'उजनी'च्या निर्मितीनंतर उत्तर ध्रुवीय बीनहंसचे पहिल्यांदाच आगमन

उजनी धरणावर यावर्षी युरोपातून हिवाळी पाहुणे पक्षी म्हणून बीनहंस पहिल्यांदाच येऊन दाखल झाला आहे.
Bird
BirdSakal
Updated on

केत्तूर (सोलापूर) : स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या उजनी धरणावर यावर्षी युरोपातून हिवाळी पाहुणे पक्षी म्हणून बीनहंस पहिल्यांदाच येऊन दाखल झाला आहे. अकलूज (जि. सोलापूर) येथील पक्षी निरीक्षक ऋतुराज कुंभार व दिग्विजय देशमुख या वन्यजीव छायाचित्रकारानी नुकतेच आपल्या कॅमेऱ्यात बीनहंसाची छबी कैद केली आहे. हंस गणातील कलहंस हे यापूर्वी या ठिकाणी अनेक वेळा आल्याची नोंद आहे. मात्र बीनहंस पक्षी, उजनी निर्मितीनंतर पहिल्यांदाच आला आहे. तो सध्या भिगवणच्या जवळपास पसरलेल्या विस्तीर्ण फुगवट्यावरील उथळ पाण्याच्या ठिकाणी पट्टकदंब हंसांच्या थव्यात विहार करताना दिसतो आहे. (satara Marathi News)

दरवर्षी हिवाळ्यात रशिया जवळच्या युरेशिया, सायबेरिया, मंगोलिया येथून पट्टकदंब हंस, चक्रवाक बदक, पाणटिवळे, धोबी व अन्य स्थलांतरित पक्षी हिमालयाची हिमशिखरे ओलांडून भारतीय उपखंडात येऊन दाखल होत असतात. पुढे तीन-चार महिने विविध राज्यांतील जलस्थानांवर वास्तव्य करून परत आपल्या मूळ प्रदेशाकडे हे पक्षी निघून जातात. या पक्ष्यांच्या संगतीने युरोपातील ब्रिटन, नार्वे, कॅनडा येथील बर्फाच्छादित प्रदेशातील काही टुन्ड्रा व टायगा हंसपक्षी भरकटत भारतात येतात. त्यातलाच हा प्रकार म्हणजे यावेळी उजनीवर बीनहंस येऊन दाखल झालेला आहे.

Bird
सातारा : जिल्ह्यात ८१७७ विद्यार्थ्यांना लसीकरण

इंग्रजीत बीनगूज म्हणून ओळखला जाणारा हा हंसपक्षी, स्थानिक बदकांपेक्षा आकाराने मोठा आहे. त्याचे डोके गोलाकार आहे. चोच जड व गडद तपकिरी रंगाची असून त्यावर मध्यभागी नारंगी डाग दिसून येतो. त्याचे पाय नारंगी रंगाचे असून पायांची बोटे पातळ पापुद्रयानी जोडलेली असतात. पंख गडद तपकिरी पिसांचे असतात. हा हंसपक्षी पूर्णपणे शाकाहारी असून तो पाणवनस्पतीचे खोड व पाणथळ जवळच्या पिकांची पाने, बिया या खाद्यांवर गुजराण करतो. सुमारे पंचवीस वर्षे आयुर्मान लाभलेला हा हंस सामान्यपणे अडीच ते तीन किलो वजनाचा असतो. उजनीवर कधीकधी भरकटत येणाऱ्या कलहंस व बीनहंस यामध्ये बरेच साम्य असते.

बीनहंसाची वैशिष्ट्ये

- युरोपातील नार्वे व ब्रिटनपासून रशियाच्या युरेशिया भागातील टुंड्रा व टायगा प्रदेशात हे हंस वीण घालतात म्हणून यांना टुंड्रा बीनगूज या नावाने ओळखले जाते

- पाणवठ्यालगतच्या असलेल्या पावटा व वाटाणा सारख्या पिकांत यांचा वावर असतो म्हणून बीनहंस हे नाव दिले आहे.

- हिंदूधर्मात हंसांना मानाचे स्थान आहे. हंस विद्यादेवता सरस्वतीचे वाहन आहे. हंसाची हत्या करणे म्हणजे माता-पिता, देवता व गुरूची हत्या करणे असे समजले जाते.

- पाणी व दूध अलग करणारा हा पक्षी आहे, अशी अख्यायिका सांगितली जाते

Bird
कऱ्हाडला १३ ग्रामपंचायती बिनविरोध; आठ ग्रामपंचतीसाठी १८ ला मतदान

उत्तर युरोपातील ब्रिटन व नार्वे या शीत प्रदेशात वीण घालणारे हे हंस रशिया जवळच्या मंगोलिया, सायबेरिया, युरेशिया व उत्तर एशियातील चीनपर्यंत दरवर्षी स्थलांतर करून येत असतात. हे पक्षी भारतात तसे येणे दुर्मिळच. मंगोलिया व सायबेरिया येथे मूळ वास्तव्याला असणारे पट्टकदंब हंस, चक्रवाक, धोबी, पाणटिवळे हे दरवर्षी हिवाळ्यात उजनी परिसरात स्थलांतर करून येतात. भारतात येणाऱ्या या हिवाळी स्थलांतरितांसोबत हा बीनहंस भरकटत आला असावा, असा अंदाज आहे. हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच आल्याची नोंद असेल असे ज्येष्ठ पक्षी अभ्यासकांचे मत आहे.

- डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक, अकलूज

स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन ठरलेल्या उजनीवर प्रथमच बीनहंस या पक्ष्यांच्या आगमनाने उजनी परिसरातील पक्षी वैभवात भर पडली आहे. या दुर्मिळ विदेशी पाहुण्याला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. या पक्ष्यांच्या येथील आल्हाददायी वास्तव्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका बजावली पाहिजे.

- कल्याणराव साळुंके, पक्षीप्रेमी, करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.