार पेठ, साईबाबा चौक, नितीन नगर (एमआयडीसी), पायलट चौक, नवी पेठ, वेणुगोपाल नगर, मार्केट यार्ड, न्यू पाच्छा पेठ, वारद चाळ, सिध्देश्वर मंदिर, झंवर मळा (बुधवार पेठ), विडी घरकूल, क्षिरलिंग नगर, रेणुका नगर, नई जिंदगी, मसरे वस्ती याठिकाणाहून दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
दागिने घातलेल्या महिलांमध्ये भीती...
भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र असतेच. घराबाहेर जाताना अनेक महिलांच्या गळ्यात गंठणही असते. सार्वजनिक रोडवरून जाताना मंगळवारी (ता. 15) जुना पुना नाका व जुळे सोलापूर परिसरात भर दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. परगावी जाताना अनेक महिला घरातील कपाटात महागडे दागिने ठेवतात. त्याचीही चोरी होऊ लागली आहे. आता चोरीच्या घटनांमुळे निर्माण झालेली नागरिकांमधील भीती पोलिस प्रशासन कशाप्रकारे दूर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.