Ujani Dam : उजनी जलाशयात बोट बुडून 6 जणांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर प्रशासन उपायोजनासाठी काय भूमिका घेणार?

उजनी जलाशयात (Ujani Reservoir) बोट बुडून 6 जणांचा मृत्यू झाला.
Ujani Dam
Ujani Damesakal
Updated on
Summary

उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे करमाळा तालुक्यातून इंदापूरला जायचं असल्यास नदीतील अंतर हे खूप कमी आहे.

करमाळा : उजनी जलाशयात (Ujani Reservoir) बोट बुडून 6 जणांचा मृत्यू झाला. याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पण, या दुर्घटनेला नेमके जबाबदार कोण? यावर कोण बोलणार आहे की नाही? भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना काय केल्या जाणार? याविषयी मात्र प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याची मागणी केली जात आहे.

उजनी धरणात (Ujani Dam) जलवाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसताना अनेक वर्षांपासून जलवाहतूक सुरू आहे. याबाबत प्रशासनाला कधीच का प्रश्न पडला नसावा? उजनी जलाशयामध्ये कुगांव ते कळाशी असा प्रवासी जलवाहतुकीचा कोणताही परवाना नसताना, तसेच जलवाहतूक वेळी आवश्यक सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता बेकायदेशीर रित्या केलेल्या धोकादायक जलवाहतुकीमध्ये 6 जणांचे बळी घेतले आहेत.

याबाबत सखोल चौकशी करून याप्रकरणी संबंधित अधिकारी बोट मालक यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला जावा, अशीही मागणी होत आहे. अपघातात झरे येथील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. या दुर्घटनेत एकूण सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. उजनी जलाशयात प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोणालाच परवाना नाही, तरीही या पट्ट्यातील 14 ठिकाणहून नियमितपणे 16 हून अधिक बोटी (लॉन्च) प्रवासी वाहतूक होत आहे.

Ujani Dam
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राजापूर बंधाऱ्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त; डोळ्यात तेल घालून पहारा, काय आहे कारण?

धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी कोणत्याच बोटीवर सुरक्षा साहित्य, जॅकेट ठेवले जात नसल्याची बाब कुगाव आणि कळाशी यासह दुर्दैवी घटना घडली. त्या भागात उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधल्यानंतर पुढे आली आहे. मागील काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कुगांव ते शिरसोडी पुलाला मंजुरी दिली आहे. केत्तुर ते चांडगाव यादरम्यान पूल उभारावा अशीही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे.

14 ठिकाणहून 16 लॉन्चद्वारे होते जलवाहतूक

  • 1) केतूर ते चांडगाव - 4

  • 2) वाशिंबे ते गंगावळण - 2

  • 3) चिखलठाण ते पडथाळ - 2

  • 4) कुगाव से कळाशी - 2

  • 5) कुगाव ते कालठण - 3

  • 6) ढोकरी ते शहा - 1

  • 7) कुगाव ते शिरसोडी - 2

लॉन्चमधून प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला वीस रुपये तर मोटरसायकल साठी वीस रुपये घेतले जातात. याशिवाय, धान्य व जनावरांचा चार्ज वेगळा आकारला जातो.

(एक लॉन्चमधून रोज सरासरी ८ ते 10 फेऱ्या होतात. याशिवाय, स्पेशल लॉन्चचे भाडे कोणी भरले तर स्वतंत्र फेरी देखील मारली जाते.)

उजनी जलाशयातून वाळू उपसा होत असल्यास महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यावरती कारवाई करते. मात्र, उजनी जलाशयातून लाॅन्चने जी जलवाहतूक होते त्यावर नियंत्रण कोणाचे? उजनी पाटबंधारे विभाग यावर नियंत्रण का ठेवत नाही? लॉन्च व्यवसायातून लॉन्च मालकाला चांगले पैसे मिळतात. या व्यवसायाला नेमका वरदहस्त कोणाचा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

Ujani Dam
Indapur Tahsildar Attack : इंदापूरच्या तहसीलदारांवर भररस्त्यात हल्ला; आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी

उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे करमाळा तालुक्यातून इंदापूरला जायचं असल्यास नदीतील अंतर हे खूप कमी आहे. धरण भरल्यानंतर कळाशी ते कुगांव हे अंतर 4 ते साडेचार किलोमीटर आहे. सध्या पाण्याची पातळी घटल्यामुळे हे अंतर अडीच ते तीन किलोमीटर आहे, त्यामुळे केवळ दहा ते पंधरा मिनिटात कुगांव ते कळाशीला जाता येते. एवढेच अंतर रस्त्याने जायचे असल्यास 80 किमी अंतर जावे लागते. यासाठी अडीच ते तीन तास वेळ लागतो.

लॉन्च मधून माणसांबरोबरच मोटर सायकल वाहतूक केली जाते. याशिवाय लोकांबरोबरच त्यांची दुचाकी वाहने, शेळ्या मेंढ्यासारखी दुभती जनावरे, खरेदी केलेले साहित्य, धान्याची पोती हे अतिरिक्त ओझे ही वाहून नेले जाते. सर्व वाहतूक बेकायदेशीरपणे चालते. तर लाॅन्चवर लाइफ जॅकेट नसतात, लाॅन्च बुडायला लागली तर प्रवाशांना वाचवण्यासाठी इतर साधनेही नसतात. लाॅन्चचा चालक ही प्रशिक्षित नसल्याने दुर्घटनेवेळी त्याला त्याचा ही जीव वाचवता येत नाही. कुगाव ते कळाशी दरम्यान बुडालेल्या बोटीचा चालक अनुराग अवघडे हा देखील स्वतःचा जीव वाचू शकला नाही.

Ujani Dam
12th Exam Result : मेंढपाळाच्या मुलीचं बारावी परीक्षेत दणदणीत यश; भविष्यात पायलला व्हायचंय IAS अधिकारी

उजनीत फिरवण्यासाठी परवानगी काढावी लागणार का?

उजनी जलाशयातून प्रवासी वाहतुकीसाठी चालणाऱ्या लाॅन्चशिवाय उजनी जलाशयाच्या काठावरील गावातील अनेक मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांनी स्वतःच्या लॉन्च घेतल्या आहेत. या लॉन्च हे मोठे बागायतदार फक्त स्वतःच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना, मित्रांना उजनी जलाशयात फेरफटका मारण्यासाठी वापरतात. अनेक वेळा सोशल मीडियातून उजनी जलाशयात फेरफटका मारणाऱ्या बोटीनचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेले आढळून आले आहेत. उजनी जलाशयात लॉन्च मधून वाहतूक करणाऱ्यांवर काय कारवाई होणार का आणि वाहतूक करणाऱ्याशिवाय बड्या बागायतदारांकडे ज्या लॉन्च आहेत, त्यांना याबाबत काय विचारणा होणार का? या बागायतरांना भविष्यात आपल्या लॉन्च उजनीत फिरवण्यासाठी परवानगी काढावी लागणार का?

सर्वच ठिकाणी उजनीवर फुल बांधणे अर्थिक व व्यावहारिक दृष्टिकोनातून शक्य नाही. एक पूल मंजुर झाला आहे. आणि एखादा पूल मंजूर करणे आवश्यक आहे. इतर ठिकाणी शासनाने समुद्रातील खात्यामध्ये ज्या पध्दतीने सर्व सुविधासह अत्याधुनिक पध्दतीने जलवाहतूक केली जाते तशी सोय करणे गरजेचे आहे.

उजनी जलाशयात बोट बुडून मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तात्काळ देण्यात येणार आहे. दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे यांना काय मदत करता येईल याबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागवले आहे. तसेच उजनी जलाशयातील सर्व कोटींची जलवाहतूक बंद करण्याबाबत आदेश काढण्यात आला आहे.

-शिल्पा ठोकळे, तहसीलदार करमाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.