करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रेशनचा गहू व तांदूळ कर्जत (जि. नगर) येथे काळ्या बाजारात (Black Market) विकत असताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर तहसीलदार समीर माने यांनी दोन रेशन दुकाने (Ration shop) सील केली आहेत. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी (Karjat Police) तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन पिकअप गाड्यांसह दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, काळ्या बाजाराने नेमका किती माल करमाळा तालुक्यातून कर्जत तालुक्यात आत्तापर्यंत विकला गेला याची कसून चौकशी कर्जत पोलिस करत आहेत. (Two shops were sealed in the case of black market in the ration shop)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोफत धान्य दिले जात असतानाच दुसऱ्या बाजूला याच कालावधीत काळ्या बाजारात रेशनचे धान्य विकले जात असल्याचे उघड झाल्याने करमाळा तालुक्यातील पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेशन दुकानदारांच्या येणाऱ्या तक्रारींबाबत कधीही करमाळ्यात महसूल प्रशासनाच्या पुरवठा विभाग यांच्याकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. उलटपक्षी तक्रारदाराला समजावून तक्रार मागे घेण्यासाठी पुरवठा विभागातील अधिकारीच प्रयत्न करत असल्याचा अनेक वेळा आरोप होतो. त्यामुळे रेशन दुकानाकडे पुरवठा विभागाचे जाणीवपूर्वक होणारे दुर्लक्ष प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास कर्जत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भगवान शिरसाठ करत आहेत.
दरम्यान, विहाळ येथील रेशन दुकानदाराची मागील आठवड्यात ग्रामपंचायत सदस्य मोहन मारकड यांनी तक्रार केली होती. तक्रारीवर दुकान तपासणीसाठी आलेले पुरवठा विभागाचे अनिल ठाकर यांनी सारवासारव करत दुकानदाराची बाजू घेत पुन्हा एकदा पाठीशी घातले. त्यानंतर लगेच कर्जत येथे करमाळा तालुक्यातील रेशनचा माल काळ्या बाजारात विकताना पकडल्याने एकूणच तालुक्यातील रेशनच्या पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आम्हाला रेशनचा माल काळ्या बाजाराने विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळताच लोकांना कारवाईसाठी पाठवले. मात्र तोपर्यंत करमाळा तालुक्याची हद्द सोडून या गाड्या कर्जत तालुक्याच्या हद्दीत गेल्या होत्या. त्यानंतर तेथील पोलिस व महसूल प्रशासनाला संपर्क साधून याबद्दल माहिती दिली. कर्जत पोलिसांनी या गाड्या पकडून त्यावर कार्यवाही केली आहे. यावर दोन रेशन दुकाने सील केली आहेत.
- समीर माने, तहसीलदार, करमाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.